आनंदवनातले दिवस
आजकाल आमच्या ऑफिसातल्या लोकांना एक वाईट खोड जडली आहे. तुम्ही मूळचे कुठले असा प्रश्न विचारत असतात सारखे. आमच्या आठ मजली इमारतीतल्या आठव्या मजल्यावर, जिथे मी काम करतो, तिथे जगाचा एक मोठ्ठा नकाशा लावला आहे, आणि बाजूला छोट्या पिना. उद्देश असा की तुम्ही मूळचे कुठले त्या गावाच्या नावावर तुम्ही त्यातली एक पिन लावावी. जगातल्या बऱ्याचशा देशांवर अशा पिना लागलेल्या आहेत. परवा मी पहिल्यांदाच ते बघितलं, आणि मध्य भारतात, नागपूर आणि चंद्रपूरच्या मध्ये कुठेतरी पिन लावण्याचा उद्योग करत असताना, माझा एक अमेरिकन सहकारी तिथे येऊन म्हणाला, की तू मुंबईवर का पिन लावत नाहीस ? त्याचंही काही चुकलं नव्हतं. अमेरिकन लोकांना मी माझं गाव मुंबईच्याजवळ असं सांगत होतो. भारतीय पण अमहाराष्ट्रीय लोकांना मी नागपूर असं सांगत होतो. पश्चिम महाराष्ट्रीय (म्हणजे पुण्यामुंबईच्या) लोकांना देखील नागपूर व्यतिरीक्त विदर्भात काही आहे हे माहिती नसतं, त्यांना पण मी नागपूरच सांगत होतो. त्यामुळे मी अशा अशहरी भागात का पिन लावत आहे असा त्याला पडलेला प्रश्न योग्य होता. मी पिन लावण्याचा प्रयोग करत होतो ते ह्या जगाच्या नकाशात नाव नसलेल्या माझ्या वरोरा ह्या गावावर. नागपूरपासून १०६ किलोमीटर दक्षिणेला, चंद्रपूर जिल्ह्यात, जिल्हयाच्या गावापासून ४४ किलोमीटर उत्तरेला असलेल्या ह्या गावावर. जगाच्या नकाशावर प्रामुख्याने नोंद असावी अशी लोकसंख्या या गावात नव्हती. उणेपुरे ३५००० (तेव्हा) लोकवस्तीचे गाव.
ह्याला माझे गाव म्हणावे असेही ठोस माझ्या गाठी काहीही नाही. आयुष्याची पहिली आठ वर्षे या गावात गेली. त्यातले मला बरेचसे आठवतही नाही. इयत्ता दुसरीत असताना, आईला जवळच्याच (म्हणजे वरोऱ्यापासून ५३ किमी असलेल्या) चिमूर (लोकसंख्या तेव्हा १२०००) ह्या गावात शिक्षिकेची नोकरी मिळाली, आणि आम्ही मुले आईसोबत चिमूरला राहायला लागलो. बाबा दर शनिवारी वरोऱ्याहून यायचे, आणि सोमवारी सकाळी परत जायचे. बरेचदा आम्ही (आई, मी, आणि माझी बहिण) देखील शनिवार-रविवारचे हेच रुटीन करायचो. वरोऱ्याचे एवढे मोठे सहा खोल्यांचे घर असे रिकामे रहावे याची आम्हाला खंत होती. आज मला आठवले, की मी तेव्हादेखील सगळ्यांना आम्ही खरे वरोऱ्याला राहतो असे सांगायचो. ते पूर्णपणे खरे नव्हते. आम्ही रहायचो वरोऱ्याच्या जवळ (३ किमी वर) आनंदवन ह्या छोट्याशा वस्तीमध्ये. वाचकांपैकी काहींना आनंदवन हे नाव आठवले असेल. आनंदवन ही कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटेंनी निर्माण केलेली वस्ती. ही वस्ती खरे तर जगाच्या नकाशात ठळक अक्षरांनी नोंदली जावी.
माझे आईवडील कुष्ठरोगी नव्हते, आणि नाहीत. माझे वडील चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते १९६४ पर्यंत. चालकांशी राजकारणामुळे वाद झाला, आणि ते तिथून बाहेर पडले तेव्हा कळलं की आनंदवनात एक नविन महाविद्यालय - आनंद निकेतन महाविद्यालय - सुरू झालंय आणि त्यांना प्राध्यापकांची आवश्यकता आहे. म्हणून तिथे आले. तिथेच त्यांची आईशी ओळख झाली. ती वरोऱ्यातल्या लोकमान्य कन्या विद्यालयात शिक्षिका होती. महाविद्यालयातल्या एका नाटकाच्या निमित्ताने दोघांचा परिचय झाला, आणि १९६७ मध्ये त्यांचे लग्न झाले. आनंदवनात त्यांना एक घर देण्यात आले. तिथे आम्ही १९८५ पर्यंत रहात होतो.
आम्ही आनंदवनात रहातो म्हणून माझ्या मित्र(?)मंडळींनी माझी “म्हणजे तुम्ही महारोगी” अशी केलेली कुचेष्टा अजूनही आठवते. त्याबद्दल मी वडिलांना एकदा सांगितले. ते म्हणाले हाताच्या मुठी घट्ट आवळ आणि मी तुम्हाला स्पर्श करतो म्हणून त्या मित्रांच्या मागे पळ. मला सुरुवातीला ते म्हणणे अजिबात पटले नाही. पण त्यांच्या सांगण्यावरून एकदा तसे करून पाहिले. त्याचा नंतर खेळच झाला. मित्रांनाही हळू हळू पटले की मी आनंदवनात रहात असलो तरी महारोगी नाही. त्याचा उपयोग मला जास्त मित्र मिळण्यात झाला असला, तरी मनात एक खंत नेहमीच राहिली. सुशिक्षित घरांमधले माझे हे मित्र, त्यांना एवढेही ठाऊक नसावे की महारोग हा सहज-संसर्गजन्य रोग नाही ? आनंदवनात राहून, इतर महारोग्यांशी संबंध येऊन पहिली-दुसरी मध्ये हे तरी कळले होते मला. मग मी घसा फाडून या सगळ्यांना समजवून सांगतो आहे, तरी यांचा विश्वास का बसत नाही ?
मुरलीधर देविदास आमटे, अर्थात बाबा आमटे, ह्यांनी विधी-पदवी नागपूरहून संपादन केली. आणि नागपूरच्याच इंदू घुलेशास्त्रींशी (सध्याच्या साधना आमटे) लग्न करून वरोऱ्यात वकिली करण्यासाठी दाखल झाले. वकिली चांगली चालली होती. गावात प्रतिष्ठाही वाढली होती. त्यातून नगरपालिकेत उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. १९४०-५० च्या दशकातली ही गोष्ट. डोक्यावरून मैला वाहून नेणाऱ्या भंग्यांनी संप केला. त्यांच्या मागण्या अवाजवी वाटल्या म्हणून हा वकील पेटला. तुम्ही ते करण्याची गरज नाही, गांधींच्या शिकवणुकीत वाढलेला मीदेखील ते करू शकतो, असे जणू दाखवून देण्यासाठी नागपूरच्या वेदव्युत्पन्न ब्राम्हणाच्या घराण्यात वाढलेल्या ह्या मुरलीधराने संपग्रस्त भागांमध्ये मैला डोक्यावरून वाहून नेण्यास सुरुवात केली. एकदा अशाच पावसाळी दिवशी मैला वाहून नेत असताना त्यांना गटाराच्या कडेला पडलेला एक कुष्ठरोगी दिसला. करुणामूर्ती मुरलीधराने त्याच्या अशा परिस्थितीची कारणमिमांसा करायचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला समाजातले एक भयानक सत्य उमगले. त्यावेळी महारोग हा सध्याच्या एड्ससारखा रोग समाजाला भेडसावत होता. ह्या महारोग्यांसाठी काही करता येईल का म्हणून त्यांनी कलकत्त्याच्या एका वैद्यकीय संस्थेत कुष्ठरोगनिर्मूलनाचे शिक्षण घेतले. ते सहा महिन्यांचे शिक्षण पुरे करत असतानाच, कुष्ठरोगावर वैद्यकीय उपाय शास्त्रज्ञांनी शोधून काढला. शास्त्रीय दृष्ट्या कुष्ठरोग आटोक्यात आला, पण सामाजिक दृष्ट्या मात्र तो अजूनही महागंभीर होता. त्याचे काय करावे हा प्रश्न आमट्यांना पडला. त्याचे उत्तर म्हणून त्यांनी आनंदवन सुरू केले. वरोऱ्याजवळची काही एकर जागा त्यांनी स्वखर्चातून विकत घेतली. ते एक माळरानच होते. कोल्हे, बिबटे, साप असे उपद्रव त्यात होते. पण त्यांनी आणि साधनाताईंनी ह्या सगळ्यांचा सामना करीत ते माळरान स्वच्छ करून त्यावर झोपड्या बांधायला सुरुवात केली. आणि कुष्ठरोग्यांची काळजी घ्यायला आणि त्यांना समाजात परत सामावून घेतले जावे याची सुरुवात केली.
एकाची मर्यादित मिळकत एवढ्या मोठ्या कामासाठी कशी पुरी पडणार. आनंदवनाला त्या उर्जितावस्थेत कसे तगवावे हा बाबा आमट्यांपुढे मोठा प्रश्न होता. वरोऱ्याच्या बाहेरच्या त्या सुपीक मातीसारख्या त्यांच्या सुपीक डोक्यातून एक कल्पना आली. इथे भाजी पिकवून वरोऱ्यातल्या भाजीबाजारात विकावी. आणि मुरलीधर आमटे, एल. एल. बी. वरोऱ्याच्या भाजीबाजारात भाजी विकायला जाऊ लागले. पण महारोग्यांनी पिकवलेली भाजी इतर लोकांनी कशी घ्यावी? आणि ती भाजी आपल्या इतर भाज्यांपेक्षा स्वस्त म्हणून इतर भाजीवाल्यांनी त्यांना बाजारातून हाकलूनच दिले. त्यानंतर त्या बाजारपेठेत स्वत:चे अस्तित्व कायम करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न म्हणजे कुठल्याही भांडवलवादी देशातील औद्योगिकांसाठी आदर्श ठरतील. साम-दाम-दंड-भेद ह्या सगळ्यांचा वापर करून त्यांनी आनंदवनासाठी एक बाजारपेठ निर्माण केली. आनंदवनाचा विस्तार होतच राहिला. कुष्ठरोगापासून मुक्त झालेल्यांनादेखील समाज स्वीकृत करायला तयार नाही हे पाहिल्यावर त्यांनी अशा लोकांसाठी सुखसदन हा नवीन प्रकल्प सुरू केला. तिथे छोटे औद्योगिक कारखाने उभारले. चाळण्या, कापडे, चपला अशा गोष्टी बाजारात नेऊन त्यांनी आनंदवनाचा एक ब्रॅंड निर्माण केला. सत्याचे प्रयोग वगैरे लिहून बाजारपेठेच्या सत्यापासून दूर राहिलेल्या महात्मा गांधीच्या ह्या शिष्याने बाजारपेठेला कवटाळूनही समाजकार्य होत असते ह्याची प्रचिती दिली.
माझा आणि बाबा आमटेंचा संबंध आम्ही तिथेच रहात असल्यामुळे अगदी लहानपणापासूनच. खऱ्या अर्थाने बाबा आमचे घरमालक, आणि माझ्या वडिलांचे वरिष्ठ देखील. कारण माझे वडील ज्या महाविद्यालयात शिकवायचे, ते आनंदवनाच्या संचालक समितीने, म्हणजे महारोगी सेवा समितीने, चालवले होते. त्या समितीचे अध्यक्ष बाबा आमटे. वरोरा-चिमूर रस्त्यावर आनंदवनाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्यापासून आत एक ५० पावलांच्या अंतरावर आम्ही भाड्याने रहात होतो. प्रवेशद्वारावर एक झोपडी होती त्यात सीताराम नावाचा रखवालदार रहात असे. हा रखवालदार मूळचा उत्तर प्रदेशचा. हातात एक लठ (जाड लाकूड) घेऊन दारात बसत असे. एकदा भावनेच्या भरात त्याने उत्तर प्रदेशात (हमरे गांवमॉं) दोन खून केल्याचे सांगितले. आणि नंतर त्याला कुष्ठरोग झाला. त्याच्या कृत्यांमुळे झालेली देवाची अवकृपा म्हणून त्याला त्याच्या गावकऱ्यांनी आनंदवनात पाठवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या खुनाच्या कबुलीनंतर आम्ही निर्धास्त झालो. आमची सुरक्षेची काळजीच मिटली.
आमच्या घराच्या बाजूला आनंद निकेतन कृषी महाविद्यालय होते. तसेच आनंद निकेतन महाविद्यालयाचे वाचनालय. त्या इमारतींच्या सुरक्षेसाठी ठेवलेले दोन कुष्ठरोगी सुरक्षाकर्मी, आत्माराम, आणि काशीनाथ ह्यांच्याशी आमची मुलांची खूपच मैत्री झाली होती. आम्ही बहिण-भाऊ आणि आमच्या शेजाऱ्यांची दोन मुले जेव्हा आंगणात खेळायचो तेव्हा खेळाडूंची कमी भरून काढण्यासाठी आत्माराम आणि काशिनाथ यांचा उपयोग व्हायचा. त्यांनी कधी विकेटकीपर म्हणून भूमिका निभावली आहे, तर कधी गोलकीपर म्हणून. आमच्या घरात, ती जागा मूळचे शेत असल्यामुळे, खूप नाग निघायचे, आणि धामणी, विंचू, इंगळ्या देखील. पण नेहमीच्या ह्या उपद्रवामुळे आमचे त्याविषयीचे भय नाहिसे झाले होते. असे काही जनावर आमच्या घरी दिसले, की आम्ही आम्ही आत्माराम आणि काशीनाथला साद घालायचो. त्या जनावराची लांबी-रुंदी बघून ते त्यांच्या कुवतीबाहेर आहे असे बघितले की जवळच्याच कुष्ठरोग-रुग्णालयातल्या बिहारीला बोलवून आणायचे. हा बिहारी नाग पकडण्यात अतिशय कुशल. एक मोठ्ठी साणशी आणायचा, त्यात नाग पकडायचा. महारोग्यांना साप चावून देखील काहीही होत नाही या अंधश्रद्धेचा हा परिणाम. परंतु अंधश्रद्धा का होईना पण मनाच्या दृढतेवर त्याचा असाही परिणाम होतो, हे त्यामुळे माझ्या मनावर झालेले संस्कार.
माझा तिथे रहात असल्यामुळे आमटे परिवाराशी संबंध येतच गेला. त्यातला माझ्या दृष्टीने महत्वाचा संबंध माझ्या बारावीतल्या गुणवत्तायादीत सहावा येण्यानंतर आला. नागपूर बोर्डाच्या गुणवत्तायादीत माझ्या आधी चार वर्षांपूर्वी (१९८१ मध्ये) एकाने गुणवत्ता यादीत सातवा येऊन त्या महाविद्यालयाच्या इतिहासात नवीन विक्रम केला होता. त्यामुळे मी गुणवत्ता यादीत सहावा, त्याच्या आधल्या क्रमांकावर आल्याचा आनंद मला होताच. त्या आनंदात मी असतानाच, विकास आमटे, बाबांचा मोठा मुलगा, सकाळी माझ्या घरी आला. “अभिनंदन, बाबांनी तुला भेटायला बोलावलं आहे.” या स्वरूपाचं काही तरी बोलला. मला त्यावेळी झालेल्या आनंदातिरेकामुळे आता काही आठवेनासे झाले आहे. पण त्यानंतर मी बाबांना भेटायला गेलो ते मला खूपच चांगले आठवते आहे. बाबा त्यांचा कंबरपट्टा घालून त्यांच्या गादीवर लेटले होते. मी पायाला हात लावून नमस्कार केला. म्हणाले; “अभिनंदन. मला वाटलेच होते की तू यावेळी आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करणार म्हणून. आता काय करायचा विचार आहे ?” मी सांगितले की बिट्स, पिलानी ला जाऊन संगणक विज्ञानात पदवी घ्यायचा विचार आहे. त्यावर ते जे म्हणाले ते मला त्यांच्या आनंदवनाविषयी केंद्रित असलेल्या आणि तरीही जगातल्या इतर घडामोडींविषयी माहिती असणाऱ्या वृत्तीचे विशेष वाटते. ते म्हणाले: चांगले आहे. संगणक हे आनंदवनातल्या तथाकथित अस्पृश्यांसाठी एक चांगले माध्यम ठरणार आहे, कारण त्यावर केले जाणारे काम हे भाजी विकण्यासारखे नाही. त्यावर स्पर्शाशी निगडीत काहीही नाही, त्यामुळे कुष्ठरोग्यांनी केलेले काम आणि इतरांनी केलेले काम यात काहीही फरक नसेल.” त्यावेळी मला संगणकाविषयी फारसे माहिती देखील नव्हते. त्यामुळे मी मान डोलवून माझे अज्ञान झाकण्याचा प्रयत्न केला. पण आज जेव्हा मी हे बोल आठवतो, तेव्हा माझ्या अंगावर शहारा येतो. सामाजिक कार्यात गुंतलेल्या बाबांनी संगणक तंत्रज्ञानाविषयी एवढी माहिती कशी आणि कधी गोळा केली असेल ? दुसरं असं वाटतं की त्यांच्या प्रिय विषयांत, म्हणजे कुष्ठरोग्यांमध्ये ह्या तंत्रज्ञानाचा केवढा उपयोग होणार आहे हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे त्याविषयीच्या सगळ्या अशा तंत्रज्ञानाविषयी त्यांनी असे लक्ष ठेवलेले योग्यच आहे. मी चार वर्षांचा संगणक विज्ञानाचा अभ्यासक्रम पुरा करून त्यांना भेटायला गेलो, तेव्हा ते नर्मदाआंदोलनात मध्यप्रदेशात होते. विकासची भेट झाली. तो म्हणाला की बाबांच्या आज्ञेनुसार आम्ही आनंदवनात बरेच संगणक आणले आहेत, आणि ताजनेसारखे (चक्रखुर्चीतला आनंदवनातला एक योद्धा) लोक ते वापरताहेत. मला डोळ्यातले पाणी आवरेनासे झाले. मी जे काही करतो, त्याचा उपयोग माझ्या आनंदवनवासी बांधवांना होणार म्हणून.
पु ल देशपांडेंना ना मध्यंतरी आनंदवनाच्या अस्तित्वाची जाणीव झाली. मी तेव्हा सहावी-सातवीत होतो. म्हणजे १९८०-८१ ली गोष्ट असेल. त्यांच्या देणगीतून आनंदवनात एक मोठा रंगमंच उभा राहिला. मुक्तांगण नावाचा. पुलं आणि सुनिताबाई वारंवार आनंदवनात येऊ लागल्या. आम्ही जेव्हा चिमूरहून आनंदवनात यायचो शनिवार रविवारी, आणि जेव्हा आम्हाला कळायचं की पुलं आले आहेत म्हणून, तेव्हा आम्ही आईबाबांसकट बाबांच्या घराभोवतीच असायचो. पुलंचं दर्शन होईल म्हणून. आणि बरेचदा तसं व्हायचं. त्यातून मिळणारा आनंद काय वर्णावा. त्यातून नंतर पुलंनी बाबां आमटेंच्या गळी त्यांची एक कल्पना उतरवली. आनंदवनाच्या चाहत्यांसाठी दरवर्षी एकदा एक तीन दिवसांचा मेळावा आयोजित करायचा, तो मित्रमेळावा. पुलंनीच उभारलेल्या मुक्तांगणात हा मेळावा व्हायचा. त्यात पुलं, वसंतराव देशपांडे, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, वणीच्या लोकमान्य महाविद्यालयातले प्राचार्य राम शेवाळकर, इंदूरचे बाबा डिके (आपल्या नाट्यकलावंतांसकट) , चंद्रपूरचे माजी खासदार शांताराम पोटदुखे ह्या सर्वांची ओळख झालेली आठवतेय या मित्रमेळाव्यामुळे.
ह्या मित्रमेळाव्यांत होणारी भाषणे, त्यातील कार्यक्रम यामुळे माझ्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. मी आनंदवनातले संगीत गुरुजी श्री शिरसाट यांच्याकडे गाण्यातले अबकड म्हणजे सारेगम शिकलो. त्यामुळे मित्रमेळाव्यांत होणाऱ्या स्थानीय कलाकारांच्या कार्यक्रमांमध्ये मला एक संधी मिळाली. त्यावेळी लोकप्रिय असणारे नागपूरचे धंतोलीतले शाहीर शरद मुठे ह्यांच्या “छान छान मनीमाऊचे बाळ”, “आला रे आला फेरीवाला”, “छुगडीचे लगीन” अशी गाणी म्हणून मी परत विंगेत जात असताना एका आजोबांसारखी दिसणारी व्यक्ती त्याच वेळी विंगेतून रंगमंचाकडे जात होती. त्यांनी माझी पाठ थोपटली. ते म्हणाले: “छान गातोस बाळ.” त्यावेळी मला काही वाटले नाही. मी प्रेक्षकांत परत येऊन बसलो. त्यानंतर तेच गृहस्थ गायला येऊन बसले. तेव्हा कळले, त्यांचे नाव “वसंतराव देशपांडे” म्हणून. त्यांनी नंतर “मी, बरं का, आता आपल्याला मराठी नाट्यसंगीताची वाटचाल कशी झाली हे सांगणार आहे”, असं सांगून, एक-दोन तासांचा वेळ आम्हाला दिला. पण लोकांचा एकंदरीत रोख बघता, “बरं, आता आंपण असं करूं, अर्धा तास आरांम करूं, नंतर पुन्हां करूं सुरूं” असं म्हणून सकाळी चार वाजेपर्यंत गाणं म्हटलं. माझ्या आनंदवनातल्या निवासामुळेच मला असे सुंदर अनुभव मिळाले आहेत.
आणखी बरेच प्रसंग सांगावेसे वाटतात, पण किती वेळ लिहीणार ? मला एक मुख्य सांगावेसे वाटते ते, की मला वाटत असूनही जीवनकार्ये करण्याच्या वेळेत मी पुरेसा वेळ आनंदवनाला देऊ शकलो नाही. मला सोमनाथ, भामरागडला प्रकाश आमटेच्या कार्यात सहकार्य द्यायचे आहे, तेही अजून झाले नाही. पण कधीतरी होईल या आशेत मी आहे. बाबा डिसेंबरात ९२ वर्षांचे होत आहेत. त्यांना त्यांच्याच कवितेत मी आदरांजली अर्पित करतो:
शृंखला पायी असू दे,
मी गतीचे गीत गाई
दु:ख उधळायास आता
आसवांना वेळ नाही
बाबा, ९२वा वाढदिवस तुम्हाला पीडितांची दु:खे निवारण्यास अधिक उद्युक्त करो.
June 22nd, 2006 at 6:52 am
मिलींद,
नितांत सुंदर लेख ! बाबा आमटेंच्या आनंदवनात घालवलेल्या आपल्या आठवणी खुप परिणामकारकरित्या लिहिल्या आहेत !
June 23rd, 2006 at 8:23 am
हा तर फारच छान लेख आहे.
June 23rd, 2006 at 4:11 pm
anadvanachy junya bhetichya sagalya athavni datun alya. Sundar lekh kihila ahe.
June 27th, 2006 at 1:29 am
वाव मिलिंद, तुम्ही वरोऱ्याचे आहात? म्हणजे अगदी आमच्या जवळचेच की! मी नागपूरला शिकतो, माझं गाव बुलडाणा जिल्ह्यात आहे-म्हणजे आपण दोघही वैदर्भिय ! मी वरोऱ्याला आनंदवनमध्ये आलो होतो एकदा एक दीड वर्षाअगोदर. संपर्कात राहा!
June 29th, 2006 at 12:54 am
Priy Milind,
“Anandvanateel Diwas” ha tuza lekh wachla. Khupach awadla.
Kharokharach “aadarsh” ashya lokancha tula itka sahawas milala
hey tuze bhagyach mhanayla pahije.
Tuzya tethil wastawyateel itar aathwanihi aamhala sang ashee mi tula vinanti karato.
Anandvan ani Prakash Amte yanchya barobar kaam karanyachi tuzi ichha lawkarat lawkar purna howo hi shubhechha.
kalawe,
lobh asawa,
Shailesh
September 9th, 2006 at 10:16 pm
तुमची अनुदिनी वाचून आनंद झाला. खास करून आनंदवनाचा लेख आणि मराठी संकेतस्थळांचा टविस बद्दलचा लेख आवडला.
नीलकांत.
August 2nd, 2007 at 11:54 am
Dear Milind,
I am reading this article rather late. But you have summed up all those days very precisely. I become very nostalgic thinking about days back in Warora. You made me take a trip back in memory lane.
Thank You !!
Salil
October 11th, 2007 at 11:15 pm
Thanks you milind sir,
Really thankful for your brief about BABA AAMTE.
waiting to listen something more.
Regads,
Prafull Shinde
December 22nd, 2007 at 3:36 am
मिसळ पाव च्या निमित्ताने हे वाचायला मिळाले. राहून गेल होत वाचायच. आनंदवनाचा सहवास तो ही संवेदनाक्षम वयातला हा नक्कीच व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा आहे.