शोधयंत्राचा शोध - भाग २ - इतिहास

शोधयंत्रांचा इतिहास विश्वजालाशीच निगडीत असल्याने आपण थोडक्यात विश्वजालाचा इतिहास बघूया.

१९८९ साली स्वित्झर्लंडमधल्या एका अणुशक्तीसंशोधनाच्या प्रयोगशाळेत तिथली माहिती इतरांनाही महाजालावरून सहजपणे उपलब्ध व्हावी ह्या उद्देशातून तिथले एक संशोधक डॉ. टिम बर्नर्स-ली ह्यांनी विश्वजालाचा (वर्ल्ड-वाईड-वेब) शोध लावला. महाजाल (इंटरनेट) आधीच उपलब्ध होते, परंतु त्यावर माहिती वेगवेगळ्या पद्धतीत (प्रोटोकॉल्स) उपलब्ध होती. ह्या सगळ्या पद्धती एकत्रितरीत्या उपलब्ध करून द्याव्यात ह्या उद्देशातून विश्वजालाचा उगम झाला. ह्या शोधात महत्वाची ठरलेली संकल्पना म्हणजे आपण आज सहजरीत्या देतो तो दुवा.

ह्या दुव्यात तीन महत्वाचे भाग असतात. कुठल्या पद्धतीने त्या दुव्याला मिळवायचे (प्रोटोकॉल), कुठून मिळवायचे (महाजाळावरचे कुठले यंत्र), आणि काय मिळवायचे (त्या यंत्रावरील ठिकाण). उदाहरणार्थ, हा दुवा बघा. http://www.manogat.com/user/5238. यातील http म्हणजे ह्या दुव्याला कसे पोहोचायचे ती पद्धती. www.manogat.com हे महाजाळावरील ज्या यंत्रात हा दुवा साठवला आहे, ते यंत्र. आणि /user/5238 हे ढोबळरूपाने त्या यंत्रावरील ठिकाण म्हणायला हरकत नाही. १९९२ च्या सुमारास इतर ठिकाणीही ह्या शोधाचे बरेच उपयोग लक्षात येण्यास सुरुवात झाली. अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठात मार्क ऍंड्रीसन आणि एरिक बीना ह्या दोन विद्यार्थ्यांनी फावल्या वेळात एक न्याहाळक (ब्राउझर) तयार केला. विश्वजाळावरची माहिती संगणकावर कशी प्रस्तुत करावी याची त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिली. त्याला नाव दिले “मोझैक”. ही घटना विश्वजालाच्या इतिहासात इतकी महत्वाची आहे, की इलिनॉयच्या विद्यापीठात ह्या मोझैकच्या स्मृतिपर खालील फलक लावलाय.

त्याच सुमारास इलिनॉयमधल्याच रॉब मॅककूल हयांनी विश्वजालासाठी सेवादात्याची (सर्वरची) निर्मिती केली. आणि तोही फुकट वाटायला सुरुवात केली.

१९९२मध्ये मोझैक अमेरिकेतील बऱ्याच विद्यापीठांत लोकप्रिय झाले होते. सिलिकॉन व्हॅलीतल्या सिलिकॉन ग्राफिक्स ह्या संस्थेच्या संस्थापकांना, जिम क्लार्कना, ह्या न्याहाळकाचे अनेक व्यावसायिक फायदे दिसू लागले. त्यांनी ऍंड्रीसन आणि बीनाला इलिनॉयमधल्या अर्बाना-शॅंपेनमधून त्यांच्या कॅलिफोर्नियातल्या माऊंटन-व्ह्यू ह्या गावी नेले, आणि एक नवीन संस्था स्थापन केली. तिचे नाव नेटस्केप. नेटस्केपने त्यांचा न्याहाळक १९९४ मध्ये फुकट वाटायला सुरुवात केली. आणि आज आपल्याला अतिपरिचित असणाऱ्या विश्वजालाचा जन्म झाला. नव्हे ते अशक्त बाळ चांगले गुटगुटीत झाले.

आधी म्हटल्याप्रमाणे, विश्वजालाचा परिचय अमेरिकेतील (आणि युरोपातीलही) अनेक विद्यापीठांत विद्यार्थ्यांना आधीच झाला होता. सिलिकॉन व्हॅलीतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील दोन विद्यार्थी जेरी यॅंग आणि डेव्हिड फायलो, यांनी त्यांना आवडलेल्या दुव्यांचे संकलन सगळ्यांना बघायला मिळावे म्हणून आपल्या वसतीगृहातल्या खोलीतल्या संगणकावर एक संकेतस्थळ उघडले. त्याचे नाव आपल्याला आता परिचित असेलच. ते स्थळ म्हणजे ‘याहू!’. विश्वजाळातून आपल्याला अर्थप्राप्ती होऊ शकते, हा सूज्ञ विचार करून येथील आद्य गुंतवणूकदारांनी यॅंग आणि फायलो ह्यांच्याशी संधान बांधले. आणि याहू! ही संस्था १९९५ मध्ये जन्माला आली.

विश्वजालावरील संकेतस्थळांची संख्या जोरात वाढत होती. कधीकधी तर दिवसाला दुप्पट व्हायची ही संख्या. अशा सगळ्या संकेतस्थळांची नोंद कशी करणार? ह्यावर फायलोने उपाय काढला. कुणीही नवीन संकेतस्थळ तयार केले, की ह्या संकेतस्थळाचा दुवा याहू! मध्ये त्या संकेतस्थळचालकाने टाकावा अशी सोय केली. अशा दुव्यांची संख्या दहा हजारापेक्षाही जास्त झाली. याहू!च्या मुखपृष्ठावर ती मावेना. म्हणून त्यांचे विषयानुसार वर्गीकरण करायला सुरुवात केली. आणि याहूची विश्वजाल-निर्देशिका (वेब-डिरेक्टरी) जन्माला आली. स्वत:च्या संकेतस्थळाची जाहिरात करण्यासाठी याहू!शिवाय इतर पर्याय नव्हता. त्यामुळे प्रत्येक संकेतस्थळचालक आपल्या संकेतस्थळाचा दुवा आणि त्याविषयी माहिती याहू!वरील विषयानुरूप ठिकाणात टाकायला लागला.

आज आपण याहू!चे मुखपृष्ठ पाहिले असेल. पण मला ११ वर्षांपूर्वीचे, मी इलिनॉय विद्यापीठांत शिकत असतानाचे याहू! चांगलेच लक्षात आहे.

आज नवीन कुठली संकेतस्थळे उपलब्ध आहेत हे कळावे, म्हणून मी याहू!ला रोज भेट देत असे. त्याच वेळी लक्षात आले, की नवीन संकेतस्थळांची घोषणा करताना त्या संकेतस्थळांचे चालक त्यांच्या स्थळांची नोंदणी, जे लोकप्रिय विभाग आहेत, त्यात करायला लागले होते. माहितीला असे स्वातंत्र्य पहिल्यांदाच मिळालेले होते. त्यामुळे ‘सेक्स’ ह्या विषयासंबंधी संकेतस्थळे शोधण्यासाठी चिकार गर्दी व्हायची. याहू!च्या संस्थापकांनी त्यामुळे हा विभाग वेगळा निर्मिलेला होता. ह्या विषयावर सगळ्यांची नजर आहे हे पाहून अनेकांनी आपले संकेतस्थळ ‘सेक्स’ ह्या विषयावर आहे असे याहू!त नमूद करून प्रेक्षकांना आपल्या स्थळाकडे ओढण्याचा प्रयत्न केला!. संकेतस्थळांच्या गैरवापराचा इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला हा पहिलाच प्रयत्न असावा.

हे सगळे इतक्या विस्तृतपणे लिहिण्याचे कारण की आजही शोधयंत्रांना गंडवण्याचे असे प्रयत्न वारंवार होत असतात. त्याचा इतिहास ११ वर्षे जुना आहे. जवळपास विश्वजालाच्या उगमाइतकाच जुना. असो. त्यावर उपाय म्हणून याहू!ने बऱ्याच लोकांची नेमणूक केली. कशासाठी? हे संकेतस्थळचालक आपल्या संकेतस्थळांची ज्या विषयासंबंधित आहेत ही जाहिरात करतात, ते खरेच आहे काय, हे पडताळून पाहण्यासाठी. त्याकाळी मला याहू!कडून विरोप आलेला आठवतोय. “तुम्हाला विश्वजालावर भटकायला आवडते का? तसे असल्यास आमची आस्थापना(कंपनी) तुमच्यासाठी उपयुक्त आहे. तुम्हाला त्यासाठी भरपूर पैसेदेखील मिळतील!” असे हे विरोप. मी ते विरोप क्षणाचाही विचार न करता का काढून टाकलेत, याबद्दल अजूनही अधूनमधून खेद करीत असतो.

असो. “कोई गल नही!” जसजसा याहू!मध्ये वर्गीकृत केलेला संकेतस्थळांच्या दुव्यांचा साठा वाढत गेला, तसतसे लोकांना त्यांच्या आवडीच्या विषयांवरील संकेतस्थळ शोधणे कठीण होऊ लागले. म्हणून याहू!ने एक अगदी मूलभूत स्वरूपाचे शोधयंत्र तयार केले. त्यात तुम्ही तुम्हाला हवा असणारा विषय शब्दरूपात टंकित केला, की याहू!च्या निर्देशिकेत, ते शब्द ज्या संकेतस्थळांच्या दुव्यांत किंवा संकेतस्थळचालकांनी दिलेल्या माहितीत असतील, ते दुवे उत्तरादाखल यायचे. त्यामुळे संकेतस्थळचालक माहितीत लोकप्रिय शब्द मुद्दाम लपवून ठेवायचे. बहुतांश संकेतस्थळे एच-टी-एम-एल ह्या भाषेत असतात. त्या भाषेत लिहिताना शब्द शोधयंत्रांना दिसतील पण वाचकांना दिसणार नाही अशी ‘मेटा’ माहितीची सोय असते. त्यात हे लोकप्रिय शब्द दडवून ठेवायचे हे लोक. आणि त्यावेळचे हे मठ्ठ शोधयंत्र ह्या ‘मेटा’ शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवायचे. आणि लोकप्रिय शब्द शोधखिडकीत टंकित केला, की त्या संकेतस्थळाचा दुवा सर्वात वर असायचा.

आपण जे शोधण्याचा प्रयत्न करतोय, ते आपल्याला कधीच सापडत नाही. इतर अनावश्यक माहितीच जास्त दिसते, असे वाटून लोकांचा ह्या शोधयंत्रावरचा विश्वास पूर्णपणे उडाला.

ह्याच काळात विश्वजालावर माहिती शोधणे अधिक सोपे पडावे म्हणून अनेक तल्लख मेंदू विविध प्रकारे कार्यरत होते, त्याची माहिती पुढच्या भागात.

[गृहपाठ: गेल्यावेळचा गृहपाठ केलाय का ? नसेल तर तो आधी करा. केला असल्यास, जगात सर्वात जास्त शोध घेतला जाणारा शब्द कुठला असेल असे तुम्हाला वाटते ? कल्पना नसल्यास गूगल झीटगाईस्ट बघा. झीटगाईस्ट ह्या मूळ जर्मन शब्दाचे स्पेलिंग माहिती नसेल तर तुम्हाला जे स्पेलिंग वाटते ते शोधयंत्रात टंकित करा. त्या स्पेलिंगच्या जवळपासची स्पेलिंग ते शोधयंत्र सुचवते आहे का? नसल्यास, त्या शोधयंत्राला मनसोक्त शिव्या घाला. अर्थात जवळ कुणी नाहीत हे बघून. १९९५ मध्ये सेक्स हा शब्द एखाद्याने एस-ई-के-एस असा टंकित केल्यावर त्याला त्या काळच्या शोधयंत्रांतून एकही उत्तर न मिळाल्यामुळे किती उद्विग्नता आली असेल ह्यावर विचार करा :-) ]

Leave a Reply