Archive for the 'कविता' Category

जालकवींच्या कविता: आवाहन

Monday, August 4th, 2008

२००९ मध्ये फेब्रुवारी १४,१५ आणि १६ तारखांना सॅनफ्रॅन्सिस्को उपसागरीय भागात विश्व मराठी साहित्य संमेलन होणार आहे, ही बातमी बहुतेकांना माहिती असेलच. भारताबाहेर पहिल्यांदाच असे अधिकृत साहित्य संमेलन होणार आहे, आणि तेही बे एरिया, ह्या विश्वजालाच्या कर्मभूमीत ! हे साहित्य संमेलन नेहमीपेक्षा वेगळे असावे, ही माफक अपेक्षा रसिकांनी ठेवायला काहीच हरकत नाही. पण मुळात हे वेगळेपण तरी कसे असावे, ह्याबद्दल विचारमंथन करीत असताना, एका कार्यक्रमाची कल्पना सुचली, आणि ती संयोजकांना कळवली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे, म्हणून हे आवाहन.

कार्यक्रमामागील भूमिका: विश्वजाल लोकप्रिय झाल्यानंतर प्रकाशनाच्या विविध संधी सहज उपलब्ध झाल्याने साहित्याची लोकाभिमुखता वाढली. चलचित्रांच्या बाबतीत यू-ट्यूबने क्रांती घडवली. छायाचित्रांत फ्लिकरने. मुद्रित साहित्यापेक्षाही अनुदिन्यांवर प्रकाशित केलेले साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत सहज पोहोचू शकते. अद्याप मराठी साहित्यात हे आमुलाग्र परिवर्तन जरी दिसत नाही, तरी मराठी प्रकाशनाची वाटचालही त्याच दिशेने होत आहे, हे स्पष्ट आहे. मराठी अनुदिन्यांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत झालेली अमाप वाढ ही त्या वाटचालीचीच निदर्शक आहे. मराठीचे हेच भविष्य आहे, असे म्हणायला हरकत नाही. नव्हे, ह्याकडे दुर्लक्ष करणे, किंवा ही वाटचाल थांबवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ह्या नवीन युगातले स्वत:चे अस्तित्वच नाहीसे करणे. हा कार्यक्रम म्हणजे, मराठी साहित्याच्या भविष्याची नांदी.

कार्यक्रमाची रूपरेखा: एकूण २-३ तास. काव्यवाचन आणि काव्यगायन. फक्त त्यातल्या कविता कुठल्याही पुस्तकांत, मासिकांत, किंवा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या नाहीत. ह्या कविता फक्त अनुदिन्यांवर आणि इतर मराठी संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या असतील. कवींची नावे / टोपणनावे देखील जालाबाहेर फारशी प्रसिद्ध नसतील. हेच नाही तर, काव्यवाचन आणि काव्यगायन करणारे, आणि संगीत दिग्दर्शक देखील “प्रोफेशनल” नसतील.

मदत हवी आहे: हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे. आम्ही सर्व “जालकवींना” आवाहन करतो, की आपल्या ज्या कवितांचा ह्या कार्यक्रमात अंतर्भाव व्हावा असे आपल्याला वाटते, त्या आम्हाला ईमेलने पाठवा ! (इमेल कृपया युनिकोडमध्येच ठेवा, आणि कवितेसोबतच, तुमचे जाहीर करण्याचे नाव -टोपणनावही चालेल-, संपर्काचा ईमेल-पत्ता, आणि स्वत:बद्दल एक-दोन ओळी.) जे जालकवी नाहीत, त्यांनी आपापल्या ओळखीच्या, आवडत्या जालकवींकडे हे आवाहन पाठवावे, इतर मराठी संकेतस्थळांवर, आणि स्वत:च्या अनुदिन्यांवर हे आवाहन प्रकाशित करावे, ही नम्र (पण आग्रहाची) विनंती. तसेच ह्या कार्यक्रमासाठी एखादे समर्पक नावही सुचवावे.

आपापल्या कविता आम्हाला खालील पत्त्यांवर पाठवाव्यात.

मिलिंद भांडारकर (milind [DOT] bhandarkar [AT] gmail [DOT] com)
चक्रपाणि चिटणीस (chakrapani [DOT] chitnis [AT] gmail [DOT] com)

([dot] ऐवजी “.”, आणि [AT] ऐवजी “@” वापरावे.)
धन्यवाद !

जाज्ज्वल्ल्य कुक्कुटधर्माची प्रार्थना

Monday, January 22nd, 2007

हल्लीच वातकुक्कुटांनी स्थापन केलेल्या जाज्ज्वल्य कुक्कुटधर्मात आम्ही प्रवेश केलाय, हे जाणकारांच्या लक्षात असेल. ह्या धर्माची अधिकृत प्रार्थना आम्ही रचली आहे. सर्व कुक्कुटधर्मियांनी रोज पहाटे आरवण्यानंतर ही प्रार्थना म्हणावी.

कुकूचकू कुकूचकू ।
जय कुक्कुटधर्मा ।
सुप्रभाति तू करसी ।
आरवण्या कर्मा ॥
कुकूचकू कुकूचकू ॥ धृ ॥

(चाल बदलून)

कुक्कुटांच्या वेषातिल लांडग्यांचा घाला ।
आला, सावध हो तू कुक्कुटभूपाला ।
स्वत:च्या खुराड्याच्या भक्कम कुलपाला ।
तोडून कर तू त्या घुसखोरावर हल्ला ॥
(कुकूचकू कुकूचकू)

(पुन्हा चाल बदलून)

मार्गे दुडू दुडू चाला ।
मुखाने कुकूचकू बोला ॥
अंडि घालणे अम्हा छंद ।
करु नका कधी चोचि बंद ॥
नसे अम्हा कुणाचि भीती ।
दुष्ट जे कोंबड्या खाती ॥

(पुन्हा चाल बदलून, कुक्कुटप्रयात वृत्तात म्हणावे)

अम्हा शोभती हे ।
तुरे लाल जर्द ।
नसू पळपुटे, तर ।
असू आम्हि मर्द ॥

(पुन्हा चाल बदलून, कुक्कुटविक्रीडित वृत्तात म्हणावे, म्हणजे हे कडवे कुक्कुटविवाहात मंगलाष्टक म्हणूनही वापरता येईल.)

आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील खाणावळी ।
आम्हाला वगळा कुणीहि मग का येतील ढाब्यावरी ।
जागी कुक्कुट धर्मिया अजि तुझे का हाल हे चालले ।
ध्यानी तू धरि महाकुक्कुटच जे जगतात सामावले ॥

जय महाकुक्कुट !
जय वातकुक्कुट !!

(या प्रार्थनेत सारख्या चाली बदलणे हे कुक्कुटधर्माच्या मूळ शिकवणीनुसारच आहे. दाणे टिपताना, आणि झुंजताना एकच चाल वापरण्याची आम्हास तरी सवय नाही. हा दुटप्पीपणाच कुक्कुटधर्माचा मूलमंत्र आहे.)

कशी शुद्ध तुजला रहावी स्वत:ची

Monday, January 22nd, 2007

कुणाला त्वचा पांघरावी स्वत:ची
कशी शुद्ध तुजला रहावी स्वत:ची

असो सार्थ वा व्यर्थ अभिमान माझा
कधी ना कधी लाज यावी स्वत:ची

किती काळ शोधूनि गिऱ्हाइकाला
हजामत करी आज न्हावी स्वत:ची

उगा लेखिसी तुच्छ तू गौरवर्णा
छबी कुट्ट काळी स्मरावी स्वत:ची

दिसावे सभोताल गंभीर चेहरे
चुकूनीहि फिरकी न घ्यावी स्वत:ची

फासे फेकुन म्हणे जुगारी

Monday, January 22nd, 2007

फासे फेकुन म्हणे जुगारी
कंटाळा आला मज भारी

खिशात घेउन कोऱ्या नोटा
निघून जातो दूर कुठेतरि

पैसे हरणे सदा नशीबी
लाविन मी शेअर बाजारी

अंबानी बंधूंच्या कुस्त्या
रोज वाचुनी मिटक्या मारी

अनिल, अमर, अन् टीनाभाभी
तीन जणांची जोडी न्यारी

मुकेश म्हणतो रिलायन्सचा
मीच एकटा तारणहारी

मध्यस्थी ती बेन कोकिळा
शोभतसे धीरूची नारी

भावांच्या त्या भरतभेटिने
हर्षोत्फुल्ल दलाले सारी

मनोगतावर रोज लक्तरे
लेवुन माझे शब्द भिकारी

* मूळ कविता: कोलांट्या घेतात मदारी (कवि चित्तरंजन भट)

गुणगान

Monday, January 22nd, 2007

काल मी तुज वर्णिता गुणगान माझे
वाटते मज विश्व हे सुनसान माझे

तू उगा मज गुंतवी चर्चा करूनी
काव्य चेचुन हृदय आहे मस्त माझे

का असा श्रद्धेतुनी तू ठेचतो, मन
नारळा त्या फोडण्यातच ग्रस्त माझे

नागडेपण झाक त्याचे तूच सत्त्वरं
भेदिले अश्लीलतेचे नियम माझे

मी तुझे मन आजवर सांभाळिले रे
मात्र हर्षोत्फुल्ल तू उधळीत माझे

मूळ कविता: आव्हान (कवि कुमार जावडेकर)

प्रायश्चित्त

Monday, January 22nd, 2007

परवाची गोष्ट.
पाय लागला गणिताच्या पुस्तकाला
म्हणून हळहळत केला नमस्कार वाकून
तर तिच्या वाहनाची लाज झाकणारे
दिसले मीच ठेवलेले मोरपीस.
नव्वद मार्क पडले होते तिच्या कृपेमुळे,
विसरून कसं चालेल मला?

काल वर्तमानपत्रावर दोन विटा
टाकून बसवलं पिलावळीला
पोद्दारेश्वराच्या रथयात्रेचा
त्यात फोटो होता आलेला,
सुचलंच नाही मला.
तू रागवला असशील.

आता प्रायश्चित्त घेतो,
जंगी पूजा घालतो,
वृद्धाश्रमातल्या त्या दोघांना,
घेऊन येतो कावडीत घालून,
सव्वा शेराच्या प्रसादासाठी.

खूष ?

नाचताना

Monday, January 22nd, 2007

का असा काष्टा सुटावा नाचताना
‘फेस’ लालेलाल माझा नाचताना

दाण्डियाची वाटते भीती अताशा
काल बोटे चेचलेली नाचताना

पाहुनी माझे जरासे लाल डोळे
“दारु सोडा” ती म्हणाली नाचताना

चारचौघांसारखा मी पीत होतो
नेमके हे का खुपावे नाचताना?

चार पेगांची नशा चढली म्हणोनी
ही अशी तिरपीट त्रेधा नाचताना

एवढे लक्षात घे सर्केश्वरा तू
‘भाइ’ सुद्धा झिंगलेला नाचताना !!

मूळ गझल: हासताना (कवि सारंग)

माध्यान्ह

Thursday, August 10th, 2006

कविता हा माझा प्रांत नव्हे ह्याची मला नम्र जाणीव आहे. पण काही महिन्यांपूर्वी श्यामकल्याण हा राग ऐकताना त्यातल्या शुद्ध आणि तीव्र मध्यमांतल्या दोलायमान होण्याच्या पद्धतीवरून मला ही कल्पना सुचली. सप्तकाच्या मध्यावर येऊन मध्यम स्वर शुद्ध घ्यावा की तीव्र ही मनाची अवस्था आयुष्याच्या माध्यान्ही सारखी आहे - ज्याला आपण मिड-लाईफ क्राइसिस म्हणतो - असे मला वाटले, म्हणून ह्या कवितेचे प्रयोजन.
(more…)

गाणं

Monday, July 10th, 2006

(कुसुमाग्रजांची क्षमा मागून)

गाणं
कुणाचं ऐकावं ?
कुणाचंही ऐकावं…

गाणं…
गानसरस्वती किशोरीचं ऐकावं,
गानकोकिळा हिराबाईंचं ऐकावं,
गानसम्राज्ञी लतेचं ऐकावं,
गानविदुषी वीणेचं ऐकावं,
गाणं कुणाचंही ऐकावं…

गाणं…
वर्मावर बोट नं ठेवता, माणिकबाईंचंही ऐकावं,
आणि मधाळ गोड स्वरातलं, सुमनताईंचंही ऐकावं,
रेशमी जुल्फेंच्या हरहुन्नरी आशेचं ऐकावं,
आणि पिंजऱ्यातल्या चावट उषेचं ऐकावं,
गाणं कुणाचंही ऐकावं…

गाणं…
दणदणित पण रूढीधीष्ट भीमसेनचं ऐकावं,
महंमदशा दरबारच्या सट्ट्यातून, रामभाऊंचं ऐकावं,
चैती भूपातून बंडखोर कुमारजींचं ऐकावं,
बसंताचं, संगीतमार्तंड वगैरे जसराजांचं ऐकावं,
गाणं कुणाचंही ऐकावं…

गाणं…
गोव्याच्या अभिषेकींचं ऐकावं,
धारवाडच्या मन्सूरांचं ऐकावं,
नागपूरच्या वसंतरावांचं ऐकावं,
जबलपुरातल्या पोहनकरांचं ऐकावं,
गाणं कुठलंही ऐकावं…

गाणं…
खांडव्याच्या पंडित किशोरकुमारांचं ऐकावं,
कराचीतल्या उस्ताद नसरतांचं ऐकावं,
ढाक्यातल्या रुना लैलेचं ऐकावं,
कोलकात्यातल्या रशिद खानांचं ऐकावं…
गाणं कुठलंही ऐकावं…

गाणं…
नाजुक, साजुक, असं, बालगंधर्वांचं ऐकावं,
पहाडी भास्करबुवांचं ऐकावं,
बडे गुलाम अलीखांचं तर ऐकावच,
तलम स्वरांच्या आमिरखानांचं पण ऐकावं,
गाणं कुणाचंही ऐकावं…

गाणं…
किराण्याचं ऐकावं,
जयपूरचं ऐकावं,
ग्वालियरचं, रामपूर सहस्वानचं तर एकावंच,
पण अगदी भेंडीबझारचं पण ऐकावं,
गाणं कुठलंही ऐकावं..

गाणं…
केहरव्यातलं रहमानचं ऐकावं,
आणि रूपकातलं इस्माईल दरबारांचंही ऐकावं,
अभिजात अनिल विश्वासांचं तर ऐकावंच,
पण “शास्त्रीय” नौशादचंही ऐकावं,
गाणं कुणाचंही ऐकावं…

गाणं…
सानुनासिक रेशमियांचं ऐकावं,
विजयतापति आदेशजींचंही ऐकावं,
नवीन पोपट आनंद-मिलिंदाचं ऐकावं,
आणि यशस्वी जतिन-ललितचं देखील ऐकावं,
गाणं कुणाचंही ऐकावं…

गाणं…
सोज्ज्वळ, सुमधुर अश्विनीचं ऐकावं,
गोऱ्या घाऱ्या पुष्करचं ऐकावं,
आजोबांचा वारसा चालवणाऱ्या राहुलचं ऐकावं,
आणि आजीचा वारसा चालवणाऱ्या सावनीचं ऐकावं,
गाणं कुणाचंही ऐकावं…

कारण…
गाणं आहे आपली प्रवृत्ती,
आपली संस्कृती,
आपली अभिव्यक्ती,
आपली उन्नती…

गाणं आहे आपलं स्नेहाभिधान,
आपलं रोगनिदान,
आपलं स्मरणसौख्य,
आपलं देहकारण.

कविता- मला आवडलेली

Monday, May 8th, 2006

आजकाल मराठी ब्लॉग्जवर सर्वात जास्त जर लोक काही लिहीत असतील तर कविता. माझी एक अत्यंत आवडती, सुधीर मोघ्यांची कविता इथे लिहित आहे. मोघ्यांशी माझा परिचय तुबालेमुळे झाला.  तो पुण्याहून कानपूरला येताना एक मोघ्यांच्या कवितांचे पुस्तक घेऊन आला. And as they say, rest is history.

मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे
नाही गुंतून जायचे नाही गुंतून जायचे

दूरातल्या अदृष्टाशी तुझी झाली आणभाक
तुझ्या काळजात एक आर्त छळणारी हाक
रक्त इमानी तयाने नाही असे भुलायचे

नाही गुंतून जायचे नाही गुंतून जायचे

घट्ट रेशमाची मिठी तुला सोडावी लागेलं
जन्म गाठ जीवघेणी तुला तोडावी लागेलं
निरोपाचे खारे पाणी कुणा दिसू न द्यायचे

नाही गुंतून जायचे नाही गुंतून जायचे

(मी आयआयटी कानपूरमधून एकदाचा बाहेर पडणार म्हटल्यावर माझ्या मित्रांनी मला ही कविता एका सुंदर भेटपत्रावर राजन गुर्जरनी काढलेल्या छायाचित्रासकट भेट दिली होती.)

बाय द वे, मी देखील ही कविता स्टॅंडर्ड सेंड ऑफ कविता म्हणून वापरली आहे बरेचदा. सॉरी मोघे.