११ सप्टेंबर - पाच वर्षांनंतर
११ सप्टेंबर २००१ च्या दहशतखोरांच्या हल्ल्यांनंतर आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. ह्या दिवशी मी न्यूयॉर्कपासून सुमारे १००० मैल दूर होतो. पण त्या दिवशीच्या घटनांचे माझ्या मनात जे चित्रण झाले आहे, त्याचे हे पुनर्चित्रीकरण. अर्थातच आठवणीतून.
सकाळी ६.३०: उठायला खरं तर जिवावर आलेलं आहे. बायको आणि मुलं ३ आठवड्यांपूर्वी भारतात गेलीत. तेव्हापासून जे अनिर्बंध (तसं फारसं नाही, कारण कामं सुरू आहेतंच) आयुष्य जगतोय, त्यात आजवर पहाटे साडेसहा वाजता उठणं कधीच जमलं नव्हतं. जमलं नव्हतं, कारण आवश्यक नव्हतं. पण आज उठायलाच लागणार. आजच ह्या टूथपेस्टला संपायला काय झालंय. बायकोने सॅम्स क्लब मधून आणून ठेवलेला टूथपेस्टचा साठा कुठे तरी सापडावा. अरे देवा, भारतात जायच्या उत्साहात विसरली वाटतं. चला, नुसतंच ब्रश केलं तर काय बिघडलं. आपले एवढे थोर पूर्वज कुठे पेस्ट वापरायचे? बिना पेस्टने ब्रश करतानाही बरेच दात पांढरे झालेत की. उगाच आपण पेस्टला एवढं महत्व का देतो, कोण जाणे.
६.४५: टूथपेस्ट नसली तरी कॉफी तर आहे. मस्त. बायको भारतात गेल्यापासून रोज सकाळी उठून दोन कप कॉफीची सवय लागलीय आता. कॉफीच्या घोटांसोबत, स्थानिक टीव्हीस्टेशनवरच्या नेहमीच्या बातम्या. काल रात्री कुठे कुणी कुणाला लुटलं, कुणाला मारलं, वगैरे वगैरे. जेमतेम एक लाखाच्या वस्तीत रोज रात्री घडणार तरी काय?
७.००: आजच्या कार्यक्रमात काही बदल तर नाही ना? त्यासाठी कुणीही विरोप तर पाठवले नाहीत ना? बायको इथे असताना, इथरनेटची शंभर फुटी केबल बेडरूममधून हॉलमध्ये आणणे निषिद्ध होते. आता काय आपलेच राज्य. लॅपटॉपला ती केबल जोडून विरोप तपासले. नेहमीचेच. नायजेरियातल्या कुण्यातरी हुकूमशहाच्या बायकोचा कित्येक मिलियन डॉलर्स माझ्या सुपूर्द करण्याचा विरोप. मला देण्याऐवजी स्वत:कडेच का ठेवत नाही ही?
७.३०: आंघोळ आत्ता करावी की आल्यानंतर? नेहमीचा प्रश्न. आणि नेहमीचेच उत्तर. आल्यानंतर केली तर दिवसभरातली घाण धुवून निघेल. उद्याचं उद्या बघू. वार्डरोबमधल्या शर्टंची तपासणी, अगदी काखेखाली वास घेऊन. हा ३ दिवसांपूर्वी घातला होता. आज घातला तरी चालेल. बायको इथे असती, तर आपली किती खरडपट्टी निघाली असती? आठवणीने शहारा.
७.४५: निघालो. कारमध्ये छान जसराजांची जसवंती तोडी लावली होती. ह्या महाराजा जसवंतसिंघला काय राज्यकारभार वगैरे करायचा नव्हता का? उगाच लेकाचा तोड्या रचतोय.
८.००: पोहोचलो.
८.०५: अजुन संजय काळे का आले नाहीत इथे? अरे हो, त्यांना आज दोन सादरीकरणं आहेत. एक सुरुवातीला एन अस ए -म्हणजे नॅशनल सेक्युरिटी एजन्सीला- आणि नंतर इथे. मी जर वेळेत पोहोचलो नाही, तर माझे प्रेझेन्टेशन तुला करायला लागेल, त्यांनी सांगून ठेवलेले. पॉवरपॉईंट पण पाठवलेली. आज आमच्या प्रकल्पाचे पुढचे अर्थार्जन ठरवण्यात येणार, आणि माझा बॉस हे सगळे माझ्यावर, एका कनिष्ठ कामगारावर सोडून देतो? मला नवल वाटलं.
८.१५: मायकेल हीथने पूर्ण प्रकल्पाची रूपरेषा द्यायला सुरूवात केली. त्याच्यासमोर बसलेले सगळे आमच्या नेहमीच्या विद्यापीठातल्या श्रोत्यांपेक्षा वेगळे दिसत होतेच. टी-शर्ट आणि जीन्स च्या व्यतिरीक्त वेगळा समुदाय जमला की मला नेहमीच तणाव येतो. हे तर सगळेच सूट घालून आलेले आहेत. ह्यांना मी दिलेले पूर्णपणे तंत्रज्ञानाधारित भाषण कळेल? सगळ्यांपुढल्या टेबलांवर त्यांचे लॅपटॉप उघडे आहेत. विद्यापीठात त्यावेळी खूपच कमी असलेल्या वाय-फाय खोल्यांपैकी ही एक खोली. मला आता उपस्थित लोकांमध्ये थोडी चलबिचल दिसायला लागली होती. मायकल सुटांना समजेल अशा भाषेत पूर्ण प्रकल्प समजवून सांगत होता. तरी ही चलबिचल, तर मग मी ह्या प्रकल्पाची इत्थंभूत तांत्रिक माहिती द्यायला लागलो की काय होईल? मला तिथून पळून जावेसे वाटू लागले.
८.३०: सॉरी टू डिस्टर्ब युवर एक्सलंट प्रेझेंटेशन, प्रोफेसर हीथ. बट आय हॅव्ह अ न्यूज आय हॅव्ह टू कन्व्हे. हे काहीतरी महत्वाचे असणार, आणि पुढच्या वर्षासाठी आम्हाला आता अर्थपुरवठा अमेरिकन सरकारने थांबवला आहे, असे काहीतरी ऐकायला मिळणार, माझ्या पोटात खड्डा. शिकत असताना, माझ्या महासंगणकांच्या ज्ञानामुळे मला ही पूर्णकालीन नोकरी मिळालेली. माझ्या संशोधनाचा ह्या प्रकल्पात वापर होणार ही खात्री, आणि त्यातून आता पुढे आण्विक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष कधीही चाचणी होणार नाही. फक्त महासंगणकावरंच होईल, हा विश्वास. ही बया आता काय वेगळं सांगतेय?
९.००: आमच्या प्रकल्पाचं सगळं सादरीकरण थांबलं होतं. एका ढकलगाडीवर एक मोठ्या पडद्याचा टीव्ही आमच्या खोलीत आणला. सीएनएन वर दुसरं विमान धडकतानाची दृश्यं वारंवार दाखवण्यात येत होती. लगेच दृश्यबदल. दक्षिणेकडची इमारत पडतानाचं दृष्य. पुन्हा पंधरा मिनिटांनंतर दुसरी इमारत पडण्याचं दृश्य. पेंटॅगॉनची दृश्ये. आमच्या प्रकल्पाला दुसऱ्या वर्षीसाठी मंजुरी द्यायला आलेले बहुतेक सगळे वॉशिंग्टन भागातले. लगेच सगळ्यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांच्या निकटवर्तीयांना दूरध्वनी लावायला सुरुवात केली. माझा मेव्हणा, माझी बायको, माझे काका सुरक्षित आहेत असं बाजूच्या व्यक्तीना सांगताना त्यांचे आनंदी चेहरे मी टिपून घेत होतो.
९.३०: दर तासाला ह्या सगळ्या घडणाऱ्या घटना आम्हा सगळ्यांना सांगण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली. त्या व्यक्तीने आमच्या सादरीकरणाकडे लक्ष नाही दिले तरी चालेल, असे सर्वानुमते ठरले. आमच्या प्रकल्पाबद्दल प्रेझेंटेशन सुरू झाले. त्या एका व्यक्तीव्यतिरीक्त सगळे त्या सादरीकरणात गुंतून गेले. संजय काळे आता पोहोचले होते. ते ज्या एनएसए च्या लोकांना आमच्या संशोधनाचे सादरीकरण करत होते, ते संपले होते.
आम्ही साऱ्या विद्यापीठांतील संशोधकांनी ओसामा बिन लादेन आणि त्याच्या अतिरेकी संघटनेला हरवले होते.
संध्याकाळी ६ ला मी घरी पोहोचलो. आन्सरिंग मशीनवर पुण्यातून एक संदेश होता. “तू न्यूयॉर्कमध्ये तर नव्हतास ना?” मी लगेच भारतात फोन केला. “नाही, मी तिथे नव्हतो. पण आम्ही आज दहशतखोरीचा नि:पात केलाय.” त्यांना कळलेच नाही, मी आज इतका का खुष आहे म्हणून.