प्रिय ऍबी

होय, आता मी कबूल करतो. मला इथल्या वर्तमानपत्रांत येणारे “डियर ऍबी” हे सदर आवडते. ह्या सदरात स्वत:ला सामान्य म्हणवून घेणारे लोक, आपले असामान्य अनुभव निनावी राहून लिहू शकतात, हेच ह्या सदराचे वैशिष्ट्य. आजच्या सदरात एक अनुभव वाचला, त्याचे हे स्वैर भाषांतर.

प्रिय ऍबी,मी आज एक महत्वाचा धडा शिकल्ये.
वरवरच्या निरीक्षणातून कुठल्याच गोष्टीविषयी निर्णय घेता येत नाही, ह्याचा.
माझ्या शेजारी एक तरुण राहायला आलाय, त्याच्या घटस्फोटित आईसोबत.
ह्या मुलाचे केस खांद्यावर रुळणारे. पूर्ण पोशाख काळा, अगदी नखांवरही काळे नेलपॉलिश. डोळ्यात काळे काजळ.
आमच्या सगळ्याच शेजाऱ्यांना धक्का बसला. असा तरूण आपला शेजारी होणार आता? हा तर सैतानाचाच उपासक दिसतोय!
नंतर काही महिन्यांनी त्या तरुणाने टक्कल केले. आणि एका फाटक्या जीन्समधे तो फिरायला लागला!
अरे बापरे, हा मुलगा आता त्या निओ-नात्झींसारखा झालाय तर. आम्हा सगळ्यांनाच वाटले.
नंतर कधीतरी त्याच्या (घटस्फोटित) आईशी ह्या विषयावर बोलणे झाले.
तिने सांगितले की तिचा मुलगा एका महान विद्यापीठात समाजशास्त्रात उच्च पदवीसाठी शिकतोय.
त्याने घातलेले काळे कपडे एका पार्टीत स्वत:चे वेगळे व्यक्तिमत्व दिसावे म्हणून होते.
तो केस वाढवतो, कारण नंतर ते केस त्याला कर्करोगाच्या रुग्णांना विगच्या रूपाने दान करायचे असतात.
दर उन्हाळ्यांत तो गरीब देशांत जातो समाजकार्य करायला.
आणि दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना रोगांच्या फुकट लशी पुरवायलाही तो मदत करतो.
ऍबी, मला ह्या तरुण माणसाबद्दल प्रथमदर्शनी असे वाईट मत करून घेतल्याबद्दल लाज वाटते.
त्याच्या आईशी बोलणे झाल्यानंतर मी त्याच्याशी स्वत:हून परिचय करून घेतला आहे.
तो किती बुद्धिमान विदयार्थी आहे, हे स्वत: अनुभवले आहे.
ऍबी, तुझ्या वाचकांना माझा हा अनुभव सांग.
आणि प्रथमदर्शनी कुणाविषयीही चांगले-वाईट मत करून घेऊ नका, असे विनवशील?
धन्यवाद.
- तुझी “लज्जित”, ब्रॅनसन, मिझौरी

आपण लोकांच्या अनुदिन्या, सार्वजनिक चावड्यांवर त्यांनी केलेले लिखाण वाचतो, आणि त्यांच्याबद्दल मनात चांगले-वाईट मत करून घेतो. ह्यावर पुनश्च एकदा विचार करायची वेळ आली आहे, आता. नाही का ?

Leave a Reply