शब्दभांडार:Community Portal

From शब्दभांडार

Jump to: navigation, search

(जोशी.ऑर्ग वरून साभार.)

२८ मे १८८३ हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस. त्यांनी स्वयंस्फूर्तीने नवे मराठी शब्द तयार करून मराठी शब्दरत्नाकरात मौलिक भर टाकली. त्यानिमित्ताने ही कृतज्ञतापूर्वक नोंद. …….माडांच्या झावळ्यांमधून ओघळलेले सूर्यकिरणांचे असंख्य थरथरते चमचम लोलक भुईवर सळसळत असतात. किरणांचा तो नजरबंद खेळ कोकणात घराच्या पडवीत बसून पाहण्यात मी बालपणी रमायचो. आता उतारवयात कोथरूडच्या घरी सुन्न बसून असतो, तेव्हा कधीमधी तात्याराव सावरकरांच्या प्रज्ञेचे असंख्य तेजस्वी पैलू तसेच चकाकताना मनःचक्षूंसमोर दिसतात. मन अचंबित होतं. मागे वळून पाहताना आज आठवतं, किती क्रूरपणे त्या स्वातंत्र्यवीरांची मानहानी सत्ताधीशांनी हेतुपूर्वक केली; किती किटाळं त्यांच्यावर निव्वळ सूडबुद्धीने लिंपली गेली! त्या सर्व ओंगळ कुभांडाला तात्याराव पुरून उरले, हा भाग वेगळा. सावरकरांचा धगधगता आयुष्यपट म्हणजे लखलखीत ज्योतींची अक्षय दीपमाळच जणू.

मी लेखक आहे. माझी लेखणी हरकामी असली तरी माझा हात कलावंत- लेखकाचा आहे, असा माझा दावा आहे. माझ्या साहित्यसंसारात त्यापलीकडे काहीही नाही. मात्र त्याच वेळी शेजारच्या धावपट्टीवर बाजी मारून गेलेला विनायक दामोदर सावरकर नावाचा योद्धालेखक कुणाच्याही मर्जीची वा पसंतीची पर्वा न करता स्वतःच्या बुद्धीला पटलेल्या अपराजित तत्त्वांच्या प्रचारासाठी आपली बाहुबली लेखणी राबवून कृतार्थ झाला होता, हेही मला माहीत आहे. मी सावरकरांचं देणं लागतो, कारण ज्या मराठी भाषेत मी बोलतो आणि लिहितो, त्या भाषेला त्यांनी समर्पक अशा अर्थवाही शब्दांची मौलिक रत्नं पुरवली. मराठी भाषा त्यांनी समृद्ध नि सुंदर केली.

वीर सावरकरांनी नव्याने तयार केलेले शब्द नुसते आठवून पहा: दिनांक, बोलपट, महापौर, रंगपट, रंगावृत्ती, स्थायी समिती, स्वाक्षरी, स्थानक, आयुक्त, कोषाध्यक्ष, प्रेक्षागृह, दिनदर्शिका, धनादेश… कसं सुचलं असेल त्यांना हे सोपं शब्दभांडार? सावरकरांच्या अगोदर हे शब्द मराठीत अजिबात नव्हते. आज ते आपल्या रोजच्या व्यवहारात विरघळून गेले आहेत. सानेगुरुजी, गो. नी. दांडेकर आणि के. नारखेडे यांनी बोलीभाषेतली सुकुमार शब्दफुलं प्रमाण ग्रांथिक भाषेत बेमालूम गुंफिली. मात्र, संस्कृत भाषेचा आधार असलेले सर्वस्वी नवे मराठी शब्द निर्माण करण्याची अमोघ कामगिरी एकट्या तात्यारावांनीच केली.

सावरकरांचे दिनांक, महापौर, स्थानक, मध्यंतर, आयुक्त, बोलपट, हे सोपे नवे शब्द थेट तळागाळापर्यंत झिरपत गेले. लोकांनी ते आपलेसे केले. राष्ट्रहितावर अहोरात्र गस्त घालण्याचं कर्तव्यकर्म एका बाजूला जीव तोडून करीत असतानाच, हिंदूसंघटक सावरकरांनी लेखनयज्ञ तर मांडलाच, शिवाय ज्ञानेश्‍वर, तुकाराम, सोहिरोबांच्या मराठी भाषेच्या अंगाखांद्यावर नव्या चपखल शब्दांचं हातवीणीचं महावस्त्र घातलं, यातली धन्यता केवळ अपूर्व आहे! म्हणून समस्त मराठी साहित्यसेवकांच्या वतीने तात्यारावांना मी दंडवत घालतो.

- रवींद्र पिंगे

Main Page

Personal tools