Archive for the 'मराठी भाषा/संस्कृती' Category

पावरबाज

Monday, April 2nd, 2007

स्वशक्तीची जाणीव नसणे हा गुन्हा मानला जावा. पण इतरांच्या शक्तीची खिल्ली उडवणे हा गुन्हा मानला गेला तरच. ह्या कलमाअंतर्गत “तुम्ही स्वत:ला कोण समजता?” हा प्रश्न ह्या गुन्ह्याचे लक्षण मानले जावे. हल्लीच आमच्या एका वक्तव्यात आम्ही “मराठीच्या वर्धापनासाठी असे करणे आवश्यक आहे” असे एका संकेतस्थळावर विधान केल्यावर त्या संकेतस्थळाच्या एका जुन्या नागरीकाचा असा प्रतिसाद आला: “स्वत:च्या शक्तीविषयी तुम्हाला हा भ्रम झालेला दिसतोय.” आम्ही ते फारच मनावर घेतले, आणि हा भ्रम कसा दूर करावा, स्वत:ला तुच्छ लेखणे (आणि त्याला स्वत:चा विनय वगैरे म्हणवून घेणे) हे आम्हाला कसे शक्य होईल, ह्याचा विचार करतच आम्ही निद्राधीन झालो. परंतु आम्ही एक चूक केली. सकाळी गाढ झोपेतून जागे करण्यासाठी आम्ही अलार्म (ह्याला मराठीत प्रात:जागरध्वनी म्हणावे काय? तेलगू भाषेत ह्यासाठी काय शब्द आहे?) लावून आमचा भ्रमणध्वनी उशीलगत ठेवला.

रात्रीचे २ वाजले असतील. आमचा भ्रमणध्वनी खणखणला. अर्थात आमच्या भ्रमणध्वनीचा खणखणस्वर (डायल टोनला मराठीत काय म्हणावे बरे?) आम्ही बदलून श्री गुलजारजींच्या “कजरारे कजरारे” ह्या सुंदर कवितेत रुपांतरीत केलाय. (विशेषत: त्यातील “जुडवा नैना” ह्या शब्दद्वयांविषयी आम्ही प्रसन्न आहोत. तिरळ्या लोकांनी क्षमा करावी.) “शिंची काय कटकट आहे” असे म्हणून आम्ही भ्रध्वनीवर आलेला क्रमांक बघितला. सुरुवातीचे दोन अंक ९१ असे बघितल्यावतर आमची झोप खाडकन उघडली. असे दूरध्वनी नेहमीच वाईट बातम्या घेऊन येतात. आणि चांगल्या बातम्या झोपेत बऱ्या वाटत असल्या तरी वाईट बातम्या मात्र झोपतही आम्हाला असह्य होतात. त्यामुळे आम्ही नेहमीच जागे होतो.

हृदयाची वाढलेली धडधड, छातीच्या उजव्या बाजूत (डावी बाजू आम्ही विशेष जपतो) छोटीशी कळ, वगैरे सगळे सहन करत आम्ही भ्रध्वची “बोला” ही कळ दाबतो. (’टॉक’ ला ‘बोला’ असेच म्हणतात ना? की तेलगूतला बोलुतिस्कु असा शब्द वापरावा? हल्ली ज्ञानेश्वर की सावरकर असा एक वाद आमच्या मनात धुमाकूळतिस्कु घालतोय!) थरथरत्या आवाजात “हलो” म्हणतो. “मी वरद पावर बोलतोय”. रोलरकोस्टर मध्ये आपण आता सहाशे फूट खाली आदळणार असे वाटत असताना,२०० फुटावर एक वेगळाच वक्र मिळावा, असे आम्हाला वाटले.

“हो का? नमस्कार.” माझ्या तोंडून कसेबसे उद्गार बाहेर पडतात, तोवर वरदजींनी आपला पट्टा सुरू केला असतो. ही व्यक्ती कामात अगदी व्यस्त आहे, हे दाखवण्यात इतकी कुशल का आहे, ह्याची तीव्र जाणीव मला होते. पण तरी त्यांचे बोलणे खंडित करून मी “नमस्कार, आदरणीय वरदचंद्र रावजी पावरजी”, असे उद्गारतो. पण त्यातल्या शेवटच्या ‘जी’ ला छेद देत वरदजी जणू मला खोडूनच काढतात. “तुमच्या **** ह्या स्थळावर मागे ह्या रावजी वगैरे विषयी वाचले होते.” (अरे बापरे ! वरदजी ह्या अशा कुचाळक्या वाचतात ? कृषीक्षेत्रात गुंतवणूक करायला नकोच आता ! - स्वगत) “तेव्हा तू मला वरदराव असे संबोधलेस तरी चालेल. नाहीतरी त्या **** संकेतस्थळावर कुणालाही उगाच काका-मामा बनवत असतोस ना?” अरे बापरे (पार्ट-२) ! आणि ४२ वर्षाच्या लोकांना काका असे संबोधल्याने माझे आता त्या (आणि इतर) संकेतस्थळावर कायमचे वैरी झाले आहेत, हे वरदजींना कळले असेल? असा विचार माझ्या मनात येताच, वरदजींनी तिकडून तोफ डागली: “जळगावला पाणी का नाही, ह्याचे उत्तर तुला त्यातच मिळेल! कारण तेथे तुमच्या झाडीपट्टीला झोपडपट्टी समजणारे लोक राहतात.” वरदजींना “मनकवडे” म्हणावे की “मनेच्छेषु” ह्या विचारात विलमिंग्टनची (नॉर्थ कॅरोलायना) दूरध्वनीसूची बघण्याचा विचार करत असतानाच वरदजींची विचारणा आली: “तुमच्या त्या नवीन **** संकेतस्थळावर माझ्याविषयी असे विचार व्यक्त होऊ नयेत, ह्यासाठी काय करणार आहेस?”

खरं सांगू ? की नेहमीप्रमाणे वेळ मारून नेऊ? कधी नव्हे ते सगळे बळ एकवटले. “पावरसाहेब, ते संकेतस्थळ माझे नाही हो. माझ्या लेखनाचे देखील तेथे संपादन होते, ह्यावरूनच काय ते समजा. माझ्याविषयी तिथे जे काही लिहून येते, ते मीदेखील थांबवू शकत नाही. मग तुमचे मी कसे रक्षण करू?” ह्यावर पावरसाहेबांनी शांत व्हावे की नाही? ते तर माझ्यावर उखडलेच! “तू स्वत:ची आणि माझी तुलना करतोस काय रे भाड्या?” (बारामतीकरांना चांगल्या शिव्या शिकवाव्यात ह्यासाठी चाटे क्लासेस ने तेथे वर्ग उघडावे, असा विचार मनात आला. किंवा तात्या **करांकडे शिकवणी तरी लावावी.) “तुला स्वत:च्या शक्तीचा भ्रम झालाय, हे त्या **** संकेतस्थळावरचा **** म्हणतो, ते खरेच म्हणावे लागेल.” पावरसाहेबांना ज्ञानेश्वरीत इतका इंटरेस्ट आहे, हे माहिती नव्हते.

“वरदजी, आपल्याविषयी चांगले म्हणता येईल असे संकेतस्थळ का उघडत नाही आपण?” मी कसाबसा एक प्रयत्न करून पाहिला.

“आणि, ड्रुपैल ५ चे मराठीकरण कोण करणार रे भाड्या?” (तात्या, आपली ठाण्याव्यतिरीक्त कुठेही शाखा नाही - किंवा आम्ही आणखी कुठल्याही संकेतस्थळाच्या स्पर्धेत नाही- अशी विधाने करू नका बुवा. बारामतीत उत्कृष्ट संधी आहे.)

आता ह्या प्रश्नाचे उत्तर मी काय देऊ ? ****.ऑर्ग च्या चालकांनी ड्रुपॅल५ चे मराठीकरण केले आहे. ड्रुपॅल ही मुक्तस्त्रोत आज्ञावली आहे. त्याचा फुकट उपयोग केल्यानंतर त्यात केलेल्या सुधारणा इतरांसाठी फुकट वितरीत कराव्यात. कृपया कराल ?

वरदरावांच्या दूरध्वनीचे काय उत्तर द्यावे हे आम्हाला तोवर कळणार नाही.

स्पर्धेचे फळ

Monday, March 26th, 2007

स्पर्धा हे बऱ्याच समस्यांचे उत्तर आहे. भारतातली जुनी समाजवादी अर्थव्यवस्था १९९१ मध्ये खारीज करून सध्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांनी स्पर्धेवर आधारित अर्थव्यवस्था (ह्याला पूर्णपणे भांडवलवादी म्हणता येणार नाही, तरी) भारतात आणली, आणि भारत आज त्याची चांगली (आणि थोडी वाईटही) फळे चाखतो आहे. पण मॅक्रोइकॉनॉमिक्स (प्रतिशब्द?) हा माझा विषय नाही. संकेतस्थळे हा माझा आवडता विषय आहे, आणि सध्यातरी मराठी संकेतस्थळे हा विशेष आवडीचा विषय!

मराठी विश्वजालावर आणण्यात मायबोली यशस्वी ठरली. हा समुदाय जमवण्यात अजय गल्लेवाले ह्यांना प्रथमकर्त्याचा फायदा (फर्स्ट मूव्हर ऍडव्हांटेज) मिळाला. माझ्या ओळखीचे अनेक लोक अद्याप मायबोलीवर आहेत. कारण त्यांचे मित्र/मैत्रिणी मायबोलीवर आहेत, त्यांचे बरेचसे लिखाण मायबोलीवर आहे. त्यापेक्षाही अधिक महत्वाचे म्हणजे मायबोलीने त्यांच्या विवक्षित अक्षरपद्धतीने जणू त्यांचे लिखाण कुलुपबंद केले आहे. सध्याच्या प्रमाणित अक्षरपद्धतीत (युनिकोडमध्ये) ते आणायला खूप त्रास होईल, म्हणून ते लोक अद्याप त्याच जुन्या पद्धतीला सोडायला तयार नाहीत.

मायबोलीवरच्या वेलणकरांनी मनोगत सुरू करून मायबोलीकरांना मायबोलीवरच व्यक्तिगत निरोप पाठवून मनोगतावर खेचण्याचा प्रयोग केला. काही मायबोलीकरांना ते अनैतिक वाटले. साहजिकच आहे. आपला समुदाय फोडण्याचा प्रयत्न आपल्याच समुदायावर होतोय, याबद्दल खेद वाटणे मी समजू शकतो. पण त्या मायबोलीकरांना अशा स्पर्धेतून मराठीचे विश्वजालावर महत्व वाढत आहे, असा दृष्टिकोण घेता आला नाही, ह्याचा मला खेद होतो.

मनोगतावर गेल्या वर्षात जवळपास ७-८ महिने मी सक्रिय होतो. मनोगताच्या तांत्रिक आणि प्रशासकीय समस्या सुरू झाल्या, त्या समस्यांचे कारण त्यांची प्रशासकीय धोरणे आहेत, हे स्पष्ट झाले, आणि मी अशा कवडीचुंबक स्थळावर का वावरतोय, ह्याचा मला दृष्टांत झाला. तेव्हापासून मी मनोगताला नवीन पर्याय निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील होतो. त्या दृष्टिकोणातून हालचालीही सुरू केल्या, आणि तशातच उपक्रम हे नवीन संकेतस्थळ सुरू झाले. ह्या संकेतस्थळासाठी ऑर्कुट मध्ये सदस्यांना निमंत्रित करण्यात आले, हे मला नंतर कळले. नंतर शोध घेतला, तेव्हा हे स्थळ मनोगताच्या एका जुन्या सदस्याने निर्माण केले, असे समजले. ह्या संकेतस्थळाची प्रशासकीय धोरणे काय असतील, ह्याविषयी मी शोध घ्यायला सुरुवात केली. आणि संकेतस्थळाच्या चालकाने आमच्या याहू! गटावर स्वत:हून विरोप लिहून ही धोरणे स्पष्ट केली. सदस्यांच्या साहित्यावर चालणाऱ्या संकेतस्थळाच्या चालकाने स्वत:ला प्रशासक अथवा व्यवस्थापक म्हणवून घेऊ नये, हे समजण्याची शक्ती त्या चालकामध्ये आहे, हे समजून मी अधिकच समाधानी झालो. तेव्हापासून सदर संकेतस्थळाच्या चालकाशी बरेचदा विरोपाद्वारे संपर्क साधला आहे, आणि आजवर त्याची त्वरित आलेली उत्तरे मला खूपच समाधान देऊन गेली आहेत. (मी मनोगतावर सक्रिय असताना अशाच प्रकारचे सहकार्य मी मनोगताच्या “प्रशासकांना” देऊ केले होते, परंतु त्यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले हे येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.)

मी आणि माझे पूर्वमनोगती मित्र मराठी संकेतस्थळांसाठी नवीन परिमाण सिद्ध करण्यासाठी सज्ज आहोत. उपक्रम सारख्या स्थळांना आमची मदत व्हावी आणि स्पर्धेतून मराठीला विश्वजालावर महत्वाचे स्थान मिळावे ह्यासाठी जे काही करावे लागेल, ते करण्यास आम्ही उत्सुक आहोत. उपक्रमाचे सदस्य व्हा आणि आमच्या समुदायात सामिल व्हा. लवकरच मी एका महत्वाच्या नवीन मुक्तस्त्रोत प्रकल्पाची घोषणा तिथे करणार आहे.

त्यापेक्षाही अधिक महत्वाचे म्हणजे, असे प्रकल्प कायमस्वरूपात चालू रहावेत, म्हणून त्यांना उत्तेजनाची आवश्यक आहे. हे उत्तेजन आर्थिक आणि साहित्यातून असते. आर्थिक उत्तेजनाविषयी सध्याच आवश्यकता नाही, पण सदस्यसंख्येची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील आणि बाहेरच्या मराठी संस्कृती जपण्याची जबाबदारी असणाऱ्या संस्थांनी (उदा. महाराष्ट्र मंडळे) अशा प्रयोगांना सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यांना मी विनंती/आवाहन करतो, की ह्या संकेतस्थळाला सहकार्य करावे.

माझ्या अनुदिनीचे बरेचसे वाचक परदेशी आहेत, असे माझे विदागार मला सांगते. त्यांनी आपापल्या मराठी मंडळांना ह्या संकेतस्थळाविषयी सांगावे, आणि अशा संकेतस्थळांच्या वर्धनात त्यांचे योगदान कसे महत्वाचे ठरू शकते, ह्याची कल्पना द्यावी. उदाहरणार्थ, स्थानिक मराठी मंडळांच्या कार्यक्रमाच्या जाहिराती अशा संकेतस्थळांवरील नेमक्या समुदायाला (टार्गेटेड ऑडियन्सला) पोहोचू शकतात, हा एकमेव मुद्दा अशा सहकार्यासाठी उपयुक्त ठरू शकेल.

उपक्रम ह्या संकेतस्थळाच्या नावावरून ह्या चालकाला काय करायचे आहे, ह्याचा मी जो आडाखा बांधला होता, तो त्याला पाठवलेल्या विरोपाच्या उत्तरात त्याने खरा ठरवला आहे. मराठी आणि विश्वजाल तंत्रज्ञान ह्यांचे अभूतपूर्व मीलन घडवून आणणे, ह्या उद्देश्याने प्रवृत्त असलेल्या संकेतस्थळाच्या चालकाला जितके उत्तेजन द्यावे तितके कमीच. ह्या भावनेने प्रेरित होऊन त्याला शक्य तितके सहकार्य करण्यास मी कटिबद्ध आहे. आपले काय मत आहे?

समुदायातील विषारी लोक

Thursday, March 15th, 2007

संगणक क्षेत्रात काम करणारा/री प्रत्येक व्यक्ती आता मुक्तस्त्रोत आज्ञावलींशी परिचित असायलाच हवा/वी. विश्वजालाचा साधारण वाचक जरी ह्या नामाभिधानाविषयी अनभिज्ञ असला तरी, ह्या अभूतपूर्व सुविधेसाठी मुक्तस्त्रोत प्रणालींना त्याने/तिने श्रेय द्यायलाच हवे.

असे मुक्तस्त्रोत प्रकल्प चालवणारे लोक असतात तरी कोण ? माझ्या-तुमच्यासारखेच लोक. आर्थिक बाबी प्रगतीच्या आड येऊ नयेत असे मनापासून वाटणारे लोक. जगात सकारात्मक बदल घडवून आणावा, असे वाटणारे लोक फक्त आर्थिकदृष्ट्या विवंचित राहू नयेत, असा विचार करणारे लोक.

(मी नुकत्याच सुरू केलेल्या exmanogati ह्या याहू गटाचे सदस्य आता माझ्या विचारधारेशी परिचित झालेले आहेत, त्यांना कळलेच असेल, की मी लवकरच सुरू करीत असलेल्या दोन मुक्तस्त्रोत प्रकल्पांची ही प्रस्तावना आहे.)

विश्वजालाच्या पहिल्या आवृत्तीत ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करण्यासाठी दुसऱ्या आवृत्तीत समुदायांवर भर देण्यात आला आहे. समुदाय म्हणजे कम्युनिटी. विश्वजालाच्या ह्या नवीन आवृत्तीत महाजालाच्या मूळ उद्देशांकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मायस्पेस, अनुदिन्या, फ्लिकर ह्या सगळ्या यशस्वी संकेतस्थळांचे उद्देश्य एकच. समुदायवर्धन.

परंतु ह्या नवीन आवृत्तीच्याही आधी मुक्तस्त्रोत आज्ञावलींवर काम करणाऱ्या आम्ही लोकांनी समुदायवर्धनाच्या तत्वांविषयी खूप विचार केलाय. समुदाय कसा सुरू करावा, कसा वाढवावा, ह्या कामात येणारे अडथळे कसे उल्लंघावे, हे सगळे प्रत्यक्ष अनुभवातून आम्ही शिकलोय.

ह्याचेच एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे, सबव्हर्शन ह्या मुक्तस्त्रोत आज्ञावलीच्या निर्मात्यांनी नुकतेच गूगलमध्ये दिलेले भाषण. ह्या भाषणाचा मूळ विषय हा देखील खूप महत्वाचा आहे. प्रत्येक मुक्त समुदायात काही विषारी लोक येतात. ते कसे ओळखावे, आपला समुदाय अशा विषारी लोकांपासून कसा वाचवावा, ह्याविषयी हे भाषण आहे.

माझ्या स्वत:च्या अनुभवातून सांगतो. असे (म्हणजे भाषणात वर्णन केलेले) अनुभव वारंवार येतात. अगदी एका संकल्पनेभोवती घट्ट बांधलेल्या समुदायात देखील.

आम्ही नवीन मराठी समुदाय निर्माण करण्यात गुंतलोय. त्या समुदायाला अशा विषारी लोकांपासून वाचवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानातून खंदक बांधणार आहोत. असा खंदक तंत्रज्ञानातूनच बांधणे आवश्यक आहे. सामाजिक बांधिलकी आणि असे खंदक परस्पर विरुद्ध आहेत. उदाहरणार्थ, शिवराळ भाषा. अशी भाषा समुदायाच्या बहुतेक सदस्यांना समुदायातून बाहेर पडण्याविषयी प्रवृत्त करते. आमच्या काही नावडत्या संकेतस्थळांनी त्यासाठी संपादनाचा मार्ग अवलंबलेला आहे. परंतु अशा मार्गांनी काहीही साध्य होत नाही, हे आमच्या लक्षात आले आहे. ह्या संकेतस्थळांनी तेथे इंग्रजी संदेश येऊ नयेत, ह्यासाठी तंत्रज्ञानामार्फत ९०% देवनागरीची अट घातली. अशा संकेतस्थळाच्या भविष्यवेत्त्या (व्हिजनरी) चालकांना शिवराळ भाषा टाळण्याचा इतका सोपा उपाय कळलेला नाही ह्याचे नवल वाटते (मी अनेक माध्यमातून हा सोपा उपाय त्यांच्या डोक्यात शिरवण्याचा प्रयत्न केला होता हे आवर्जून सांगावेसे वाटते). असो. अशा संकेतस्थळांच्या चालकांमुळे आम्हाला उत्कृष्ट समविचारी सदस्य मिळालेत. हेही नसे थोडके.

आधीच्या संकेतस्थळांच्या चुकांतून शिकणे हे आपले कर्तव्यच आहे, नाही का?

मुक्त विरुद्ध फुकट

Tuesday, February 27th, 2007

मराठी संकेतस्थळांमध्ये एक नवीन परिमाण (स्टॅंडर्ड) तयार करण्यासाठी exmanogati हा याहू गट तयार केल्यापासून दिवसाकाठी किमान दोन नवीन सदस्य तरी त्यात दाखल होतायत. कुठल्याही संकेतस्थळाचे यश हे किती सदस्य आहेत ह्यावरून बाजारात ठरत असले, तरी त्या सदस्यसंख्येपेक्षा त्यात किती सदस्य कृतिशील आहेत ह्याला जास्त महत्व आहे, हे सर्वांनाच मान्य होईल. मनोगत ह्या संकेतस्थळावर मागे मी एकदा (प्रशासकांच्या कुठल्याही साह्याविना) हे आकडे जमवले होते. त्यात दहा टक्क्यांपेक्षा जास्त सदस्य लिहितात असे दिसून आले होते, त्यामुळे मनोगतावर माझे प्रेम जडले होते हे नमूद करायला हवे. मी स्थापन केलेल्या ह्या याहू गटात त्यापेक्षा अधिक टक्के लोक सक्रिय आहेत. आणि मुख्य म्हणजे त्यातील बरेच लोक ह्या गटाची क्रियाशीलता वाढवीत आहेत, हे मुद्दामून सांगावेसे वाटते. इतर मराठी संकेतस्थळांची तिरडी बांधायला हे सदस्य उत्सुक नाहीत, आणि हेच महत्वाचे. कारण ह्या सदस्यांना स्पर्धेचे महत्व कळले आहे. स्पर्धा सर्वच स्पर्धकांना उत्तेजित करते. आणि म्हणून स्पर्धेचे अतिशय महत्व आहे.

स्पर्धा निर्माण करणे हे लोकशाहीचे मूळ स्वरूप आहे. एकाधिकार (मोनॉपोली) हा स्पर्धेचा शत्रू. एकदा का एकाधिकार निर्माण झाला, की स्पर्धा संपली, आणि त्यामुळे प्रगती संपली. मराठी माध्यमातून चर्चेच्या स्वरूपात मनोगताने एकाधिकार निर्माण करून स्पर्धा संपवली. ह्यातून जे अनिष्ट व्हायचे तेच झाले. चर्चाखोरांचे विचार मनोगताच्या प्रशासकांच्या विचाराशी संमत असतील तरच प्रकाशित व्हायला लागले (जरी त्या संकेतस्थळाचे लेखी धोरण तसे स्पष्ट व्यक्त करीत नसले तरी).

मला काही लोकांनी विचारलेय, की तुम्ही नवीन संकेतस्थळ करण्यासाठी जे चर्चासत्र उघडले आहे, ते मुक्त ठेवले आहे. त्यात मनोगत किंवा इतर मराठी संकेतस्थळाच्या संचालकांनी प्रवेश घेतला, तर त्यांना आपल्या कल्पना फुकट वाचायला मिळतील. आणि मग आपल्या नवीन संकेतस्थळाच्या निर्मितीचे काही कारणच उरणार नाही.

माझे त्यावर मत असे, की मनोगतासारख्या संकेतस्थळांना खरेच मराठी भाषेच्या उन्नतीची काळजी असती तर आजवर त्यांनी आपली धोरणे मुक्त ठेवली असती. विचारांच्या व्यक्तीकरणावर बंदी आणण्याचा असा केविलवाणा प्रयत्न करून आपल्या संकेतस्थळाची वाट लावली नसती. हा फक्त तांत्रिक तृटींचा प्रश्न नाही, तर हा प्रश्न आहे तुमच्या विचारसरणीचा. पाश्चिमात्य संस्कृतीचा अंगिकार करताना, त्या संस्कृतीच्या मुख्य धोरणाचा, म्हणजे विचारस्वातंत्र्याचा धिक्कार करणे, ह्या भूमिकेमुळेच विचारस्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून तयार झालेल्या आज्ञावलींचा दुरूपयोग करणे. आणि त्यातूनच ह्या आज्ञावलींच्या तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष होते. आणि मग विदागाराचा अपघात वगैरे सबबी द्याव्या लागतात.

मनोगत हे संकेतस्थळ दृपॅल ह्या मुक्तस्त्रोत आज्ञावलीचा वापर करून बनवलेले आहे. ही आज्ञावली ज्यांनी बनवली, त्यांच्यापुढे एकच ध्येय होते. ह्या स्वरूपाच्या इतर व्यावसायिक आज्ञावलींसाठी एक मुक्त पर्याय उपलब्ध करून देणे. हे त्यांनी स्वत:चा वेळ फुकट देऊन केले. अशा प्रकारचे उच्चतम काम करणाऱ्या लोकांना तुम्ही सांगितले, की बाबा रे, तु स्वत:चा वेळ फुकट देऊन ही मला मदत केली आहेस, ती मी माझी हुकूमशाही लादण्यासाठी वापरणार आहे, तर त्याला काय वाटेल? मुख्यत: त्याची बुद्धिमत्ता तुम्ही फुकट वापरताय, त्याच्या इच्छेविरुद्ध, हे तुम्हाला कळत नाही का?

माझ्या (आणि माझ्यासारखा विचार करणाऱ्या सर्वांच्या) कल्पना ह्या सर्वांना मुक्तपणे उपलब्ध आहेत. फक्त त्यांनी मुक्त आणि फुकट ह्या शब्दांच्या अर्थातला फरक लक्षात घ्यायला हवा.

लोकशाही कठीण आहे

Friday, February 23rd, 2007

चार-पाच वर्षांपूर्वी एक इंग्रजी सिनेमा पाहिला होता. आता नाव आठवत नाही, पण एका काल्पनिक अमेरिकन प्रेसिडेंटविषयी हा सिनेमा होता. हा प्रेसिडेंट विधुर असतो, आणि त्याच्या अध्यक्षपदाच्या काळात त्याचे एका लॉबीईस्टशी प्रकरण (अफेअर) असते. आणि ही लॉबीइस्ट असते पूर्णत: मुक्तीवादी (लिबरल). म्हणजे देशाचा झेंडा हे फक्त एक चिन्ह आहे असे मानणारी. त्यामुळे हा झेंडा देशाच्या सरकारचा विरोध करण्यासाठी जाळणारी. विरोधी पक्षाचे लोक त्या अफेअरचा फायदा घेतात. त्यावेळी हा काल्पनिक प्रेसिडेंट पत्रकार परिषद बोलावून जे भाषण देतो, ते मात्र मनात ठसले आहे.

लोकशाही म्हणजे स्वत:वर होणाऱ्या टीकेला त्या लोकशाही चाकोरीतच सामोरे जाणे. हे खूप कठीण आहे. अगदी ती टीका वैयक्तिक वैमनस्यातून केलेली असली तरी. टीका करण्याचा इतरांचा अधिकार नाकारणे, हे लोकशाहीत बसत नाही. त्यामुळे लोकशाही कठीण आहे. टीका करण्याचा अधिकार नाकारणे हे हुकूमशाहीच्या दारातले पहिले पाऊल. मग त्या टीकेच्या मागे कितीही क्षुल्लक कारणे असू देत.

वाचकांपैकी अनेकजण स्वत:च्या अनुदिन्या लिहितात. अनुदिनी सार्वजनिक स्वरूपात लिहिण्यामागचा उद्देश हाच, की लोकांनी ती वाचावी, त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात. असे असताना, फक्त एखादी प्रतिक्रिया आपल्या विरुद्ध आहे, म्हणून ती प्रकाशित करू नये, हे लोकशाहीचे नाही, हुकूमशाहीचे लक्षण आहे. आता तुम्ही म्हणाल की, मग तू तुझ्या अनुदिनीवर मॉडरेशन का ठेवलस? ह्याचे कारण यंत्रीकृत व्हायाग्राच्या जाहिराती. का कोण जाणे, मला किंवा माझ्या अनुदिनीच्या वाचकांना व्हायाग्राची आवश्यकता असावी असे ह्या स्पॅमर्सना (मराठी प्रतिशब्द आवश्यक) वाटते. त्यामुळे माझ्या लेखांना दिवसाकाठी शेकडो स्पॅम प्रतिसाद येतात, म्हणून ही योजना. अशा जाहिरातींव्यतिरीक्त मी आजवर एकही प्रतिसाद (माझ्यावर कठोर टीका करणारा असला तरी) रद्द केलेला नाहीये. गेले दोन-तीन लेखच बघा, वाचकांना ह्याची खात्री पटेल.

माझ्या सध्याच्या विचारांत हे विचार मुख्यत: अंतर्भूत आहेत, ह्याचे कारण की मी नवीन मराठी संकेतस्थळासाठी एक तृणमूल (ग्रास-रूट) संस्था स्थापन करण्याच्या मागे लागलोय. मनोगत ह्या चावडीवर माझे पूर्वी वास्तव्य होते. ही चावडी आता हुकूमशाहीने चालवण्यात येते. प्रशासकांना जे काही योग्य वाटते, तेच ह्या चावडीवर प्रकाशित होते. ह्या प्रशासकीय हुकुमशाहीचे नुकतेच घडलेले एक उदाहरण देतो.

मनोगतावरचे माझे एक आवडते लेखक “सर्वसाक्षी” ह्यांनी चिनी नववर्षाविषयी “छून च्ये” हा लेख लिहिला. त्यावर काल एक मनोगती “चित्त” ह्यांचा एक प्रतिसाद आला. “मला वाटलं की छून च्ये हा कुणी चिनी हिंदुत्ववादी क्रांतिकारी आहे.” मी हा प्रतिसाद वाचून ठो ठो हसलो. कारण सर्वसाक्षी हे एकतर चीनविषयी लिहितात, किंवा क्रांतिकाऱ्यांविषयी लिहितात. त्यांच्या ह्या दोन विचारधारांतील विसंगती दाखवून देण्याचा मी आजवर बरेचदा प्रयत्न केलाय. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकाऱ्यांविषयी आदर असणारी व्यक्ती चीनमधील गळेचेपू धोरणाला कशी पाठींबा देऊ शकते, हे मला आजवर न सुटलेले कोडे आहे. परंतु चित्त ह्यांनी त्यांच्या विनोदी प्रतिसादांतून ते इतके चांगले व्यक्त केले होते, की मी समाधानी होऊन ठो ठो हसलो देखील. त्याच वेळी माझ्या मनात आले, की हा प्रतिसाद प्रकाशित करून मनोगताचे प्रशासक त्यांच्या मूळ धोरणापासून दूर जातायत. आज बघितले, तर तो प्रतिसाद नाहिसा झाला होता. चित्त ह्यांनी तो प्रतिसाद काढून टाकावा अशी विनंती केली असेल, तर ठीक आहे. त्याविषयी त्यांच्या स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे. परंतु ते येईपर्यंत मला मनोगताच्या प्रशासकांच्या आजवरच्या धोरणावरून कळले ते असे, की सर्वसाक्षीसारख्या लेखकांचा रोष ओढवून घेऊ नये म्हणून प्रशासकांनी स्वत:हून तो प्रतिसाद गाळून टाकला. ही झाली हुकूमशाही.

त्याला पूर्ण लोकशाही पर्याय उपलब्ध करून देणे हे माझे ध्येय आहे. ह्यासाठी प्रेरित असणाऱ्या लोकांची मला गरज आहे. त्यासाठी मी जो याहू गट तयार केलाय, त्याचे नाव दुर्दैवाने exmanogati असे ठेवलेले आहे. त्यात मूळ भूमिका अशी की मनोगताने ज्या चुका केल्या त्याची पुनरावृत्ती व्हायला नको, आणि त्या चुकांची जाणिव, जे लोक मनोगतावरून बाहेर पडलेत, त्यांना आहे. हा गट फक्त जे मनोगतावरून बाहेर पडले त्यांच्यासाठीच नाही. जे मनोगतावर सध्या सदस्य आहेत (जसा मी देखील “वाचनमात्र” सदस्य आहे) परंतु ज्यांना मनोगतापेक्षाही चांगले काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठीदेखील आहे. ह्या प्रयत्नांतून जेव्हा नवीन संकेतस्थळ तयार होईल, त्याची ख्याती फक्त “हे मनोगत नाही” अशी नकारात्मक नसेल, तर मराठी साहित्यप्रेमींच्या सर्व गरजा पूर्ण करणारे एक संकेतस्थळ, अशी असेल.

ह्या संकेतस्थळाची कल्पना सादर करताना, अशा प्रकारच्या संकेतस्थळात ज्यांना रस आहे (stake-holders) त्यांना ह्या नवीन चर्चा-गटाचे मी आमंत्रण दिले. असे बहुतेक लोक स्वत:ची अनुदिनी लिहितात. त्यांच्या अनुदिन्यांवर जाऊन मी त्यांच्या लेखनाला प्रतिसाद म्हणून ह्या चर्चा गटात सामील होण्यासाठी आमंत्रण दिले. त्यातील बरेचसे लोक गटाचे सदस्य झाले आहेत. धन्यवाद. काहींनी वेळेअभावी त्यांना ह्यात सहभागी होता येणार नाही हे कळवले आहे. मी ते समजू शकतो. काही थोड्या लोकांनी मात्र पूर्वीच्या मतभेदांचा बादरायण संबंध लावून वैयक्तिक संबंधांना मूळ ध्येयात अडथळा बनवला आहे. ते कोण आहेत, हे त्यांना हा लेख वाचून कळेलच. त्यांना माझी विनंती आहे, की त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा.

आणखी एक सांगायचे म्हणजे, ह्या पर्यायाविषयी घोषणा करताना, मी लिहिले होते की “अशा प्रकारच्या संकेतस्थळासाठी फक्त दोन हजार डॉलर्स लागतील.” काहींना वाटले, की मी ह्या लेखनातून ह्या नवीन संकेतस्थळासाठी पैसे गोळा करतोय. तसे अजीबात नाही. माझ्या कुवतीनुसार (देवाच्या दयेने वगैरे म्हणत नाहीये, नोंद घ्यावी) इतका खर्च माझ्या खिशातून करावा इतकी माझी क्षमता आहे, अथवा भविष्यात आणखी गरज भासली तर तत्वांशी तडजोड न करता हा निधी गोळा करण्याची माझी क्षमता नक्कीच आहे. आपली गरज आहे, ती बौद्धिक आणि वैचारिक (इन्टलेक्चुअल, फिलॉसॉफिकल) पाठींब्यासाठी.

लोकशाही कठीण आहे. पण जगाच्या आजवरच्या इतिहासातून समाजाच्या उन्नतीसाठी लोकशाही हा एकमेव कालातीत पर्याय आहे हे सिद्ध जाले आहे. मग तो पर्याय देशांसाठी असो, किंवा संकेतस्थळांसाठी.

पूर्वाश्रमीच्या मनोगतींसाठी याहू गट

Thursday, February 22nd, 2007

मनोगताच्या (आगामी) मरणाची पूर्वसूचना देणाऱ्या माझ्या याआधीच्या लेखाला अनेकांचे पाठींबा देणारे प्रतिसाद आलेत. मनोगताला संपूर्ण लोकशाहीवादी पर्याय उपलब्ध करून देण्याची पहिली पायरी म्हणून मी आज exmanogati हा याहू गट सुरू केला आहे. पर्यायी संकेतस्थळाचे स्वरूप कसे असावे याबद्दल आपण तिथे चर्चा करूया. त्या गटाचे सदस्य व्हावे, ही विनंती. (मॉडरेशनची हुकुमशाही मला पसंत नाही, परंतु त्या गटावर व्हायाग्राच्या जाहिराती यंत्रांकरवी टाकल्या जाऊ नये म्हणून लिहिण्यासाठी सदस्य होणे आवश्यक आहे.)

मारुतीचे शेपूट आणि मनोगत

Tuesday, February 20th, 2007

रामायणात एक गोष्ट आहे. हनुमान लंकेत असताना रावणाच्या ताब्यात सापडतो. त्याला शिक्षा करायला रावण त्याच्या शेपटाला आग लावण्याची आज्ञा देतो. पण हनुमान त्याचे शेपूट इतके मोठे करतो, की त्याला आग लावणे अशक्य होते.
(तात्पर्य: एखाद्या माकडालादेखील महाबली राजाशी लढण्यासाठी त्याचा एखादा अवयव कामी येतो. माझेच उदाहरण द्यायचे झाले, तर माझा मेंदू ह्यासाठी समर्थ आहे. शेपूट शोधूनही सापडले नाही. सॉरी मारुती.)

आज ही गोष्ट आठवण्याचे कारण की नुकतेच मी ‘वायर्ड’ नियतकालिकाचे संपादक ख्रिस ऍंडरसन ह्यांचे ‘द लॉंग टेल’ हे पुस्तक वाचले. काही थोड्या लोकप्रिय वस्तू विकण्याऐवजी, कमी लोकप्रिय असलेल्या अनेक वस्तू विकणे, हे आजच्या जगात कसे फायद्याचे आहे, हे पटवून देणारे पुस्तक. ऍमेझॉन, इ-बे, गूगल ह्यांची उदाहरणे बघितल्यास ह्यात न पटण्यासारखे काहीच नाही. परंतु हे मारुतीच्या शेपटाचे अर्थशास्त्र फक्त व्यापारवादी (कॅपिटलिस्टिक) संस्कृतीतच नाही, तर इतर सर्व संस्कृतींत लागू होते हे आज माझ्या डोक्यात चमकल्यामुळे हे लेखन.

वाचकांपैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल, की गेल्या वर्षी मी मनोगतावर बराच ऍक्टिव्ह होतो. दिवसातून अनेकदा मनोगताचे वाचन आणि त्यावर लिखाण व्हायचे. आर्थिक दृष्ट्या म्हटले, तर माझा हजारो डॉलर्सचा वेळ मी गेल्या वर्षी मनोगतावर घालवलाय. गेल्या वर्षीच्या डिसेंबरात मनोगत तांत्रिक आणि सामाजिक बाबींनी बंद पडले (आता कसेबसे सुरू झालेय, पण प्रशासकीय धोरणांमुळे अद्याप मृतवतच आहे), आणि माझे हजारो डॉलर्स वाचले.

माझा तेथील वेळ मला मनोरंजक वाटला असेल (जरी माझ्या वाया गेलेल्या वेळेच्या तुलनेत नसला तरी), परंतु ह्या अनुभवातून मी जे शिकलोय ते त्या वाया गेलेल्या वेळेच्या कित्येक पटीत जास्त आहे. मराठी साहित्याच्या क्षेत्रातही ख्रिस ऍंडरसनचा मारुतीच्या पुच्छाचा सिद्धांत लागू होतो, हे मला मिळालेले महत्वाचे ज्ञान माझ्या वाया गेलेल्या वेळापेक्षा अधिक मौल्यवान आहे. (मनोगताच्या प्रशासकांना अशी तत्वज्ञानाची बैठक असती, तर त्यांची अशी वाईट परिस्थिती झाली नसती, हेही येथे खेदाने नमूद करावेसे वाटते.)

इतर भारतीय व्यवसायांप्रमाणे मराठी साहित्याचा व्यवसायही समाजवादी विचारसरणीत रुतलेला आहे. विश्वजालामुळे प्राप्त झालेल्या संधीचा वापर करण्याची क्षमता त्यात नाही. सुरुवातीला मनोगताचे स्वरूप पाहून मी त्याकडे आकृष्ट झालो ह्याचे कारण की मला वाटले, की समाजवादी गाळातून मराठी साहित्याला बाहेर काढण्याचे काम मनोगत करू शकेल. पण मनोगत प्रशासकांच्या कृतींनी ती आशा धुळीला मिळवली, आणि मी तेथून बाहेर पडलो.

ह्या काळात मी मनोगत प्रशासनाच्या डोक्यात अनेक कल्पना घुसवण्याचा प्रयत्न केला. त्याला अर्थातच यश आले नाही. त्या सर्व कल्पना मनोगतावर माझ्या टोपणनावावर (सर्किट) आहेत.

पण माझ्या मनोगताच्या लेखकवृंदाविषयी ज्या धारणा झाल्यात त्या अजूनही कायम आहेत, कारण त्यांचा मला नुकताच बराच वैचारिक पाठिंबा मिळाला आहे. मनोगताचा (निनावी वावर करणारा) वाचकवृंद (आणि त्यांचा पाठपुरावा करणारा प्रशासकीय समाज) अजूनही समाजवादी विचारांत गुरफटलेला आहे. ज्या समुदायाला मनोगत प्रशासकांनी पाठींबा द्यायला हवा, त्या लेखकवृंदाच्या पाठीत मात्र त्यांनी ‘मॉडरेशन’चा सुरा खुपसला. (माझ्या मते मनोगतासारख्या संकेतस्थळांचे ग्राहक हे लेखक आहेत, वाचक नाहीत.)

असो, जे होते ते चांगल्यासाठीच. मनोगताच्या (आगामी) मरणातून काहीतरी चांगलेच होईल, अशी मला आशा आहे.

मनोगतावरील पूर्वीचे वातावरण पुन्हा निर्माण करण्यासाठी (आणि त्यावर संपूर्ण लोकशाही स्थापित करण्यासाठी) फक्त २००० डॉलर्सची गरज आहे, असे माझे गणित मला सांगते.

माझ्या काही कल्पना आणि माझी साधने सांगतोय (पूर्ण लोकशाहीच्या तत्वावर माझा पूर्ण विश्वास असल्याने, त्यात सुधारणा सुचवाव्यात.)

एक चांगले डोमेन नेम. (मला हे आधीच मिळालेले आहे.)
मराठी टाईप करण्याची मनोगतासारखी सोय (ह्यालाच फक्त पैसे लागणार आहेत, पण ही सोय इतर संकेतस्थळांसाठी सशुल्क उपलब्ध करून त्यातून थोडे अर्थार्जनही होईल. तुमच्या अनुदिनीसाठी मराठी टंकनव्यवस्था हवी आहे का? वर्षाकाठी १०० रुपये दिलेत, तर आम्ही ती उपलब्ध करून देऊ.)
९०% मराठीचा नियम (मनोगतासारखाच)
लाखो वाचकांना एकाच वेळी वाचनाची सुविधा (सध्याच्या तंत्रज्ञानातून सहज शक्य)
लेखकांच्या सोयीसाठी असणारा प्रशासकवृंद (लेखकांची मुस्कटदाबी करणारा नाही. तुम्ही अश्लील लिहिलेत तर तुमचा वाचकवृंद तुम्हाला धुडकावेल, प्रशासकांची ती जबाबदारी नाही.)
लेखकांना त्यांच्या उत्तेजनासाठी आर्थिक फायदा (जाहिरातींतून. यू ट्यूब ने डॅव्हॉसला सांगितलेला उपाय)
पूर्णपणे लोकशाही (लेखकांनाच त्यांचे लेखन बदलण्याचा अधिकार, प्रशासक त्यांच्या सेवेत फक्त)
उत्तम लेखन ठरवण्याचा वाचकांना अधिकार (इतर कुणालाही नाही.)
तंत्रज्ञानात तरबेज प्रशासन (मनोगतासारखा अनुभव पुन्हा कुणालाही येऊ नये)

नवीन काही सोयी:

अनुदिन्यांची सोय. (तुम्ही केलेले लिखाण तुमच्या चाहत्यांना विशेष कष्ट न करता एकाच पानावर बघता येईल)
चाहतागट (फॅन-ग्रुप, कंपूबाजीला उत्तेजन!)
प्रख्यात साहित्यिकांसाठी स्व-प्रशासन (संदीप खरेंच्या लेटेस्ट, अप्रकाशित कविता हव्यात? घ्या, फुकट. आणि त्या पानांवरच्या जाहिरातींचे पूर्ण उत्पन्न खरेंना जाईल. म्हणजे ते आपल्या कविता तेथे प्रकाशित करायला प्रवृत्त होतील.)

आहात तयार ?

(जुन्या मनोगतींसाठी मी एक नवीन याहू गट तयार करतोय. त्यावर चर्चा करून नवीन संकेतस्थळ स्थापनेचा विचार करूयात. ह्या लेखाला प्रतिसाद द्या किंवा मनोगतावर मला व्यनी पाठवा. माझे मनोगतावरील टोपणनाव: सर्किट)

गुप्त राहायचंय ? शक्य नाही!

Thursday, August 24th, 2006

योगायोग म्हणतात तो हाच. मनोगतावर आज मला एका व्यक्तीचा खाजगी निरोप आला. ही व्यक्ती त्या चावडीवर अजूनही टोपणनावानेच वावरते. कदाचित चुकीनेही असेल, पण ह्या व्यक्तीने स्वत:चे खरे नाव त्या निरोपात टाकले. याहू!च्या शोधयंत्रावरून त्या व्यक्तीच्या नावाचा शोध घेऊन मी त्याला त्याच्या बायकोचे आणि मुलीचे नावही सांगितले (अर्थात, नावे बरोबर असली तरी क्रम चुकला होता), तो चकीतच झाला. पण त्यानेही त्याच शोधयंत्राचा वापर करून मला ती नावे कुठे मिळाली असतील ह्याचा शोध घेतला, तेव्हा त्याला कळले असेल की त्याच्याबद्दल किती माहिती सार्वजनिक संकेतस्थळावर उपलब्ध आहे ते. (माझ्याकडे मुलाखतींना येणाऱ्या उमेदवारांची त्यांनी दिलेली माहिती मी अशीच शोधयंत्रावरून चाचपून पाहतो. आणि त्यांची सार्वजनिक शोधयंत्रातून काहीही माहिती मिळत नसेल, तर ती व्यक्ती उमेदवार म्हणून योग्य नाही हीच माझी भावना असते. त्रोटक माहिती कुठलीही माहिती नसण्यापेक्षा जास्त चांगली हेच माझे विचार आजपर्यंत तरी अनुभवातून योग्य ठरले आहेत.)
(more…)

प्रायव्हसी?

Thursday, August 24th, 2006

प्रायव्हसी ह्या इंग्रजी शब्दासाठी मला मराठीत अजूनही योग्य प्रतिशब्द मिळालेला नाही. प्रायव्हेट ह्या शब्दाला खाजगी, किंवा वैयक्तिक हे प्रतिशब्द अनेक जण वापरतात. पण ते शब्द मराठीत वापरले की त्याचा इंग्रजीत पर्सनल असा अनुवाद होतो. पर्सनल आणि प्रायव्हेट ह्या शब्दांत वेगळ्या छटा आहेत. त्या ह्या दोन्ही प्रतिशब्दांतून व्यक्त होत नाहीत.

गुप्तता हा शब्द मीही अनेकदा वापरला आहे. पण त्यातून सीक्रसी हा अर्थ लागतो. कारण गौप्य म्हणजे सीक्रेट. गुप्त हा शब्द कधी सीक्रेट म्हणून तर कधी हिडन (लपलेले) ह्या अर्थाने वापरला जातो. निनावी हा ऍनॉनिमसचा, तर निनावीपणा (नैनाव्य?) हा ऍनॉनिमिटीचा प्रतिशब्द. मराठीत अजूनही प्रायव्हसी ला योग्य प्रतिशब्द नाही हे खेदाने सांगावेसे वाटते. मराठी लोकांना प्रायव्हसीची आवश्यकता नाही का ?

मराठी विकीपीडियाचा वर्ग

Monday, August 14th, 2006

१२ ऑगस्ट २००६ ला, महाराष्ट्र मंडळ (ममं) बे एरियाच्या वतीने आम्ही, म्हणजे माझा मित्र अतुल तुळशीबागवाले आणि मी, कॅलिफोरनियातल्या सनिव्हेल नावाच्या गावात मराठी विकीपीडियाविषयी माहितीवर्ग घेतला. हा वर्ग महाराष्ट्र मंडळाच्या मंगळागौर कार्यक्रमाला संलग्न घेतला, त्यातच ममं ने उन्हाळ्यात येथे हमखास येणाऱ्या येथील संगणक तंत्रज्ञांच्या आईवडिलांसाठी एक संमेलन (ज्याला मराठीत आपण गेट-टुगेदर म्हणतो) आयोजित केले होते. त्यामुळे मराठी आजी-आबांची संख्या अधिक, आणि मंगळागौर खेळणाऱ्यांची कमी अशी परिस्थिती होती. आम्हालाही हेच हवे होते. कारण ह्या आजी-आजोबांचेच तर आम्हाला सहकार्य हवेय. त्यांना आपल्या मराठी संस्कृतीविषयी असलेली माहिती त्यांच्यासोबतच लुप्त होऊ नये, म्हणून तर मराठी विकीपीडियाचे प्रयोजन आहे.
(more…)