Archive for the 'मराठी भाषा/संस्कृती' Category

उस्ताद ग्यासुद्दिन शमसुद्दिन : एक शापित गंधर्व

Tuesday, August 5th, 2008

परवाच बोलताना कुणीतरी म्हणालं, सगळ्या पेट्रोलपंपांचा संप आहे, म्हणून. आणि माझं मन सुमारे वीस वर्षांपूर्वीच्या भूतकाळात एखाद्या चुकार वासरासारखं ओढलं गेलं. मंडळी, आपलं मन म्हणजे अजब रसायन आहे, बरं का ? कितीही दावणीला बांधलं तरी जिथे जायचं तिथे जातंच. असो, माझ्यापुढे तो हरवलेला काळ उभा राहिला, आणि मन:चक्षूंसमोर प्रतिमा उभी राहिली, ती एक मळकट बनियान, साधारणत: त्याच रंगाचा पायजामा, तोंडात रंगलेलं पान, आणि “अमां मियां, ये गाना वाना तुम्हारे पंडतोंके बसकी चीज नहीं. हमारे बडे अब्बू का गाना सुनो, वो पंडत सब पैर छूते थे उनके.” हे पेटंट वाक्य.

मंडळी, गोंधळलात ना ? पेट्रोलपंपाच्या संपातून हे संगीत वगैरे कसे काय आठवले बुवा ? हा तुम्हाला भेडसावणारा प्रश्न तुमच्या बावळट चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय मला. मंडळी, आपली अभिजात संगीताची परंपरा आहेच तशी थोर. पण उस्ताद ग्यासुद्दिन शमसुद्दिन, हे ह्या परंपरेचे एक शापित पाईक होते, आणि तसंच अजब रसायन होतं. त्याचं काय आहे, की पेट्रोलंपंप, ग्यास सिलिंडरे, वगैरे आम्हा खेड्यातल्या लोकांनी जेव्हा पाहिली देखील नव्हती, तेव्हा आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर “ग्यास एंड ष्टो रिपेर शाप, ७८६” असा हस्तलिखित बोर्ड असलेली एक टपरी होती. त्याखाली “प्रोप्रा. ग्यासुद्दिन शमसुद्दिन” असे खरडलेले होते. आमच्या घरी दोन रॉकेलचे ष्टोव्ह होते. त्यातला एकतरी नेहमीच बिघडलेला असायचा. पण आम्हाला ग्यासुची आठवण यायची, ती दुसराही ष्टो बिघडल्यावर.

“सर्क्या, जा त्या ग्यासूकडून आण ष्टोला पीन मारून, नायतर आज गिळायला काय नाय तुला.” आमची म्हातारी तशी सुगरण. तिच्या हातचा अर्धाकच्चा भात आणि घासलेटचा सुगंध येणारी कढी पिऊन येणाऱ्या ढेकरेची आठवण मला आजही प्रत्येकवेळी पेट्रोल भरताना येते. (ही ढेकर देताना, मी नेहमीच आजूबाजूला विस्तव नाही, ह्याची खात्री करून घेतो.) ष्टोचा पंप आणि माझी पाठ ह्या दोन्ही भगवंताने तिला खास बडवण्यासाठी बहाल केलेल्या वस्तू आहेत, अशी तिची अमाप श्रद्धा होती. त्यामुळे ष्टो दुरुस्ती ताबडतोब व्हावी, म्हणून ग्यासूकडे मी पूर्ण सकाळ घालवत असे.

पण संपाचा काय संबंध ? अजूनही तुमचा चेहरा तसाच बावळट आहे, मंडळी !

अहो, सोपे आहे. घासलेट-पंपांचा संप दर दोन दिवसांतून एकदा असायचा, तेव्हा हमखास घासलेट मिळण्याचे स्थान, म्हणजे ग्यासुद्दिन. दुरुस्तीला आलेल्या ष्टोमधून थोडे थोडे घासलेट ग्यासू बाजूला काढतो, असा एक प्रवाद होता. आणि संप असला, की डब्बल किमतीला विकायचा. काही लोक चांदीचा चमचा चोखत जन्माला येतात, त्यांच्या घरी रॉकेलचे पंपवाले रोज चक्कर मरतात. पण आमचे नशीब असे, की आमच्या ष्टोमधले घासलेट संपायचे, ते नेमक्या संपाच्या दिवशी. आणि मग छोटेसे पात्र घेऊन आम्ही पुन्हा ग्यासूला शरण जात असू.

ग्यासूला ष्टो रिपेर करताना बघणे, किंवा “मियां रुको, अब्बी लाता हूं घासलेट” म्हणून लगबगीने टपरीमागे जाताना बघणे, हे माझ्या बालपणी माझ्या मनावर खोल परिणाम करून गेले. पण त्यापेक्षाही खोल परिणाम म्हणजे, ष्टो रिपेर करताना ग्यासूचे तत्वज्ञान ऐकण्यामुळे झाले. त्याच्या नावापुढे “प्रोप्रा” असल्याने, मला तो प्रोफेसर, प्राध्यापकांपेक्षा काही वेगळा नव्हता. तसे त्याचे खरे नावही ग्यासुद्दिन नव्हते. त्याचे खरे नाव होते “शरीफुद्दिन वल्द शमसुद्दिन वल्द अल्लाउद्दिन वल्द करीमुद्दिन वल्द रहीमुद्दिन.” पण हे सर्व लिहिणे त्या छोट्याशा बोर्डावर शक्य नव्हते. परिस्थितीप्रमाणे आपली जनमानसातली प्रतिमा आपल्याला आपल्या खऱ्या ओळखीपेक्षा वेगळी ठेवावी लागते, हा माझ्या बालपणात मी ग्यासूकडून घेतलेला पहिला धडा. आमच्या छोट्याशा गावात धनिकांकडे नुकत्याच ग्यासच्या शेगड्या येऊ घातल्यावर, त्याचेही रिपेर काम स्वत:ला मिळावे म्हणून शरीफुद्दिनचा ग्यासुद्दिन झाला.

पण ते होणे नव्हते. त्या ग्यासच्या शेगड्या ग्यासूपर्यंत कधीच पोहोचल्या नाहीत. ग्यासबत्त्या मात्र चिक्कार पोहोचल्या. म्यांटल जळले, की ग्यासूची सर्वांना आठवण यायची. आमची आजी तर त्यांना ग्यासूद्दिवेच म्हणायची. पण असे असले, तरी ग्यासूच्या चेहऱ्यावर मला कधी विषाद दिसला नाही. शिलिंडरातला ग्यास चोरून वेगळा काढता येत नाही, हे कळल्यावर त्याने ग्यास रिपेरिंगकडे ढुंकूनही बघितले नाही. उलट तोंडातील पानाची भरभक्कम पिंक टपरीपासून रस्त्यावर उडवून ते प्रकरण त्याने कधीच निकालात काढले होते.

ग्यासबत्तीच्या त्या मिणमिणत्या प्रकाशात टपरीसमोर बसून ग्यासूचे रिपेरकाम बघत, त्याच्याकडून आजवर मी जे काही शिकलो आहे, ते कुठल्याही विद्यालयात किंवा महाविद्यालयात शिकवले, तर आज तरुणांना बेकारीची समस्या भेडसावणार नाही. ग्यासूचे जीवनविषयक तत्वज्ञान, गीत, संगीत, कविता, गझला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान ह्या सर्व विषयातले ज्ञान, आणि ष्टो रिपेर, हे सर्व शिकताना कृष्णाला सांदीपनीच्या आश्रमातदेखील इतके चौफेर ज्ञान मिळाले नसेल, ह्याची मला खात्री आहे. ष्टोला वाती चढवताना, यमन आणि शुद्धकल्याण ह्यातला फरक समजवून देताना, ग्यासुद्दिन चा संगीतशिक्षणविषयक दृष्टिकोण किती व्यापक आहे, ह्याची खात्री पटते.

“अब ऐसा देखो मियां, ये तुम्हारे ष्टोमें कितनी वात हय ?”

“१२” मी.

“तो ऐसा समझो, की हमने उनमेसे सिरफ ७ ही वात उपर की, बाकी सब निकाल दी. अब ये वातको सा बोलो. तो ये जलाई, तो बाकी एक के बाद एक जलेगी के नही ? अब जो वात ऊपर है, वोईच जलेगी. बस ऐसेहि है अपना आयमान. अब ये बीच वाली वात को ले जाव नीचे, और उस्के बाजूवाली को करो ऊपर. तो ये कैसे जलेगी. बस वैसे सुदकलियान. दोनो एकही ष्टो की वाती, लेकिन जलनेका आर्डर अलग है.”

मंडळी, भातखंडे पलुस्करांपासून आपल्या संगीतशिक्षणाच्या क्षेत्रातील मोठी परंपरा अशी ष्टोमधून जळणाऱ्या वातींतून पुढे चालू ठेवणारे ग्यासुद्दिन सारखे संगीतशिक्षक मला लाभले, हा मी माझा बहुमान समजतो.

कधीकधी ग्यासूच्या दुकानात ममद्या नावाचा एक दहा-बारा वर्षाचा पोर असतो. “हमारे चच्चीजान के बुवाजानका नाती.” अशी ममद्या ची ओळख ग्यासूने करून दिली असते. ममद्याला आपले अभिजात संगीत आवडत नाही, ही ग्यासूची मुख्य तक्रार. ग्यासूची तोडी सुरू असते, तेव्हा हा पोऱ्या नवीनच कुठलेतरी रफीबिफीचे गाणे गुणगुणत असतो, तेव्हा चिडून एक ष्टो ममद्याच्या अंगावर फेकलेला मी स्वत: पाहिला आहे.

“अमा, ठीक है के गा नही सकते. लेकिन थोडा सुन तो लो ! ये आजके लडके.”

तसे ग्यासुला कौटुंबिक सुख वगैरे मिळत असावे. पण पोटचे पोर नाही, म्हणून कधी कधी ग्यासू खिन्न असायचा. एकदा भलताच खूष दिसला. “शिरनी लो मियां.” मी प्रसाद खाऊन चच्चीजान चे अभिनंदन करायला निघालो. “अरे उस्को मत बोलो, मियां. उधर गावबाहार ग्यासूका चिमत्कार है. अल्लाउद्दिन के जमानेसे हमारी लैन ऐसी टूटी नही थी कब्बी, अब कैसे टूटेगी?” पुढे त्या “चिमत्काराने” गावातील एका धनिकाशी सूत जमवले, आणि लैन तुटलीच.

तसे ग्यासुद्दिनचे दादे परदादे गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात आहेत. पण आजही हैदराबादेचे नाव निघाले, की चारमिनारच्या मागे सलीमभाईच्या दम बिर्याणीच्या आठवणीने ग्यासू कळवळतो.

“क्या बताऊ मियां, वो हड्डीभी ऐसी पकती थी, की उस्को चूसते वक्त जैसे वो पंडत चौरासिया की बासुरी के सुर निकलते थे. हमारी बेगम तो छोडो, बडी अम्मीभी ऐसी बिरयानी कब्बी बना नही सकती.”

एकदा मी ग्यासूला भाईकाकांचे “माझे खाद्यजीवन” वाचून दाखवले.

“अमां मियां, ये बम्मन लिखता अच्छा है. ये खाने खिलाने के बजाय और क्या करता है?”

मग मी त्याला “व्यक्ती आणि वल्ली” वाचून दाखवले.

“मियां, बडे होने पर तुम भी ऐसेच हमारे उप्पर लिखना.”

आजही कुणाचा यमन ऐकताना, कुठल्या वाती वर आणि कुठल्या खाली ते आठवतात. हसूही येतं. रडूही. परमेश्वराने आपल्या आयुष्यात आणलेले हे ष्टो. वाती जळल्या आणि रिपेरला गेले.

आजची खमंग पाककृती: व्यक्तिचित्रे

Tuesday, August 5th, 2008

आमची प्रेरणास्थाने:

वैविध्यपूर्ण लिहा : आणीबाणीचा शासनकर्ता
भाजणीचे पीठ हे विविध डाळींचे एकत्र दळलेले दळण असते : कमलाबाई ओगले

बरं का मंडळी, आज आम्ही आपल्याला खमंग व्यक्तिचित्रे कशी बनवावीत ते सांगणार आहोत. (आज फक्त पाककृती देतो, हिचे प्रात्यक्षिक पुढल्या एखाद्या लेखात येईलच;-)

व्यक्तिचित्रे ही प्रतिसादांचे बाहुल्य वाढवण्याची सर्वात सोपी पाककृती. येथील सदस्य क्रमांक ८०० च्या खालच्या सर्वांना व्यक्तिचित्रलेखनातली ही गोम कळलेली आहेच. नव्हे, ज्यांना समजलेली आहे, त्यांनी आपल्या मोलकरणी, मावशा, आत्या, प्राध्यापक, विद्यार्थिनी, ह्या सर्वांची व्यक्तिचित्रे लिहून आपापली खर्जनशीलता दाखवलेली आहेच. आता उरले सदस्य क्रमांक ८०० च्या पुढचे (अडाणी) सदस्य. त्यांना सदर वैविध्य आपल्या लेखनात दाखवता यावे, ह्यासाठी हा लेखनप्रपंच.

तर, खमंग व्यक्तिचित्राची पाककृती अशी:

१. (पहिल्यांदा) एक व्यक्ती निवडावी. हे लिहायला सोपे जाते, पण व्यक्तिचित्राची खमंगता ५०% ह्या व्यक्तीच्या निवडीवरच अवलंबून असते. ही व्यक्ती तुमच्या-आमच्यासारखी सामान्य (किंवा क्षुद्र) नसावी. म्हणजे, ह्या व्यक्तीत काही गुण असावेत, जे हल्ली दिसत नाहीत, ते. आता समजा, तुम्हा-आम्हापैकी कुणाची निवड आपण केली, तर ह्या युगात जगणारे, म्हणजे सामान्यच, म्हणून ह्या व्यक्तीचित्राला फारसा प्रतिसाद लाभणार नाही. तुमची एखादी जुनी आत्या आहे का ? बालपणीचा काळ सुखाचा सारख्या भाजणीत तिचा एखादी डाळ म्हणून समावेश होऊ शकेल का ? नाही ? ते सोडा. तुम्ही एखाद्या चाळीत राहात होतात का ? असल्यास तिथे ह्या आत्या-मावश्यांसारखे स्पेसिमेन्स बरेच सापडतात. असे कुणी तुम्हाला माहिती आहे का ? लहानपणी जरी त्यांचा वाईट्ट राग येत असला, तरी ह्या वयात नक्कीच त्यांच्या काही तरी गुणांवर तुम्ही नक्कीच लिहू शकाल! आजकालच्या तरुण-तरुणींनी ह्या आत्या मावशा पाहिलेल्या नाहीत, हे छातीठोकपणे सांगतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली ह्या चित्रातून, तरी पुरेसे आहे. (आणि आईची आठवण म्हणजे, काय सांगू महाराजा ? प्रत्येकाकडून एक तरी प्रतिसाद नक्की! तुमचा लौकिक संवेदनशील लेखक म्हणून, किंवा पुलंनतर तुम्हीच म्हणून होणार ! जियो !)

पण तुम्ही चाळीत राहात नव्हता, कुठल्याही आत्या-मावशांशी परिचय नाही ? नो प्रॉब्लेम ! तुम्ही स्वत:ला कुठल्या कलांचे रसिक समजता ? संगीत ? मग कोपऱ्यावरचा कल्हईवाला आपल्या भसाढ्या आवाजात गातोय ना ? अहो, तोच तुमचा व्यक्तिचित्राचा क्याण्डिडेट ! (मात्र, त्याचे व्यक्तिचित्र लिहिताना, त्याला शापित यक्ष, गंधर्व, किंवा अप्सरा म्हणायला विसरू नका.) तुम्हाला चित्रांमध्ये गती आहे का ? नाही, गती असणे आवश्यक नाही. मधुबालाचे चित्र क्रेयॉन ने ट्रेस केले आहे ना तुम्ही ? मग आहेच की तुम्हाला गती ! आता, पहिले एक काम करा. इतर लोक जेव्हा त्यांची चित्रे प्रकाशित करतात, तेव्हा “भिवया जमल्या नाही”, “नाक थोडे तेढे आले आहे” असे प्रतिसाद देत चला. म्हणजे, तुम्हाला चित्रकलेत गती आहे, अशी लोकांची समजूत होईल, आणि मग तुम्ही बाजूच्या फुटपाथवर रांगोळीने चित्र काढणाऱ्या युसुफचे व्यक्तिचित्र चितारण्यास मोकळे !

तुम्हाला हेही जमत नाही ? अरेरे ! मग सर्वात सोपा उपाय ! तुम्ही शाळेत शिकला असालच ! तिथले छड्या मारणारे शिक्षक आताही आठवत असतीलच ! मग कामच संपले. त्यांच्या छड्यांची आठवण “आमचे साने गुरुजी” ह्या नावाने लिहा. सगळ्यांना जाणीव होईल त्यांच्या हरवलेल्या बालपणाची. बालपणीचा काळ, जसा तुमचा छड्या खाऊन सुखाचा गेला, तसाच आज आमच्या मुलांचा का जात नाही, असे अनेक प्रतिसाद येतील. तुमचे व्यक्तिचित्रक म्हणून काम संपले.

असो, तर सांगायचे एवढेच, की पुढे व्यक्तिचित्रणासाठी मदत होईल म्हणून, आजच आपल्या आत्या मावश्या, कोपऱ्यावरचे कल्हईवाले, रांगोळीचे चित्रकार, आणि जुने शिक्षक, ह्यांच्यावर लक्ष ठेवून असा. वेळ काय सांगून येते ?

२. (आपल्याच ग्यासवर) आपल्या व्यक्तिमत्वाशी त्या व्यक्तीची जुळवाजुळव करावी. हे महत्वाचे. कारण मी लिहितो मुक्तके, आणि आत्या करते ओव्या. तिचे नि माझे कसे जमणार ? मी जर अभिजात, तर तीही अभिजातच असायला हवी. मी जर चित्रकार, तर तिनेही किमान रांगोळी तरी काढलेली असायला हवी. मी जर मटण खातो, तर तिलाही मटणाची गोडी लावायला हवी. नाहीतर मग मटण खाताना छायाचित्रे कशी देणार?

३. (चिमूटभर) भाईकाका. हा एकच शब्द लक्षात ठेवा. ह्यांचे पाळण्यातले नाव पुलदेशपांडे. पण हल्ली, हे भाईकाका ह्या नावाने ओळखले जातात. नव्हे, “पुलं” म्हटले की म्हणणारा भोटम ठरतो. त्याचे काय आहे, ह्या लेखकाने अनेक व्यक्तिचित्रे लिहिली असे बऱ्याच लोकांना माहिती आहे. त्यामुळे, हा शब्द आला, की भलेभले नरम होतात. विशेषत:, एकदा तुमच्यामागे “भाईकाकांची शैली” असे कुणी लचांड लावले, की तुम्ही वरच्या पातळीवर पोहोचलात, असे समजा. हे सोपे नाही बरे का मंडळी. ह्यासाठी अनेक वर्षांची तपस्या लागते. काही डॉ. वगैरे लोकांचे प्रतिसाद आवश्यक असतात. परंतु, एकदा हे झाले, की मग मात्र तुम्हाला मरण नाही. हे एकदा झाले, की दुनिया फाट्यावर मारायला तुम्ही मोकळे.

४. (चवीप्रमाणे) छायाचित्रे. व्यक्तिचित्र लिहायचे म्हटले, की मग त्याला “जेन्युईन” बनवण्यासाठी आवश्यक अशी छायाचित्रे आपल्याला मिळवून ठेवणे आवश्यक आहे. हल्ली ही नवीन पीढी छायाचित्रांशिवाय कुठल्याही व्यक्तीचित्रावर विश्वास ठेवण्यास नकार देते. अगदी कुणाच्याही पाठीवर साबण चोळले, तरी ती उघडी पाठ छायाचित्रात दाखवली नाही, तर हे तरुण आजकाल विश्वासच ठेवत नाहीत. हल्लीच्या पीढीला विश्वास ही गोष्ट कशाशी खातात ते माहिती नाही. (असो, त्याविषयी नंतर कधी तरी.)

५. (भरघोस) नर्म विनोद. आपण व्यक्तिचित्रणात जे काही अगम्य अगोचर लिहिलेले आहे, त्यावरचा अविश्वास नाहिसा करणे, ह्यासाठी अधून मधून नर्म विनोद करणे आवश्यक आहे. अन्यथा, हे सर्व सत्यच आहे, आणि गीतेवर एक हात ठेवून आपण दुसऱ्या हातावे टंकन करीत आहोत, असे वाटेल. त्यामुळ अधेमधे नर्म विनोद आलेत, की नव्या लोकांना वाटते, की आपण विनोदी लिहितो आहे, आणि जुन्या लोकांना वाटते की ही भाईकाकांची शैली. दोन्हीकडून टाळ्या पडतात. हे खरे, की खोटे, ते बिंग आपण बिंगच ठेवावे, फोडू नये.

६. (थोडी) गुप्तता. जरी आपण एखाद्या व्यक्तीचे चित्रण करत असलो, तरी त्या व्यक्तीविषयी सर्वच काही उघड करू नये. नाही तर, ही व्यक्ती आपल्यासारखीच सामान्य आहे, असे इतर सामान्य वाचकांना वाटते. आणि मग त्या व्यक्तिचित्रणाचा काय उपयोग ? श्री. भीमराव मेश्राम, ही व्यक्ती दिवसा दगड फोडते, म्हणून त्या व्यक्तीच्या कपाळावरील घर्मबिंदू कळफलकबडव्यांना आवडतात. संध्याकाळी घरी गेल्यावर इंटरनेटवरून बिपाशाची चित्रे बघताना, ह्याच व्यक्तीच्या चेहऱ्यावर येणाऱ्या घर्मबिंदूंविषयी कुणाला सहानुभूती वाटणार ?

७. (उकळताना) आपली एकाग्रता. आपण उगाच कधी कविता, कधी गझला. कधी वैचारिक लेख. कधी तंत्रज्ञानाविषयी. असे लेखन केले, तर व्यक्तिचित्रलेखक म्हणून आपली ख्याती विरणार. व्यक्तिचित्रांव्यतिरीक्त फारतर एखादा दुसरा विषय आपण हाताळायला हवा. दुसरे काहीही नाही. विशेषत: आपण ज्या विभागातली व्यक्तिचित्रे जास्त करून लिहितो, तोच विभाग आपण सांभाळायला हवा. इतर विभागात लेखन करण्यास आपण इतर लेखकांना उद्युक्त करायला हवे. स्वत: मात्र इतर ठिकाणी चोच देखील मारू नये. कारण असे केल्यास आपली प्रतिमा, ही “वैविध्यपूर्ण लेखक” अशी होते. ही भूमिका आपल्या व्यक्तिचित्रकाराला मारक आहे, हे लक्षात ठेवावे. जगात वैविध्यपूर्ण लेखक बरेच आहेत, त्यांना आपण “एक ना धड भाराभार चिंध्या” असे दूषण देऊ शकतो, पण आपली व्यक्तिचित्रकार अशी प्रतिमा ढासळल्यास आपल्या मदतीला हे वैविध्यपूर्ण येड*वे येणार आहेत थोडेच ?

जालकवींच्या कविता: आवाहन

Monday, August 4th, 2008

२००९ मध्ये फेब्रुवारी १४,१५ आणि १६ तारखांना सॅनफ्रॅन्सिस्को उपसागरीय भागात विश्व मराठी साहित्य संमेलन होणार आहे, ही बातमी बहुतेकांना माहिती असेलच. भारताबाहेर पहिल्यांदाच असे अधिकृत साहित्य संमेलन होणार आहे, आणि तेही बे एरिया, ह्या विश्वजालाच्या कर्मभूमीत ! हे साहित्य संमेलन नेहमीपेक्षा वेगळे असावे, ही माफक अपेक्षा रसिकांनी ठेवायला काहीच हरकत नाही. पण मुळात हे वेगळेपण तरी कसे असावे, ह्याबद्दल विचारमंथन करीत असताना, एका कार्यक्रमाची कल्पना सुचली, आणि ती संयोजकांना कळवली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे, म्हणून हे आवाहन.

कार्यक्रमामागील भूमिका: विश्वजाल लोकप्रिय झाल्यानंतर प्रकाशनाच्या विविध संधी सहज उपलब्ध झाल्याने साहित्याची लोकाभिमुखता वाढली. चलचित्रांच्या बाबतीत यू-ट्यूबने क्रांती घडवली. छायाचित्रांत फ्लिकरने. मुद्रित साहित्यापेक्षाही अनुदिन्यांवर प्रकाशित केलेले साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत सहज पोहोचू शकते. अद्याप मराठी साहित्यात हे आमुलाग्र परिवर्तन जरी दिसत नाही, तरी मराठी प्रकाशनाची वाटचालही त्याच दिशेने होत आहे, हे स्पष्ट आहे. मराठी अनुदिन्यांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत झालेली अमाप वाढ ही त्या वाटचालीचीच निदर्शक आहे. मराठीचे हेच भविष्य आहे, असे म्हणायला हरकत नाही. नव्हे, ह्याकडे दुर्लक्ष करणे, किंवा ही वाटचाल थांबवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ह्या नवीन युगातले स्वत:चे अस्तित्वच नाहीसे करणे. हा कार्यक्रम म्हणजे, मराठी साहित्याच्या भविष्याची नांदी.

कार्यक्रमाची रूपरेखा: एकूण २-३ तास. काव्यवाचन आणि काव्यगायन. फक्त त्यातल्या कविता कुठल्याही पुस्तकांत, मासिकांत, किंवा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या नाहीत. ह्या कविता फक्त अनुदिन्यांवर आणि इतर मराठी संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या असतील. कवींची नावे / टोपणनावे देखील जालाबाहेर फारशी प्रसिद्ध नसतील. हेच नाही तर, काव्यवाचन आणि काव्यगायन करणारे, आणि संगीत दिग्दर्शक देखील “प्रोफेशनल” नसतील.

मदत हवी आहे: हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे. आम्ही सर्व “जालकवींना” आवाहन करतो, की आपल्या ज्या कवितांचा ह्या कार्यक्रमात अंतर्भाव व्हावा असे आपल्याला वाटते, त्या आम्हाला ईमेलने पाठवा ! (इमेल कृपया युनिकोडमध्येच ठेवा, आणि कवितेसोबतच, तुमचे जाहीर करण्याचे नाव -टोपणनावही चालेल-, संपर्काचा ईमेल-पत्ता, आणि स्वत:बद्दल एक-दोन ओळी.) जे जालकवी नाहीत, त्यांनी आपापल्या ओळखीच्या, आवडत्या जालकवींकडे हे आवाहन पाठवावे, इतर मराठी संकेतस्थळांवर, आणि स्वत:च्या अनुदिन्यांवर हे आवाहन प्रकाशित करावे, ही नम्र (पण आग्रहाची) विनंती. तसेच ह्या कार्यक्रमासाठी एखादे समर्पक नावही सुचवावे.

आपापल्या कविता आम्हाला खालील पत्त्यांवर पाठवाव्यात.

मिलिंद भांडारकर (milind [DOT] bhandarkar [AT] gmail [DOT] com)
चक्रपाणि चिटणीस (chakrapani [DOT] chitnis [AT] gmail [DOT] com)

([dot] ऐवजी “.”, आणि [AT] ऐवजी “@” वापरावे.)
धन्यवाद !

माझ्या साहित्यिक मैत्रांनो (आमच्या आगामी अध्यक्षीय भाषणातून साभार)

Monday, July 7th, 2008

(अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे बे एरियात होणार ही बातमी मिळाल्यापासून आम्ही सदर संमेलनाच्या घडामोडींवर नजर ठेवून आहोत. मधु मंगेश कर्णिक आणि विंदा करंदीकर ह्यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांनी सदर संमेलनाला दाखवलेला विरोध आम्हाला अधिकच सुखकर वाटला, कारण त्यामुळे ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची आमची लहानपणापासूनची महत्वाकांक्षा आता पूर्ण होणार, हे नक्की. आमच्या ह्या महत्वाकांक्षेला आजवर एकमेव आव्हान होते, ते येथील, म्हणजे बे एरियातील स्वघोषित साहित्यिकांचे. पण “कला” ह्या मराठी साहित्यप्रेमीच्या जगातील एकमेव संस्थेने सदर साहित्य संमेलनाला दर्शवलेला विरोध लक्षात घेता, आमचा अध्यक्षपदाचा मार्ग खुला झाला, आणि आम्ही भाषण लिहायला घेतले. त्यातील काही अंश आगाऊपणे - म्हणजे ऍडव्हान्स ह्या अर्थाने - आम्ही येथे मांडतो आहोत.)

मैत्रहो,

बे एरियातील वादग्रस्त ठरलेल्या ह्या साहित्य संमेलनात आपले स्वागत आहे. आणि का नसावे ? संमेलनापूर्वीच्या चर्चांतून असे वाटले होते, की एकूण फक्त १५३ साहित्य प्रेमी ह्या संमेलनाला हजेरी लावतील. पण दोन साहित्यप्रेमींनी आपापल्या बायकांना पण सोबत आणले आहे, त्यामुळे १५५ रसिकांची उपस्थिती लाभून ह्या साहित्यसंमेलनाला घवीघवीत यशच प्राप्त झाले आहे. लॉस एन्जेलिस आणि सॅन डियेगो भागातून फक्त ८ जण येतील असे वाटले होते. पण नंदन आणि डांबीसकाका ह्यांनी नंदिनी आणि डांबिसकाकूंना (अनुक्रमे, उगाच घोळ नको) येथे आणले त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करू या, असा ठराव मी मंाडतो.

(ठाले पाटील अवतरेंच्या कानात: फुडच्या वर्षी ड्यांबीसला अद्यक्ष करनार, म्हनून तू म्येल पाटवली, त्ये येक ब्येस केलं.)

मैत्रहो, आपल्या लक्षात आलेच असेल, की मी आपल्याला मैत्र म्हणून संबोधतो आहे. नेहमीप्रमाणे “मित्र-मैत्रिणींनो” असे नाही. ह्याचे मूळ कारण की आपण बे एरियात आला आहात. इथे मित्र आणि मैत्रिणी हा भेदभाव आम्ही करत नाही. संत फ्रान्सेश्वराच्या ह्या नगरीत ह्या क्षुल्लक लिंगभेदाला स्थान नाही. बाया-बायांची आणि बाप्या-बाप्यांची यथासांग लग्ने लावून देण्यात ही नगरी प्रसिद्ध आहे. इथे आजकाल लग्नाच्या सरकारी अर्जावर नवरा आणि बायको अशी नोंद नसते, तर अशील क्र. १ आणि अशील क्र. २, असे लिहून जागा सोडलेली असते. (स्वत:चे शील न सांभाळणारे, ते अशील ही कोटी आपल्यातले काही गंभीर असे विनोदी साहित्यिक करतीलच. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही दुसरे काय ?)

मैत्रहो, आपले साहित्यक्षेत्र ही नवीन सामाजिक परंपरा कधी आणि कशी जवळ करणार, हा आम्हाला सध्या छळणारा मुख्य प्रश्न आहे. आजवर आपल्या मराठी ह्या प्रगल्भ भाषेत समलिंगी संबंधांना स्वीकारणारे एकही लिखाण झालेले नाही. दिवसाला एक, ह्या दराने प्रेमकविता पाडणाऱ्या आपला कविवर्ग (विशेषत: कवयित्रीवर्ग, ह्यांना अशा कविता पाडायला बराच वेळ मिळतो) ह्या दुसऱ्या नाजुक नात्याविषयी काहीच कसे लिहीत नाही ? मैत्रहो, आज ह्या वाटमोड्या (पाथब्रेकिंगला कुणी मराठी शब्द सुचवा हो) साहित्यसंमेलनात आपण प्रतिज्ञा करूया, की आजपासून आपले कुठलेही मराठी साहित्य लिंगभेद करणार नाही. जुने जाऊ द्या तिकडे (जिकडे सगळे जुने जाते, तिकडे.. त्या प्राण्याच्या पार्श्वभागातील त्या विशिष्ट अवयवाचा जाहीर उल्लेख करणे फक्त विद्रोही साहित्य संमेलनातच शक्य आहे.) आजपासून आपण माझ्या लिंगसमतेच्या चळवळीला हातभार लावावा, ही माझी आपणा सर्वांना विनंती आहे.

ह्यासाठी जुन्या साहित्याचे संशोधन करणे आवश्यक आहे. आता तांब्यांचीच कविता घेऊ या, आणि तिला लिंगसमतेच्या चळवळीत आणू या. म्हणा तर माझ्या मागून.

व्यक्ति व्यक्तिची सलज्ज कुजबुज
झाडाझुडपांचे हेच मधुर गुज…
(”वृक्षलता” हे भिन्नलिंगत्वाचा पुरस्कार करणारे असल्याने मुद्दाम बदललेले आहे. साहित्यिकांनी लिंगसमतेवर छुपेपणे केलेल्या अशा प्रहारांविषयी जागृत असावे.)

भटांच्या गझलांना लिंगसम करणे खूप सोपे आहे.

तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे

हे पुरुषाने म्हटले, की झाले. किंवा

पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची मिठी सैल झाली..

हेदेखील ह्या थोर नगरीतील एखाद्या पुरुषाने गायले, तरी पर्फेक्ट!
(विशेषत: ह्यातील “रेशमाची” हा उल्लेख आमच्या बे एरियातील निसर्गोत्पादित वस्तूंविषयीचे प्रेम व्यक्त करणारा आहे, त्यामुळे आमचे त्याला अनुमोदन आहे. पुढचा मुद्दा बघा.)

मैत्रहो, आमच्या बे एरियातील संवेदनशील मनामनाला भिडणारा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कृत्रिम वस्तूंविषयी असणारा द्वेष. येथे कुणी झाडे तोडणार, असे म्हटले, की आम्ही त्या झाडांवरच ठाण मांडून बसतो. “कला”च्या पत्रकामुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या बर्कली ह्या विद्यापीठात आम्ही असेच केलेले आहे. तेथील क्रीडावास्तूसाठी १०-१५ झाडे तोडणार असे ऐकल्याबरोबर आम्ही संवेदनशील मंडळी त्या झाडांनाच आमचे घर केले. निसर्गाशी सान्निध्य साधून वैश्विक तापवृद्धी टाळण्याचा ध्यास घेतलेले श्री. ऍलराव गोरे पाटील हे आडनावाने मराठी आहेत, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.

आज आपण दुसरी एक प्रतिज्ञा करू या, की आपले सर्व लिखाण हे निसर्गाशी एकात्मता साधणारे हवे. आपण आजवर आपल्या लेखनातून नैसर्गिक एकात्मतेला फाटाच दिलेला आहे. नायिकेने घातलेला शिफॉनच्या सूटचे वर्णन करताना, त्यात नैसर्गिक कापसाचे प्रमाण किती आणि प्रयोगशाळेत घडवलेल्या रसायनांचे प्रमाण किती, हे आपण लिहायचे टाळतो. अगदी हेच बघा ना, एकेकाळी साहित्यिक म्हणून गणले जाणारे पुलंदेशपांडे ह्यांनी देखील (सुनीताबाईंचा धाक, आणि बाबा आमट्यांशी ओळख असूनही) कधीही ही नैसर्गिक एकात्मता त्यांच्या लिखाणात दाखवलेली नाही. मी फक्त एक उदाहरण देतो. त्यांनी स्वत: खाल्लेल्या विविध पदार्थांचे वर्णन करून (इतर लोकंाना जळवावे ह्या दृष्टिकोनातून) “माझे खाद्यजीवन” असा लेख िलहिला होता. पण त्यांनी खाल्लेल्या पदार्थांत नैसर्गिक घटक (ऑर्गॅनिक) किती, मेदजनक, कर्बजनक घटक किती, ह्याचा उल्लेख न करणे ही अक्षम्य हेळसांड केली. मैत्रहो, बे एरियातील ह्या नवीन युगात आपल्याला हे करून चालणार नाही. अगदी कुणा साहित्यिक मित्राकडे (तो पुणेरी नसल्यास) “चहा घेतला”, असे लिहिले, तरी लगेच त्यात दूध किती (२% मेद, की १%, ऑर्गॅनिक की नाही) साखर आणि कर्बघटक किती, हे लिहिणे आवश्यक ठरते.

मंडळी, मागे उल्लेख केल्याप्रमाणे ऍल गोरे पाटील हे आमच्या बे एरियाचे वाग्दत्त जावईच आहेत. त्यांनी आम्हाला दिलेली दुसरी शिकवण म्हणजे पेट्रोल वाचवणे. शक्य असल्यास पेट्रोलचा वापरच न करणे. मैत्रहो, आपल्या आदरणीय ज्येष्ठ मराठी साहित्यिकांनी वारंवार स्कूटर ह्या वाहनाचा उल्लेख आपल्या साहित्यात केलेला आहे. (कारचा उल्लेख मराठी साहित्यात केला की ते अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण ठरते.) सदर वाहन पेट्रोल पिते, ह्यामुळे भविष्यातील साहित्यात (म्हणजे आमच्या बे एरियातील तीन साहित्य रसिकांनी आपले साहित्य वाचावे असा आपला आग्रह असेल, तर) अशा पेट्रोल पिणाऱ्या वाहनांचा उल्लेख टाळावा. आपल्या नायक-नायिकांना (किंवा नायक-नायकांना, किंवा नायिका-नायिकांना) चालत किंवा दुचाकी सायकलवर प्रणयक्रीडा करण्यास पाठवावे. ह्या पात्रांतील कुणीही एक जर धूम्रपान करीत असेल, तर दुसऱ्या पात्राने ते हाणून पाडावे. ह्यातील कुणी जर कर्बवायू सोडत असेल (कदाचित दोघेही) तर त्यांना दिवसा झाडाखाली बसवावे, आणि रात्री मरणपंथी धाडावे (रात्री मानवजात प्राणवायू भक्षण करते, आणि त्यामुळे झाडांना पुरेसा प्राणवायू मिळत नाही, ह्या समस्येवर ऍल गोरे पाटील ह्यांनी सुचवलेला हा उपाय आम्ही आपणास सुचवीत आहोत.)

पुढच्या रांगेत बसलेल्या सर्व साहित्यिकांच्या चेहऱ्यावरची नाराजी येथे आम्हाला स्पष्ट दिसते आहे. मुळात पुस्तके छापली जातात, तीच झाडांची पृष्ठे करून, हे मतही मला येथे त्यंाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते आहे. परंतु माझ्या प्रिय साहित्यिकांनो, सारखी सारखी पुस्तके प्रकाशित करून तुम्ही झाडांची ही दुर्दशा करताहात, ती पापे किती दिवस स्वत: झेलणार ? काही प्रकाशकंावरही सोपवा की ! तुमची पुस्तके छापून छापून स्वत:च्या अर्थप्राप्तीसाठी अनेक झाडांची दुर्दशा करणारे हे प्रकाशक आज बे एरियातील साहित्यसंमेलनात, तिकीटाचे पैसे नसल्यामुळे हजर राहू शकलेले नाहीत. (तुम्हाला द्यावयाची रॉयल्टी इतके दिवस बुडवूनही त्यांच्याकडे अद्याप अमेरिकेच्या तिकिटासाठी पैसाही जमलेला नाही. पण हे प्रकरण तुम्ही आणि प्रकाशक एकमेकात निपटवा.) निसर्गाची अवकृपा त्यांच्यावर झाली आहे, हे त्याचे मूळ कारण.

येथे जमलेल्या १४८ साहित्यप्रेमी आणि ७ साहिित्यकांना आम्ही विनंती करतो, की मराठी साहित्याचा वटवृक्ष जर बे एरियातील मातीत रुजवायचा असेल, तर बे एरियातील मूळ तत्वांशी मराठी साहित्याची सांगड घालणे आवश्यक आहे. नुस्ते महाराष्ट्र मंडळाने साहित्याची गोडी बे एरियात रुजवायला हवी, अशा किती दिवस बोंबा मारणार ?

आज आपल्याला प्रोत्साहन आणि दिशादर्शन म्हणून आम्ही आमचे तरुणपणीचे आवडते लेखक श्री. ना. सी. फडके, ह्यांचा एक उतारा लिंगसमभाव-निसर्गेकरूपता-वैश्विक-तापवृद्धीविरोध ह्या बे एरियातील तीन तत्वांशी समरूप करून आपला निरोप घेतो.

“सुहास आणि किरण निसर्गविज्ञानाच्या महाविद्यालयातील प्रांगणात बसले होते. सुहासची सायकल जवळच्याच झाडाला टेकून ठेवली होती. त्या झाडाला सायकलची सीट (वाळलेल्या मक्याच्या पानांपासून बनवलेली) टोचू नये म्हणून सुहास काळजीत होतं. (कुठल्याही क्रियापद अथवा नामातून लिंग प्रकट व्हायला नको, बरं का साहित्यिकांनो?) किरण आज महाविद्यालयातील सर्व भाषणं ऐकून कंटाळलं होतं. ते सुहासला म्हणालं, “आज मला कुठेतरी छान सायकलने फिरायला जावंसं वाटतं. सुहासला दोन महिन्यापूर्वी घरातलं सर्व शिळं अन्न टाकून तेनं केलेलं काम्पोष्ट किती सडलं आहे, ते बघायला जायचंच होतं. ते किरणला म्हणालं, चल माझं काम्पोष्ट बघायला जायचं का ? किरणला तेच्या सर्व अंगावर टिंगल व्हायला लागलं. (हे इंग्रजीतलं टिंगल बरं का ? मराठीतलं नाही. हा खास बे एरियातील मराठी तरुण-तरुणींसाठी आपुलकीचा टच.) आपल्या प्रियासीकराचं (प्रियकर की प्रेयसी हे किती खुबीने टळलं आहे बघा. अशा नवीन शब्दांची आज मराठीला गरज आहे. अधिक माहितीसाठी गूगलवर शब्दभांडारचा शोध घ्या) काम्पोष्ट बघायला कुणाला आवडणार नाही? सुहास लगच किरणला तेच्या सायकलवर डबलशीट बसवून काम्पोष्टवर गेला. तिथला दुर्गंध किरणला अधिक टिंगल करू लागला. सुहासचाच हा गंध, असं किरणला वाटलं. किरणने सुहासकडे सहेतुक पाहिलं. सुहासने किरणकडे. किरण स्वत: काम्पोष्ट का नाही करत? सुहासचं मन थरारलं. किरणच्या टीशर्टावर हळू हळू सहेतुक हात फिरवत सुहासनं शेवटी तो प्रश्न टाकलाच. “छे, काहीतरीच तुझं, सुहास! काम्पोष्टात टाकायला शिळं अन्नंच नाही माझ्याकडे. होल फूड्स मधून एकदा अन्न आणलं की ते आठवडाभर पुरतं. कालंच सगळ्या ऑर्गॅनिक बटाट्यांत ओर्गॅनिक सैंधव मीठ टाकून जेवलंय मी. अजूनही त्या पादे-मिठाचा वास माझ्या टीशर्टला आहे.” सुहासला किरणविषयी धन्य वाटलं. दोघांची नजरानजर झाली. सुहासचे पुढे आलेले वाळलेले ओठ किरणला हवेहवेसे वाटले (कारण ते पूर्ण वाळलेले होते, उगाच इतरांसारखे रसायने लावून ओले केलेले नव्हते.) आणि दोघेही निघाले सॅन फ्रॅन्सिस्कोला. आज तिथला रजिस्ट्रार लग्ने लावायला ओव्हरटाईम करणार होता.”

हाण तिच्या मॉमला (अर्थातच, बे एरिया मराठी लिटरेचर कन्वेन्शन)

Thursday, July 3rd, 2008

काय सांगू महाराजा, गेले काही दिवस आम्ही मोरपिसांपेक्षा तलम आणि हलके होऊन साहित्यजगतातील मुष्टियुद्धाच्या रिंगणात बागडतोय. जेव्हा आम्हाला फेब्रुवारी २००९ मधील मराठी साहित्य संमेलन संत फ्रान्सेश्वर उपसागरीय भागात (मराठीत ज्याला सॅन फ्रान्सिस्को बे एरिया म्हणतात) होणार हे कळले, तेव्हापासून मुहम्मद अलीच्या शिकवणीतून आम्ही फुलपाखरासारखे बागडतोय, परंतु मधमाशीसारखा चावा घ्यायची संधी इतक्या लवकर चालून येईल असे वाटले नव्हते.

आता, वरील मराठीप्रचुर वाक्य लिहिताना आम्हाला एवढे हलके व्हायला काही अमराठी पाश्चिमात्य द्रव्यांची (की द्रवांची) मदत झाली, हे कबूल करतो. यापुढील वाक्यांना देखील सदर द्रवाची मदत व्हावी ही सरस्वतीचरणी प्रार्थना.

तर, आम्ही सदर उपसागरीय भागात वास्तव्य करून आहोत. येथील दक्षिणी उपसागरीय प्रांतातील महाराष्ट्र मंडळ नामे मुष्टियुद्धाच्या रिंगणाच्या अगदी जवळच्या जागा आम्हाला लाभल्या आहेत. ह्याचे कारण की आमचे एक जवळचे मित्रच सदर रिंगणाच्या चालकसमितीवर आहेत. आणि तरी देखील सदर साहित्य संमेलन ह्या समितीने स्वत:वर ओढवून घेतलेले आहे, हे आम्हास महाराष्ट्र टाईम्स आणि सकाळ ह्या वृत्तवाहिन्यांतून कळले. (ह्याविषयी आम्ही सदर सदस्याजवळ आमची खंत व्यक्त केली आहेच.)

पण जेव्हा सदर वृत्त आमच्या वाचनात आले, तेव्हा आम्हाला अतोनात आनंद जाहला. आणि आम्ही सदर संमेलनाला आमचा जाहीर पाठिंबा व्यक्त केला. (आमच्या जवळच्या मित्राच्या भीतीमुळे नव्हे, हे येथेच नमूद करू इच्छितो.) पण नुकतेच ह्या दक्षिणी उपसागरीय भागातील कला आणि साहित्य ह्यांना वाहून घेतलेल्या (म्हणजे काय कोण जाणे) एका कला नावाच्या संस्थेचे प्रसिद्धी पत्रक आमच्या वाचनात आले. त्यांना हे साहित्य संमेलन सदर उपसागरीय भागात काय तर कुठेच व्हायला नको आहे, असे दिसते. कारण येथे हे संमेलन होऊ नये, ह्याचे कला ह्या संस्थेने दिलेले मुख्य कारण असे, की जी संस्था (महाराष्ट्र मंडळ) हे संमेलन आयोजित करते आहे, त्यांनी आजवर मराठी साहित्याच्या सदर भागातील उत्थापनासाठी काहीही केलेले नाही. (ह्या उलट सांगलीला गेल्या वर्षीच्या साहित्य संमेलनानंतर मराठी साहित्यप्रेमींची संख्या अतोनात वाढली असून, तेथील मराठी पुस्तकांच्या दुकानदारांनी सध्या वॉरेन बफेटला मागे टाकले आहे, असे आमचा बातमीदार कळवतो. यंदाही रत्नंाग्रीचे लेले-वाचनालय चालवणारे लेले काका-काकू सध्या बाजूच्या नेन्यांना कुठले मर्सिडीजचे मॉडेल जास्त जळवेल ह्याची काळजी करताहेत.)

ह्या मुद्द्याबाबत आम्ही सदर पत्रकाचे लेखक आणि सदर संस्था ह्यांच्याशी अगदी सहमत आहोत. मराठी साहित्याच्या उत्थापनासाठी ह्या उपसागरीय विभागात महाराष्ट्र मंडळाने जे करणे अपेक्षित होते, ते अजिबात केलेले नाहीये. नुस्ते लोकांना आवडेल ते करून साहित्याची गोडी कशी वाढणार? नाही म्हणायला २००३ साली कला ह्या संस्थेच्या दोघा कलाकारांनी महाराष्ट्र मंडळाच्या एकांकिका संमेलनात घडवलेली “एक उलट, एक सुलट” की अशीच काहीतरी एकांकिका अनेकांची साहित्यविषयक अभिरुची वाढवून गेली. पण ती त्या चार तासांपुरतीच. नंतर सगळ्या प्रेक्षकांनी मिडलफिल्डच्या कबर्ली थेटरातल्या बाथरूममध्ये चुळा भरल्या, आणि पुन्हा जैसे थे झाले.

कलाने पण अशाच काही एकांकिका प्रकाशून प्रेक्षकांना चुळा टाकायला लावले आहे. पण त्यांचे लक्ष्य मात्र नेहमीच साधले आहे. प्रेक्षकांना आवडो की न आवडो, साहित्याची सेवा झाली की झाले, काय ?

असो, पण कला ह्या संस्थेचे पत्रक वाचल्यानंतर आम्ही प्रचंड खजील झालो. ह्या दक्षिण उपसागरीय भागातील साहित्यातील दिग्गजांचे म्हणणे ऐकून न घेताच आम्ही आमचे मत व्यक्त केले, ह्याबद्दल आम्हाला खेद झाला. आम्हाला साहित्यातले शष्प देखील कळत नाही, ही आम्हाला आधीच असलेली जाणीव पुन्हा एकदा झाली. (आम्ही लहान होतो, तेवहा अकोल्याला भरलेल्या साहित्य संमेलनात आमची एका असाहित्यिक विठ्ठल वाघ नावाच्या वऱ्हाडी कवीने केलेली तारीफ सदर कलाप्रेमींच्या साहित्यसेवेपुढे अगदीच कमी पडते. गोनीदा -ह्यंानी तळेगावच्या त्यांच्या घरात आमच्या बाल-कवितांची तारीफ केली होती-, हे तर तद्दन लोकप्रियतेच्या मागे धावणारे लेखक. त्यांना “एक सुलट, एक उलट” ची साहित्यसेवा कशी कळणार?)

असो, पण आम्ही सदर संमेलनाला पाठिंबा देताना व्यक्त केलेली कारणे आम्हाला येथे देणे आवश्यक आहे.

आम्ही व्यक्त केलेली कारणे अशी:

१. मूळ महाराष्ट्रात निवृत्त झालेल्या लोकांना म्हातारपणी आपले जुने प्रेम पुनरुज्जीवित करण्यासाठी साहित्य संमेलनांचा उपयोग होतो, असे सांख्यिकी सांगते. हे लोक पुढच्या २० वर्षांत दिवंगत होणार. मग त्यापुढे मराठी साहित्याचे काय ? तरुणांना त्यांची लग्ने जमवण्यासाठी आजवर ह्या साहित्य संमेलनांनी काय केले आहे ? सदर तरुण-तरुणींना लग्ने जमवण्यास मॅकडॉनाल्ड्स, पिझा हट ह्या संस्थांनी साहित्य संमेलनांपेक्षाही अधिक योगदान दिले आहे, असे आमचा भारतातील वार्ताहर कळवतो. (नाही म्हणायला आमच्या परिचयातील एका कला-प्रेमीने.. पण ते जाहीर करायला नको.)

२. सदर संमेलन इंदूर वगैरे ठिकाणीही झाले आहे, असे कळते. तेथील साहित्यिक पुणे-३० ची अधिकृत मराठी न वापरता, हिंदी नावाच्या भाषाभगिनीकडून बलात्कारित कुठलीतरी भाषा वापरतात असे ऐकिवात आहे. इंदूरला जेव्हा साहित्य संमेलन होऊन राहिले होते, तेव्हा सारे रसिक चांगले कपडे पेहनून, इतर रसिकांच्या कपड्यांकडे पाहून राहून, “अपन वोईच घातले असते, तर?” अशा संभ्रमात पडून राह्यले होते, असेही ऐकिवात आहे.

३. सदर साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट संमेलन स्थळाजवळच्या विद्यापीठांतील प्राध्यापकांमध्ये मराठीची आवड निर्माण करणे आहे, असे आम्हाला ह्या उपसागरी क्षेत्रातील मराठी संस्कृतीचे जपणूककार कलाच्या पत्रकातून कळले. सदर पत्रकात, स्टॅनफोर्ड आणि बर्कली ह्या दोन विद्यापीठांचा उल्लेख केलेला आहे. सर्वप्रथम, संत फ्रान्सेश्वर उपसागरीय विभागात फक्त ही दोनच विद्यापीठे आहेत, हा आभास निर्माण केल्याबद्दल कला ह्या संस्थेचा आम्ही निषेध करतो. सॅन होजे सिटी कॉलेज, किंवा २८० वरून स्पष्ट दिसणारी नॅशनल युनिवर्सिटी कलाप्रेमींना दिसू नये, हेही एक नवलच. तरी बरे, हे कलाप्रेमी दर शुक्रवारी कलेच्या संवर्धनासाठी २८० वरून एव्हरग्रीन भागात बैठकीत बसायला जात असतात. (बैठक ह्या शब्दाला हल्ली साहित्यिक भारतात दारूचे साहचर्य प्राप्त झाले आहे. पण कलेच्या संवर्धनासाठी सदर उपसागरीय भागात ज्या बैठका होतात, त्यांना अशी दारूची काळी किनार नसते, बरे का साहित्यप्रेमींनो! - अरे सगळे साहित्यप्रेमी कुठे निघालात ? खऱ्या कलाप्रेमींना आणि साहित्यप्रेमींना बैठकीचे असे अदारू-स्वरूप सहन होणार नाहीच, म्हणा. चालेल, तेवढाच महाराष्ट्र मंडळाचा खर्च कमी. काय ?)

४. आजवर जेवढी मराठी साहित्य संमेलने झालीत त्यातून मराठीचा उद्धार झाल्याचे आकडे काही केल्या मिळत नाहीयेत. उलट, दर वर्षी महाराष्ट्रातील घटणाऱ्या मराठींच्या संख्येविषयीच ऐकिवात आलेले आहे. आता मराठी लोकांची प्रजननशक्ती कमी झाली असेल, असे मानण्यास कुणीही विज्ञानवादी तयार होणार नाही. मग, मराठी लोक कमी झाले कसे ? ह्याविषयी पुणे-३० येथीलच विज्ञानवादी म्हणतात, की मध्यमवर्गीय मराठी मुले अमेरिकेत गेल्यामुळे, मराठींची महाराष्ट्रातली संख्या कमी झाली आहे. असे जर असेल, तर जिथे मराठी लोकांची संख्या वाढते आहे, तिथे मराठी साहित्य संमेलन व्हायला हवे, नाही का ? आपल्या मराठी संस्कृतीची हेळसांड करून उगाच स्वत:च्या आर्थिक वृद्धीसाठी अमेरिकेला गेले्या ह्या मुला/मुलींना आता पुन्हा मराठी साहित्यात गोडी निर्माण करणे आवश्यक अाहे, नाही का ? एकदा का त्यांना “एक उलट एक सुलट” छाप साहित्यात गोडी निर्माण केली, की नक्कीच ती मुले/मुली पुन्हा महाराष्ट्रात परत येतील, आणि महाराष्ट्र धर्म वाढीला लागेल. लोकहो, ह्या उपसागरीय भागातील तथाकथित मराठी लोकांना, फक्त पुलं आणि वपु ह्या तद्दन भिकार (अर्थातच लोकप्रिय) लेखकांपासून दूर करणे (सदर लेखकांना साहित्यिक म्हणणे हे म्हणजे साहित्य ह्या संज्ञेचाच अपमान आहे) हे मराठी कला आणि संस्कृतीच्या जपणुकीसाठी आवश्यक आहे. त्यासाठी येथे जीवनातील भयाण गोष्टींवर प्रकाश टाकणारे नवकवी, चारोळ्याकार, दोनोळ्याकार वगैरे सगळे ख्यातनाम साहित्यिक येणे आवश्यक आहे. एकदा हे सर्व साहित्यिक येथे आले, त्यांच्या सरकारी तिकिटांतून, येथील सर्व तथाकथित रसिकांना गाई-गाई करून गेले, की साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट सफल झाले.

थोडक्यात, जे सर्वसाधारण लोकंाना आवडते, ह्याला साहित्य म्हणता येत नाही. साहित्य ते, जे लोकांना झोपी घालते. ह्यापूर्वी इंदूरला झालेल्या साहित्य संमेलनात इंदूरच्या ७० टक्के तथाकथित मराठी लोकांना झोपवण्यात सदर साहित्य संमेलन यशस्वी झाले होते. आता संधी आहे ९० टक्‌क्यांची ! त्यामुळे संत फ्रान्सेश्वर उपसागरीय भागात सदर साहित्य संमेलन होणे गरजेचे आहे. येथील माहितीतंत्रज्ञान (आय टी) विभागात काम करणाऱ्या हजारो मराठी युवक-युवतींकडे ह्या साहित्य संमेलनावर खर्च करण्यासाठी पैसे आहेतच, पण मुख्य म्हणजे त्यांना झोपेची गरजही आहे. बिचारे रात्रंदिवस उगाच काम करतात, स्वत:चे पोट भरण्यासाठी. छान साहित्यिक वगैरे झाले असते, तर ?

एक उलट एक सुलट….

संपन््न दशकाची डायरी : अमेरिकावारी

Tuesday, November 20th, 2007

गेल्या दशकात मराठीत सर्वाधिक लिहिला गेलेला साहित्यप्रकार, म्हणजे अमेरिकावारी. हा प्रकार ढोबळमानाने प्रवासवर्णन ह्या प्रकारात मोडतो, पण प्रवासवर्णन हे बरेचदा रोचक असते, हा ह्या दोन प्रकारांतील मुख्य फरक.

प्रवासवर्णन हा साहित्यप्रकार गेल्या शतकापासून मराठी साहित्यात रूढ आहे. देशाटन केल्याने पंडितमैत्री होते, अशा काहीशा भाबड्या समजुतीने आजवर कागदाची अनेक रिमे आणि शाईचे अनेक ब्यारेल्स वाया गेलेले आहेत. पूर्वी प्रवासावरून (म्हणजे तीर्थयात्रेवरून) परत घरी आल्यावर गावजेवण द्यायची प्रथा होती. त्याला “मावंदे घालणे” असे नाव होते. हल्ली हे मावंदे आपले प्रवासवर्णन लिहून घालण्याची अनिष्ट पद्धत सुरू झाली आहे. त्यासाठी कारणीभूत असणाऱ्या राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक पार्श्वभूमीचा आपण ह्या लेखात आढावा घेणार आहोत.

१९८० च्या दशकात आय आय टी चे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी एक गठ्ठा अमेरिकेत जायचे. त्यावेळी “ब्रेन ड्रेन” म्हणून होणारी आरडाओरड, ९०च्या दशकात जेव्हा व्ही आय टी, पी आय सी टी चे विद्यार्थी एच-१ बी घेऊन अमेरिकेत जाऊ लागले, तेव्हा थांबली. कर्वेनगर, पुणे ५२ ह्या किंचित-साहित्यिकांच्या नगरीतल्या विठ्ठल मंदिराच्या आवारात, पासपोर्ट, व्हिसा, कॉन्सुलेट वगैरे शब्द “हारी विठ्ठल” च्या गजरातून ऐकू येतात. होंडा आणि टोयोटा ही नावे कानावर प्रथमच पडलेल्या बर्वे काकू, लेले काकूंना “तुमच्या मुलाने सिव्हिक घेतली का ? आमच्या मुलाकडे अकॉर्ड आहे” अशी बढाई मारतात. आणि लेले काकू “तुमचा मुलगा अजूनही सिंगल बेडरूम मित्रासोबत शेअर करून राहतो का हो?” असे मुद्दाम चारचौघांत विचारून बर्वेकाकूंचा पाडाव करतात. बर्वे आणि लेले काकू मग वर्षभरात “अनुरूप” मध्ये आपापल्या मुलांची नावे नोंदवतात. आणि एका फाईलवर मोठ्या अक्षरात “।।श्री गणेशाय नम:।।” लिहून, आत फोटो, पत्रिकांचा संचय सुरू होतो. मे महिन्यात मुलगा तीन आठवड्यांसाठी येणार, तेव्हा “उरकून टाकू” असा चहूकडून उद्घोष होतो. मुलगा तसा गुणी आहे, पण आजूबाजूला असे वातावरण, पाय घसरला तर ? म्हणून लवकरच त्याचे दोनाचे चार व्हायला हवेत, नाही का ?

आलेल्या चारशे अर्जांपैकी चाळीस अर्ज निवडले जातात. “मुलगी बी ई आहे, शिवाय सीडॅकचा कोर्स केलाय सहा महिन्यांचा, आणि पासपोर्ट तयार आहे” असे अर्ज अग्रस्थानी येतात. कार्यालयाचं बुकिंग होतं. वराचा पत्ता नाही, वधू कोण हेही ठरलेलं नाही, पण एंगेजमेण्टची तारीख ठरते (त्यासाठी सोसायटीचा प्रशस्त हॉल बुक होतो.) भावी सुनेचे वडील ह्या बुकिंगचे पैसे रिफण्ड करणार, म्हणून त्याच फायलीच्या शेवटी सगळ्या रिसीट्स काळजीपूर्वक ठेवण्यात येतात.

मुलगा येतो. बाबांसाठी रीबॉक किंवा रेबॅन, आईसाठी १४ क्यारटचे कानातले, बहिणीसाठी गॅपचा टी-शर्ट आणि जीन्स, शनेल नं ५, आणि इतर आत्या-मावश्यांसाठी केशर घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेटलॅग तात्पुरता आवरून अर्धवट झोपेतच, वधुपरीक्षेला सुरुवात करतो. सकाळी शॉर्टलिस्ट केलेल्या मुलींशी संध्याकाळी हॉटेलात भेटतो. तिसऱ्या दिवशी, “मुलगी पसंत आहे”चा निरोप जातो. चौथ्या दिवशी फाईलमधल्या रिसीटांची झेरॉक्स (मुलगा हल्ली त्याला फोटोकॉपी म्हणतो) वाग्दत्त सासऱ्यांच्या हवाली होतात. कॉन्सुलेटची अपॉइंटमेंट लगेच दुसऱ्याच आठवड्यात असते, म्हणून एका रजिस्ट्रारला गाठून कागदोपत्री लग्न लावतो. एच-४ व्हिसा मिळतो. कार्यालयात वैदिक पद्धतीने लग्न होते. मुलाला रजिस्टर्ड लग्नानंतरच हनीमून करायचा असतो, पण चारचौघात बरं दिसणार नाही, म्हणून देवाब्राह्मणांच्या प्रतीक्षेत तिष्ठणारा मुलगा लगेच दोन दिवस बंगलोर-मैसूर-उटी करून परत येतो. लगेच प्याकिंगला सुरुवात होते. चितळ्यांची बाकरवडी, आंबा बर्फी, बेडेकरांचे लोणचे, मेतकूट, चकलीची भाजणी, सर्व सर्व काही भरून मुलगा आणि नवी सून अमेरिकेला रवाना होतात.

आणि बर्वेकाका आणि काकू पुन्हा विठ्ठलमंदिराच्या पारावर दर शनिवारी फोनवर मिळणारे अपडेट्स आठवडाभर लेले काकाकाकूंना ऐकवतात. सुनेने महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवात बटाटेवड्यांचा स्टॉल टाकला होता, ही बातमी अंबानींनी रिलायन्स फ्रेश टाकले, ह्याच तोऱ्यात सांण्यात येते. मुलाच्या कंपनीने त्याला ग्रीन कार्डसाठी स्पॉन्सर केले ह्या बातमीसारखीच ती पुणे-५२ मध्ये वायुवेगाने पसरते.

आणि मग नोव्हेंबरात एका फोनमध्ये गुडन्यूज कळते. डॉक्टरांनी जूनमधली तारीख दिलेली असते. अमेरिकेत जूनमध्ये थंडी नसते, हे ऐकून बर्वेकाकूंना मुलाच्या “टायमिंग” चे चारचौघात मनसोक्त कौतुक करताना, आपण कुठल्या गोष्टीचे कौतुक करतोय, ह्याचे भानही उरलेले नसते. सूनबाई पुण्यात असती, तर तिला सातव्या महिन्यातच माहेरी धाडले असते, कारण पहिले बाळंतपण ही तिच्या माहेरची जबााबदारी! पण बाळंतपण अमेरिकेत असल्यााने आम्हीच जावे म्हणतो, इथून सुरुवात होते. आणि पासपोर्टचे अर्ज मागवण्यात येतात. मुलाकडून फॉर्मल इन्व्हिटेशन येते, कॉन्सुलेट मध्ये व्हिसाच्या अप्लिकेशनला जोडायला, आणि बर्वेकाकू बाजूच्या स्टेशनरीवाल्याकडून एक डायरी विकत आणतात. आणि “अमेरिकावारी” ह्या प्रवासवर्णनाचे गर्भाधान होते.

पासपोर्टची एनक्वायरी करायला आलेल्या पोलिसाला तीनशे रुपये दिले, ह्यापासून ते कॉन्सुलेटच्या रांगेत झालेल्या ओळखी, कुणाला कुठल्या कारणांनी व्हिसा नाकारण्यात आला, आम्हाला काय प्रश्न विचारले, प्रश्नकर्ता गोरा होता की निग्रो (अद्याप बर्वेकाकांना काळ्या लोकांना निग्रो म्हणायचे नाही, हे कळलेले नाही) इथपर्यंत सगळ्या नोंदी डायरीत होतात. ह्या प्रवासवर्णनाच्या पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये बर्वेकाकांनी “अपूर्वाई”तील “एक बेपत्ता देशाची” एकवीस पारायणे केली असतात. जायचा दिवस उजाडेपर्यंत पहिली डायरी भरलेली असते. त्यात काय काय सामान घेतले ह्या यादीपासून, ते याधी अमेरिकावारी घडलेल्या सर्व आप्तस्वकीयांच्या मुलाखतीपर्यंत सगळे असते. नवीन डायरी आणण्यात येते. तिची सुरुवात विमानतळापासून होते. विमानात मिळणारे जेवण, अगत्यशील हवाईसुंदऱ्या, हीथ्रो विमानतळावरचे भारतीय सफाई कर्मचारी, ह्या विषयावरच दहा पंधरा पाने लिहिली जातात.

जेएफके, किंवा एसएफओ ला विमान घिरट्या घालताना बर्वेकाकूंना कोलंबसाचे गर्वगीत आठवते. रिसीव्ह करायला आलेल्या मुलाची भेट, त्याच्या अकॉर्डच्या ड्याशबोर्डवरची गणपतीची मूर्ती, अमेरिकेतले गुळगुळीत रस्ते, शिस्तबद्ध वाहतूक ह्याविषयी लिहायला जेटलॅग उपयुक्त ठरतो. पुण्याहून आलेल्या बाकरवड्यांवर ताव मारायला आलेल्या मुलाच्या मित्रांशी बोलल्यावर “येथे अगदी पुण्यात असल्यासारखेच वाटते”, अशी नोंद करायला बर्वेकाकू विसरत नाहीत. मॉल्सचे वर्णन होते. सकाळी मुलगा ऑफिसला गेल्यावर फिरायला जाताना, कुणी अमेरिकन आजी त्यांना “गुड मॉर्निंग” म्हणतात. एवढ्या अनुभवावर, बर्वेकाकांच्या डोक्यात “अमेरिकेतील वृद्ध नागरीकांच्या समस्या” अशी लेखमाला तयार होते. दिवसभर टीव्ही बघून “अमेरिकेचा नैतिक ऱ्हास”, ह्याविषयी बर्वेकाकू डायरीत टिपणे करतात. महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला एकदा जाऊन “अमेरिकेतील मराठी माणसे” ह्याविषयी दोघेही ललित लेखाची जुळवाजुळव करतात.

मेमोरियल डेला मुलाला तीन दिवसाची सुट्टी असते, तेव्हा बर्वेकाकाकाकूंना नायगारा घडतो. तिथेच डेट्रॉयटवरून आलेले (मूळचे डहाणुकर कॉलनीतले, त्यांच्या सुनेला जुलैची तारीख दिली आहे) नेनेकुटुंब भेटते, आणि बर्वे आणि नेने ह्या दोघांच्याही डायरीत त्याची नोंद होते. महिना असाच जातो. नातवाची काळजी घेण्यात आणि उरलेल्या वेळात झी टीव्हीवरील सासबहू मालिका बघण्यात बर्वेकाकू गुंततात, आणि बर्वेकाकांच्या डायरीत आता “कंटाळा” हा शब्द खूपदा लिहिला जातो. सगळी सुबत्ता, सुखसोयींच्या गराड्यात असूनही आपली माणसे, आपले लोक वगैरेंच्या आठवणी अधनं मधनं लिहिल्या जातात. “गड्या आपुला देश बरा” वगैरे ओळींची गर्दी होते.

सप्टेंबर उजाडतो. लवकरच थंडी सुरू होणार, म्हणून बर्वेकाका काकू अमेरिकेतून काढता पाय घेतात. गौरी-गणपतीला पुण्यात घरी असायला हवे, असे सगळ्यांना सांगतात. दुसरी डायरी आता भरलेली असते.

परतल्यावर विठ्ठल मंदिराच्या पारावर “काय, कधी आली अमेरिका?” ह्या वाक्याने त्यांचे स्वागत होते. आणि विठ्ठल मंदिरात तोंडीस्वरूपात आणि घरी आल्यावर लेखीस्वरूपात “अमेरिकावारी: एक प्रवास वर्णन”चा जन्म होतो. इ-सकाळच्या “पैलतीर” मध्ये ते प्रकाशित होते, किंवा न झाल्यास मुलाने घेऊन दिलेल्या कॉम्प्युटरवरून कुठल्यातरी मराठी वेबसाईटवर ते १९ भागांत चढवण्यात येते.

गेल्या दशकात झालेल्या एकूण साहित्यनिर्मितीच्या ३४ टक्के लिखाण हे “अमेरिकावारी” ह्या साहित्यप्रकारात मोडते. गावांची नावे बदलतात, कधी न्यूयॉर्क, तर कधी सॅन होजे. मुलांची, सुनांची नावे बदलतात. आजूबाजूच्या रस्त्यांची नावे बदलतात. पण एकंदरीत स्वरूप हे असेच असते. पण सर्वच लोक काही बर्वेकाकाकाकूंसारखे सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहीत नाहीत. “विमानाने आकाशात झेप घेतली, मुंबईचे ते लुकलुकणारे दिवे पाहताना, मला माझे माणगावात घालवलेले लहानपण आठवले”, अशी सुरुवात करून पहिल्याच प्रकरणात आपले संक्षिप्त आत्मचरित्र लिहितात. काहीजण, अमेरिकेतील मॉलचे वर्णन करताना, गावच्या किराणा दुकानाची आठवण लिहून, पुढे संक्षिप्त आत्मचरित्र लिहितात. काही जण अमेरिकन आजीबाईंच्या “गुड मॉर्निंग”नंतर आपल्या आजीची आठवण लिहून मग पुढे संक्षिप्त आत्मचरित्र लिहितात. एकंदरीत अमेरिकावारी, ह्या साहित्यप्रकारात संक्षिप्त आत्मचरित्र लिहिण्यास खूप स्कोप असतो.

सध्या एवढेच. आमचा ह्या साहित्यप्रकाराचा सखोल अभ्यास असून ह्याविषयावर आमचा प्रबंध तयार होतो आहे. लवकरच प्रकाशित होईल. तारखेकडे लक्ष ठेवा.

नवीन संकेतस्थळ उभारायचेय?

Friday, April 20th, 2007

माझ्या अनेक मराठी संकेतस्थळांवर होणाऱ्या वावरात मला बरेचदा विचारला जाणारा हा प्रश्न: नवीन मराठी संकेतस्थळ कसे तयार करावे ?
त्यावर माझा लगेच प्रश्न असतो. कशासाठी ?
ह्या प्रश्नानंतर बरेचदा हे उत्तरार्थी लोक गप्प बसतात.

काही जण मात्र ह्या प्रश्नाचे उत्तर न देता, दुसरा प्रश्न विचारतात: मला एक मराठी संकेतस्थळ तयार करायचे आहे, ड्रुपॅल वापरावे का ?
माझे उत्तर: तुम्हाला काय करायचे आहे ?
ह्यानंतर मात्र १००% लोक गप्प बसतात.

माझा निष्कर्ष: ज्यांना काय करायचे आहे, हे माहिती आहे, त्यांना ते कसे करायचे, ते आपोआप कळते.

मला मध्यंतरी बऱ्याच विनंत्या आल्या की संकेतस्थळांवरून अर्थलाभ कसा करावा, ह्याविषयी लिहा. गूगल अॅडसेन्स मधून किती पैसे मिळू शकतील? मराठी संकेतस्थळांच्या सध्याच्या (नियमीतपणे असणाऱ्या, पन्नास) ग्राहकांकडून अर्थलाभाची शक्यता आहे काय?

लोकहो, तुम्हाला पन्नास सक्रिय ग्राहक तुमच्या मराठी संकेतस्थळासाठी मिळत असतील, तर ते तुम्ही तुमचे भाग्य समजा, आणि मराठीच्या विश्वजालावरील वर्धनातून आपण समाजसेवा करीत आहोत, असे गृहित धरून त्यासाठी जो खर्च होतो, तो करमुक्त आहे, ह्याबद्दल मायबाप सरकारचे आभार माना.

पण तुम्ही म्हणाल, गूगल आणि याहू! सारख्या कंपन्या भारतीय भाषांमध्ये अधिकाधिक संकेतस्थळे उघडत आहेत. त्यातून अर्थलाभाची शक्यता जर नसेल, अशा मोठ्या कंपन्या असे का करतील ? प्रश्न चांगला आहे. भविष्यात कधीतरी अर्थलाभ होईल, ह्याच आशेने कुठल्याही कंपन्या असे तोट्यात चालणारे धंदे करतात. पण त्यांच्याकडे इतके पैसे आहेत, की अशी तोट्यात चालणारी संकेतस्थळे ते वर्षानुवर्षे चालवू शकतील, आणि त्यांच्या अनेक चतुर्थकांच्या जमाखर्चात त्यांना हा खर्च ‘क्षुल्लक खर्च’ म्हणून दाखवता येईल.

त्यांनी चालवलेल्या संकेतस्थळांना तुम्ही नुकतेच सुरू केलेले संकेतस्थळ स्पर्धा ठरणार आहे का? मग त्यावर त्यांची प्रतिक्रिया दोन प्रकारची असेल. एक, तुमचे संकेतस्थळ ज्या वाचकांना आकृष्ट करते, त्याच वाचकांना आकृष्ट करण्यासाठी तुमच्या संकेतस्थळावर जो मजकूर आहे, तशाच प्रकारचा मजकूर त्यांच्या संकेतस्थळावर टाकणे (तुमचा यू एस् पी, युनिक सेलिंग पॉइंट, काय?). दुसरा पर्याय, तुमचे संकेतस्थळ विकत घेणे. दुसरा पर्याय तुम्हाला सहज मान्य होईल. पण त्यासाठी तुमच्या संकेतस्थळांची जास्तीत जास्त किंमत मिळावी, ह्यासाठी तुम्ही काय करताहात? ही किंमत कशी ठरवतात, ह्याविषयी तुम्हाला थोडीतरी कल्पना आहे का?

आपले संकेतस्थळ मोठ्या संस्थांनी विकत घ्यावे, किंवा त्या मोठ्या संस्थांनी चालवलेल्या इतर संकेतस्थळांचे स्पर्धक ठरावे, ह्याविषयी तुम्ही विचार केला नसेल, तर माझा एक सल्ला. तुमच्या संकेतस्थळाच्या विशेषतेवर (यू एस् पी) आणखी विचार करा. अशा विशिष्टतेसाठी मोठ्या संख्येत सदस्यवर्ग उपलब्ध आहे का? तो सदस्यवर्ग इतर कुठल्याही संकेतस्थळाचा सदस्य नाही, हे आधी ठरवावे लागेल. कारण तो सदस्यवर्ग दुसऱ्या संकेतस्थळाच्या सदस्यवर्गाचा उपसंच असेल, तर ह्या मोठ्या संस्था तुमच्याकडे लक्ष देण्याऐवजी, त्या दुसऱ्या संकेतस्थळाकडे आपले लक्ष केंद्रित करतील, नाही का?

ह्या लेखाचा उद्देश नवीन मराठी संकेतस्थळे सुरू होऊ नयेत, असा नाही. पण ह्या उत्साही संकेतस्थळचालकांनी आपल्या सदस्यवर्गाबद्दल संशोधन करावे, हा आहे. मराठी संकेतस्थळावर येणारा वाचकवर्ग एकाच (सुमारे) दहा हजाराच्या गटातून येतो, असे माझे निरीक्षण आहे. माझे मनोगत, मायबोली, उपक्रम, हेलो मराठी, मराठीवेब, ह्या मोजक्या संकेतस्थळांच्या चालकांना आवाहन आहे, की आपापले मतभेद विसरून, आपापले सदस्यांच्या माहितीचे विदागार एकमेकांशी ताडून बघावे. तुम्हाला एकमेकांशी बोलण्यात कमीपणा वाटत असेल (कुण्या एका संकेतस्थळाच्या चालकाने आपले स्थळ सुरू करताना, त्याच्या जुन्या स्थळावरून सदस्यांना भुलवले, अशा तक्रारी नेहमीच ऐकू येतात), तर मी एक तटस्थ निरीक्षक म्हणून यासाठी माझा वेळ द्यायला तयार आहे. (शेवटी मराठी के लिये कुछभी करेगा, काय? :-)

शोधयंत्राचा शोध - भाग १.५ - पुरवणी

Tuesday, April 17th, 2007

शोधयंत्रात शोध कशाचा घेतात ? माहितीचा.

ही माहिती कुठे असते ? कुठेही. तुमच्या डोक्यात. तुमच्या संगणकावर. तुम्ही दैनंदिनी लिहीत असलात, तर त्यावर. तुम्हाला विरोप (email) येतात, त्यात. तुम्ही इतर संकेतस्थळांवर काहीतरी खरडता, त्यातही. तुम्ही काहीही वाचता, त्यात असते. तुम्ही दुकानात जाऊन काही खरेदी करता, त्यातून नवीन माहिती निर्माण होते. तुम्ही ह्या पृथ्वीतलावर आपला प्रत्येक क्षण घालवता, त्यातून नवीन माहिती तयार होते. तुम्ही आज सकाळी काय खाल्ले? ब्रेड ? अंडी ? उपमा ? काहीही खाल्ले असेल, ते तुमच्याव्यतिरीक्त कुणा एकाला जरी कळले, तरी तुम्ही नवीन माहिती निर्माण केली आहे. शेवटी माहिती म्हणजे तरी काय ? माहिती म्हणजे एकापेक्षा अधिक लोकांना वितरीत झालेला विदा (डेटा). कुणी आज आपण काय केले हे लिहिले (किंवा सांगितले), आणि ते कुणीतरी वाचले (किंवा ऐकले), की ती झाली माहिती.

पण आपण जेव्हा एखाद्या लेखनाला माहितीपूर्ण किंवा माहितीप्रधान लेखन म्हणतो, तेव्हा त्या लेखनात वर्णन केलेल्या माहितीची उपयुक्तता लक्षात घेत असतो. माहिती ह्या संकल्पनेविषयी आपण अजाणतेपणे विधाने करत असतो, की अरे वा, युरोपियन भाषांविषयी मला आज खूप माहिती कळली. पण ह्या माहितीतली अधिक महत्वाची कोणती, हे ठरवणे मात्र प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. युरोपियन भाषांमधल्या ग्रीक आणि लॅटिन ह्या भाषांमधली अधिक पुरातन भाषा कोणती, ही माहिती मला “आज कर्क राशीत शनी कुठल्या स्थानात आहे, वक्र आहे का स्तंभी आहे” ह्यापेक्षा महत्वाची का वाटते, हा फक्त माझा प्रश्न आहे. ह्या एका उदाहरणावरून स्पष्ट होईल, की कुणाला कुठले लेखन माहितीपूर्ण वाटते, हे त्या व्यक्तीचे व्यक्तिगत मत असते. एखाद्या व्यक्तीची अनुदिनी मी का वाच