संकेतस्थळांची किंमत: एक चिंतन आणि एक प्रयोग

२००६ ह्या वर्षात विश्वजालावर झालेली आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्वाची घटना कोणती ? यापुढचे काहीही न वाचता, डोळे बंद करा, आणि ह्या प्रश्नाविषयी ५ मिनिटे चिंतन करा.

पाच मिनिटे चिंतन केले? छान. वरच्या प्रश्नाच्या तुम्ही ठरवलेल्या उत्तराविषयी आपण यापुढे बोलू. तुमचे उत्तर काय आहे? नवीन जाहिरातपद्धतीला (पनामा प्रकल्प) लागलेल्या विलंबामुळे याहू!ला समभागबाजारात सहन करावा लागलेला तोटा ? मायक्रोसॉफ्टची शोधयंत्राच्या वापरात झालेली पीछेहाट ? डेलच्या नवीन संगणकांवर गूगलचे शोधयंत्र पहिला पर्याय म्हणून उपलब्ध असणे (त्यासाठी गूगलने डेलला १०० कोटी डॉलर्स देणे)?

आता (मी पुढे दिलेल्या) माझ्या उत्तराशी तुमच्या उत्तराची तुलना करा. माझे उत्तर आहे: गूगलने यूट्यूब ह्या साठ लोकांच्या बुडीतखाती असलेल्या कंपनीला १६० कोटी डॉलर्स देऊन विकत घेणे, ही २००६ या वर्षातील विश्वजालावरील आर्थिक दृष्ट्या सर्वात महत्वाची घटना आहे. ह्याची कारणे माझ्या मते अशी:

१. घोळजालावर आधारित संकेतस्थळाला इतकी जास्त किंमत आजवर कुणीच दिली नव्हती. (मायस्पेस नावाच्या घोळजालावरच्या संकेतस्थळाला फॉक्स नेटवर्कच्या रुपर्ट मर्डॉकने मोजलेल्या किमतीपेक्षा ही रक्कम कितीतरी पट जास्त आहे. घोळजाल हा सोशल नेटवर्क साठी मी बनवलेला शब्द मायमराठीला मी ह्या लेखातून बहाल करत आहे. समाजजाल वगैरे प्रतिशब्दांपेक्षा, घोळका ह्या शब्दावर आधारित हा प्रतिशब्द अशा संकेतस्थळांचे खरे स्वरूप दाखवतो, हे माझे मत आहे. कारण समाज ह्या शब्दाला एक ठिसूळ रुप आहे, जे घोळका ह्या शब्दात नाही.)
२. कुठल्याही संकेतस्थळाचे खरे आधार हे त्या संकेतस्थळाचे ग्राहक, हा विश्वजालाच्या निर्मितीच्या वेळी झालेला विचार अद्यापही अचूक आहे, ह्याची पटलेली खात्री.
३. छोट्या जाहिराती (क्लासिफाईड्स) ह्या मोठ्या वृत्तपत्रात येणाऱ्या, संपूर्ण पृष्ठभर असणाऱ्या जाहिरातींपेक्षा जास्त फायद्याच्या असतात, ही संकल्पना. (गूगलचे उत्पन्न मुख्यत: अशा छोट्या जाहिरातींतून येते.)
४. आपले संकेतस्थळ फुकट उपलब्ध करून त्यावर सुरुवातीला तोटा सहन करणे, हे दूरदृष्टीचे लक्षण आहे. (विश्वजालाच्या सुरुवातीच्या काळात ह्याला तोटाधारित अर्थव्यवस्था - लॉस-बेस्ड इकॉनॉमी - असे म्हणण्यात आले होते.)

गूगलने यूट्यूब ह्या कंपनीसाठी इतके जास्त पैसे खर्च करावे हे अनेकांना पटले नाही. ह्या टीकाकारांची टीका मुख्यत: अशासाठी, की यूट्यूबच्या सदस्यांनी चढवलेल्या चित्रफीती बरेचदा प्रताधिकार कायद्याचा भंग करतात. मी आधीच्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे अमेरिका हा वकिलांचा देश आहे. आणि संकेतस्थळांना ६०% पेक्षा जास्त उत्पन्न ह्या देशातून मिळते. त्यामुळे यूट्यूबवरील चित्रफीती कुठल्यातरी कायद्याचा भंग करतात हे एकदा लक्षात आले, की हे सर्व वकील त्या स्थळावर हल्ला चढवतील. जोवर यूट्यूबचे स्वत:चे काहीही उत्पन्न नव्हते, तोवर ह्या वकिलांना आणि त्यांच्या अशीलांना त्या कंपनीवर दावे टाकून त्यातून काहीही उत्पन्नाची शक्यता नव्हती. पण एकदा गूगलसारख्या धनाढ्य संस्थेने यूट्यूब विकत घेतले, की त्यावर हे सगळे धनाभिलाषी वकील आणि त्यांचे अशील हल्ला चढवतील. अगदी तसेच सध्या होते आहे. गूगलच्या नशीबाने त्यांच्याकडे उत्तमोत्तम वकिलांना पोसण्यासाठी भरपूर पैसे आहेत, आणि अमेरिकेच्या अनेक न्यायालयात सध्या हे प्रताधिकार खटले सुरू आहेत.

पण ज्या कारणासाठी गूगलने यूट्यूब विकत घेतले, त्याचा पूर्ण फायदा करण्यासाठी अजूनही गूगल सज्ज नाही, हा मला खटकणारा मुख्य मुद्दा आहे. गूगलने यूट्यूबला १६० कोटी का दिले ? यूट्यूबला रोज भेट देणाऱ्या कोट्यावधी सदस्यांना गूगलवर प्रकाशित होणाऱ्या छोट्या जाहिराती दिसू शकतील, त्या जाहिरातींवर टिचक्या देऊन ते सदस्य गूगलचे उत्पन्न वाढवतील, हे गूगलचे मुख्य उद्देश्य आहे. ते अद्याप पूर्णपणे साध्य झालेले नाही. पण गुप्ततेला सर्वाधिक महत्व देणाऱ्या गूगलमधून ज्या बातम्या बाहेर येताहेत, त्यावरून असे दिसते की साध्या छोट्या जाहिरातींपेक्षा ह्या चित्रफीतींच्या माध्यमातून ते छोट्याच, परंतु चित्रफीतरूप जाहिरातींवर (क्लासिफाईड व्हिडियो ऍड्स) भर देणार आहेत. ३ मिनिटाची लोकप्रिय चित्रफीत फुकट बघण्याच्या आधी तुम्हाला लवकरच ३० सेकंदांची छोटी जाहिरात बघावी लागेल.

ते काहीही असो, जाहिरातींवर आधारित व्यवसाय जोरात वाढतोय, आणि त्या संकेतस्थळांची किंमत त्या संकेतस्थळाच्या वाचकसंख्येनुसार (आणि त्यातले किती वाचक नियमीतपणे त्या संकेतस्थळाला भेट देतात ह्यावरून) ठरते, हे स्पष्ट आहे.

आपण ह्या मराठी भाषेतील संकेतस्थळावर हा लेख वाचताहात. घोळजालावर तसे पाहिल्यास मराठी संकेतस्थळांची संख्या इतर भाषांच्या मानाने अत्यंत कमी आहे. समजा एखाद्या मोठ्या संकेतस्थळचालकाला आपले संकेतस्थळ कोट्यावधी मराठी भाषकांना उपलब्ध असावे, असे वाटले, तर त्याला मराठी संकेतस्थळ ग्राहक मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे, सध्या अस्तित्वात असलेले एखादे मराठी संकेतस्थळ विकत घेणे. सध्या अस्तित्वात असलेले कुठले संकेतस्थळ विकत घ्यावे बरे ? हा विचार असे मोठे संकेतस्थळचालक करणे साहजीकच आहे. हे कशावरून ठरवावे? तर ज्या संकेतस्थळावर सर्वाधिक ग्राहक येतात, ते संकेतस्थळ सर्वात लोकप्रिय असेल, नाही का? कुठल्या संकेतस्थळांवर किती ग्राहक येतात, ही माहिती फक्त त्या संकेतस्थळचालकांनाच माहिती. पण आम्ही तुमचे संकेतस्थळ विकत घ्यायला उत्सुक आहोत, तुमचे किती ग्राहक (अशा संकेतस्थळाविषयी बोलायचे झाले, तर ग्राहकांऐवजी वाचक म्हणावे लागेल) आहेत हे सांगा असे म्हटले, तर तो चालक ही संख्या वाढवून सांगेल, खरे ना ?

अशावेळी माझ्यासारखे अलिप्त निरीक्षक (थर्ड पार्टी ऑब्झर्वर्स) कामी येतात. मला कुणी सांगितले की मला क्ष आणि ज्ञ, ह्या दोन संकेतस्थळांपैकी एक विकत घ्यायचे आहे. ज्या स्थळावर सदस्यांची अधिक वर्दळ असते, ते विकत घ्यायला मला अधिक आवडेल. परंतु अलिप्त भूमिकेतून त्या संकेतस्थळांच्या सदस्यांच्या वर्दळीचा विदा (डेटा) मला हवा आहे.

ह्यासाठी मी काय करीन ? दर पाचदहा मिनिटांनी त्या संकेतस्थळावर जाऊन तिथे किती लोक सध्या सक्रिय आहेत, ते बघेन, नाही का ? परंतु मला त्याव्यतिरीक्त इतर बरीच कामे आहेत. आणि मुळात कुठल्याही संगणकतज्ञाला मानवी ढवळाढवळ (ह्यूमन इन्वॉल्वमेंट) आवडत नाही. म्हणून माझ्यासारखी कुठलीही व्यक्ती त्या कामासाठी उपयुक्त असे तंत्र वापरून हे काम आपसूक होऊ शकते की नाही ते बघेल.

वाचकहो, मला अशी (म्हणजे मराठी संकेतस्थळ विकत घेण्यासाठी) कुठलीही विनंती (अद्याप) करण्यात आलेली नाही. परंतु आलीच तर आपण तयार असावे, म्हणून मी गुरुवार दिनांक ५ एप्रिल २००७ रोजी माझी १० मिनिटे खर्च करून दर पाच मिनिटांनी ३ आठवडे वयाचे उपक्रम.ऑर्ग हे संकेतस्थळ आणि तीन वर्षे जुने असलेले एक प्रख्यात मराठी संकेतस्थळ, ह्यांची सक्रिय सदस्यसंख्येची तुलना करण्यासाठी आवर्तने सुरु केलीत. सुमारे २६ तास ही आवर्तने दर पाच मिनिटांनी ह्या संकेतस्थळांची मुखपृष्ठे शोषून घेत होती. एका दिवसात सुमारे ३२६ वेळा ही मुखपृष्ठे माझ्या आज्ञावलीने शोषून घेतली. त्यानंतर दिनांक ६ एप्रिल २००७ रोजी त्या साचवलेल्या मुखपृष्ठांवरून मी किती सदस्य आणि किती पाहुणे सध्या हजर आहेत, हे १५ मिनिटांत शोधून काढले. उपक्रम आणि ते दुसरे संकेतस्थळ (त्याला आपण आपल्या सोयीखातर, आणि त्यांची बदनामी वाचवण्याच्या दृष्टीने - ‘म’ म्हणूयात) ह्यांची सक्रिय सदस्यांची तुलना आपण खालील आलेखांवरून करूयात. हे तीन आलेख, दोन्ही संकेतस्थळांवर अनुक्रमे किती सदस्य हजर आहेत, किती पाहुणे हजर आहेत, आणि एकूण किती वाचक (सदस्य+पाहुणे) सध्या त्या संकेतस्थळांवर हजर आहेत, ह्या विदावरून बनवलेले आहेत.

ह्या आलेखांवरून आपल्याला कळलेच असेल की अवघ्या तीन आठवड्यांच्या आपल्या आयुष्यात उपक्रमाने तीन वर्षांपासून सुरू असलेल्या एका आघाडीच्या संकेतस्थळाच्या पार्श्वभागात खणखणीत लत्ताप्रहार केलेला आहे. उपक्रमाची सध्याच इतर संकेतस्थळाशी तुलना नको असे उपक्रमाच्या चालकांचे मत आहे, हे मला माहिती आहे. आणि “आमची इतर कुठल्याही संकेतस्थळाशी स्पर्धा नाही” असे मत त्या दुसऱ्या संकेतस्थळाच्या प्रशासकांचे आहे, हेदेखील कळलेले आहे. परंतु आज जर मला कुणी विचारले की, मला मराठी वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक संकेतस्थळ विकत घ्यायचे आहे, तर वरील आलेखांनुसार मी त्यांना उपक्रम हे संकेतस्थळ विकत घ्या, असे कळवीन.

तुम्ही म्हणाल की त्या दुसऱ्या (’म’ नावाच्या) संकेतस्थळाचे हजारो (सध्या ७०००+) अधिकृत (नावाची नोंद केलेले) सदस्य आहेत, आणि उपक्रमाचे फक्त चारशे सदस्य आहेत! परंतु आजवरच्या माझ्या निरीक्षणानुसार त्या दुसऱ्या स्थळावर प्रत्येक सदस्याने आपली नोंद २ ते ३ वेळा केली आहे. दुसरे म्हणजे तेथील प्रशासकीय धोरणामुळे तेथील अनेक सक्रीय सदस्य सध्या तेथे नोंद केलेली असून देखील जात नाहीत. फक्त नोंद करून एखादी व्यक्ती ही “सक्रीय सदस्य” बनत नाही. तर ती व्यक्ती तिथे कितीवेळा हजर असते, ह्यावरून तिच्या सदस्यत्वाची, आणि त्या संकेतस्थळाची किंमत ठरते.

शेवटी प्रत्यक्ष मिळवलेला विदा महत्वाचा, काय ? अशाच एखाद्या क्षणी, जेव्हा मला तासभर वेळ मिळेल तेव्हा, मी इतर नवीन मराठी संकेतस्थळांची देखील उपक्रमाशी तुलना करून बघणार आहे. किंवा तुम्हाला ह्या विदामिळवणीचा उत्साह असेल, तर तुम्ही देखील ते करू शकता. मी तुम्हाला मी हा विदा कसा मिळवला ते कळवतो.

तुम्हाला काय वाटते?

One Response to “संकेतस्थळांची किंमत: एक चिंतन आणि एक प्रयोग”

  1. Rishikesh C. Says:

    I read all your blogs, they are Exceptionally Superior!
    Thanks for such a beautiful content.

Leave a Reply