शब्दांची क्लिष्टता
शब्दभांडारात नविन मराठी शब्दांची संख्या आता ३०० च्या वर गेली आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने बरेच मराठी अनुदिनीकार आणि मनोगती मुद्दाम मराठी शब्दांचा विचार करायला लागले आहेत. या लोकांचे तीन गट करता येतील. काही लोक हट्टाने प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द वापरतात. (त्यातून लोकांना मराठीची गोडी लागण्याऐवजी घृणा उत्पन्न होते.) काही लोक इंग्रजी शब्द जसेच्या तसे रोमन किंवा देवनागरी लिपीत लिहितात. (त्यातून मराठीविषयी वाचकांना न्यूनगंड येतो.) इतर लोक मराठी प्रतिशब्द लिहून कंसात त्याचा मूळ इंग्रजी शब्द लिहितात. हे वाचायला जरा कठिण जात असले, तरी मला स्वत:ला ही तिसरी पद्धत आवडते. अजूनतरी मराठीत ज्या शब्दांचा वापर सर्वसंमत झालेला नाही असे शब्द वापरून लेखन क्लिष्ट होते, हे बहुतेक सर्वांना मान्य आहेच. लेखनाचा मुख्य उद्देश हा वाचकांशी संवाद साधणे असा आहे, त्यामुळे तुमच्या लेखनातले बहुतेक शब्द वाचकांच्या डोक्यावरून जाणार असतील, तर हा वाचकवर्ग तुम्हाला सोडून जाणार हे नक्की.
अशा स्वरूपाचा विचार सुरू असतानाच, माझ्या वाचनात बेंगळूरच्या अजित ओकांचे दोन लेख आलेत. त्यातूनच, आपण एखादा शब्द जास्त क्लिष्ट आहे, किंवा वापरायला सोपा आहे अशी विधाने करतो, त्यात कितपत तथ्य असते, ह्याचा विचार करू लागलो. मायक्रोसॉफ्ट वर्ड ह्या आज्ञावलीत जसे इंग्रजी पुस्तिकेची (document) क्लिष्टता मोजण्याची सोय आहे, तशी आपल्याला मराठीसाठी करता येईल का, असा विचार सुरू झाला. तेव्हा मला असे लक्षात आले, की मराठी ही उच्चारानुसार लिहिण्याची भाषा (phonetic language) असल्याने हे क्लिष्टतामापन आणखी सोपे जाईल. तसेच ह्या पद्धतीचा वापर सोपे प्रतिशब्द कुठले हे शोधण्यासाठी होऊ शकेल.
ही पद्धत अशी. ‘अ’ ते ‘अं’ हे स्वर, आणि ‘क’-'घ’, ‘च’-'झ’, ‘त’-'ध’, ‘ट’-'ठ’, ‘प’-'भ’ अशा व्यंजनमालेतल्या पहिल्या चार अक्षरांना, तसेच ‘य’,'र’,'ल’,'व’,'श’,'ष’,'स’,'ह’,'ळ’ या अक्षरांना प्रत्येकी एक गुण द्यावा. ‘न’,'ण’,'म’ ही देखील एका गुणाची अक्षरे. परंतु ‘अ:’,'अॅ’, ‘ऑ'’क्ष’,'ज्ञ’ ह्या अक्षरांना १.५ गुण आणि ‘ङ’,'ञ’ ‘ऋ’, ‘लृ’ या अक्षरांना २ गुण द्यावेत. एका जोडाक्षरात जी मूळाक्षरे असतील त्यातल्या अर्ध्या अक्षरांना त्यांच्या मूळ गुणांच्या अर्धे गुण, आणि पुर्णाक्षरांना पुर्ण गुण द्यावेत. व्यंजनांना स्वर जुळून जी अक्षरे होतात, त्यांत त्या स्वराच्या गुणाच्या पाव गुण मिळवावे. म्हणजे, ‘क’ ला एक गुण पण ‘का’, ‘की’, ‘कु’ ला प्रत्येकी १.२५ गुण असतील. असे गुण देवून शब्दांतील सगळ्या गुणांची बेरीज करावी. ती त्या शब्दाची क्लिष्टता. जितके जास्त गुण तितकी शब्दाची क्लिष्टता अधिक.
आता काही उदाहरणे पाहूया.
कमळ - १+१+१ = ३ गुण
तळे - १+१+.२५ = २.२५
तलाव - १+१+.२५+१ = ३.२५ गुण
संचालक - १+.२५+१+.२५+१+१ = ४.५ गुण
अध्यक्ष - १+.५+१+१.५ = ४ गुण
संगणक - १+.२५+१+१+१ = ४.२५ गुण
पारिपार्श्वक - १+.२५+१+.२५+१+.२५+.५+.५+१+१ = ६.७५ गुण
हेच सूत्र आपल्याला मूळ इंग्रजी शब्दापेक्षा मराठी प्रतिशब्द क्लिष्ट आहेत की नाही हे ठरवण्यासाठी वापरता येईल. जसे, कॉम्प्युटर ला संगणक हा प्रतिशब्द क्लिष्ट आहे का ?
कॉम्प्युटर - १+.३७५+.५+.५+१+.२५+१+१ = ५.६२५
संगणक - (वर दिल्याप्रमाणे) ४.२५ गुण
कुठला शब्द बोलायला अथवा लिहायला क्लिष्ट आहे ? ह्या पद्धतीत आणखी सुधारणा करायची झाल्यास पूर्ण वाक्याची क्लिष्टता देखील मोजता येईल. जितके मोठे वाक्य तितकी क्लिष्टता वर्गप्रमाणात अधिक. त्यामुळे वाक्यातील शब्दांच्या गुणांची बेरीज करून त्याला वाक्यातील शब्दांच्या संख्येने गुणावे, म्हणजे वाक्याची क्लिष्टता मिळेल.
असे काम याआधी झाले आहे का ? संदर्भ देऊ शकाल का ? आपल्यापैकी कुणीतरी आज्ञायकाने (programmer) यासाठी आज्ञावली तयार करून जनभारती प्रकल्पाला दान करावी असे मी आपल्याला आवाहन करतो.
July 14th, 2006 at 1:25 am
आपण शब्दभांडाराचे काम करत आहात. आज मला महाजालात फ़िरताना मायक्रोसॉफ्टची हा एक दुवा सापडला आहे त्यावर अवश्य भेट द्यावी.
(http://www.bhashaindia.com/Community/CGW/Marathi.aspx)
December 18th, 2007 at 9:45 pm
क्लिष्टतामापन हि पद्धत सुरेख. शब्दाच्या क्लिष्टतामापन केलेल्या अंकाला “क्लिष्टतामान” (.५ + १ + .२५ + .५ + १ + १ + .२५ + १ + .२५ + १ = ६.७५) असा शब्द वापरावा, असे मला सुचवावे वाटते.
शिवाय क्लिष्टतामापन पद्धत अजून क्लिष्ट करावी असे वाटते
.
कारण
तळवळकर चे क्लिष्टतामान ६
पारिपार्श्वक चे क्लिष्टतामान ६.७५.
मग जवळजवळ सारखेच क्लिष्ट ?
यावर उपाय म्हणून. सापेक्ष क्लिष्टतामान काढावे.
सापेक्ष क्लिष्टतामान: सामान्य क्लिष्टतामानातून शब्दातील पूर्ण अक्षरांची संख्या वजा करता उरेल तो अंक
मग
पहिल्याचे क्लिष्टतामान शून्य.
तर दुसर्याचे ६.७५ - ५ (प - १, र - १, प - १, व - १, क - १ ) = १.७५ होईल.
कमळ ३ - ३ = ०
तळे २.२५ - २ = .२५
तलाव ३.२५ - ३ = .२५
संचालक ४.५ - ४ = .५
अध्यक्ष ४ - ३ = १
संगणक ४.२५ - ४ = .२५
कॉम्प्युटर ५.६२५ - ४ = १.६२५
क्लिष्टतामान .७५ - ५(ल -१, ट - १, त - १, म - १, न - १) = १.७५
वाक्य क्लिष्टतामान सामान्य पद्धतीने असे होईल
तळवळकर कमळ बघ. ६+३+२ = ११ * ३ = ३३
अध्यक्षा कमळ बघ. ४.२५ + ३ + २ = ९.२५ * ३ = २७.७५
तेच सापेक्ष क्लिष्टतामान पद्धतीने असे होईल
तळवळकर कमळ बघ. ०+०+० = ० * ३ = ०
अध्यक्षा कमळ बघ. १.२५ + ० + ० = १.२५ * ३ = ३.७५