आजची खमंग पाककृती: व्यक्तिचित्रे

आमची प्रेरणास्थाने:

वैविध्यपूर्ण लिहा : आणीबाणीचा शासनकर्ता
भाजणीचे पीठ हे विविध डाळींचे एकत्र दळलेले दळण असते : कमलाबाई ओगले

बरं का मंडळी, आज आम्ही आपल्याला खमंग व्यक्तिचित्रे कशी बनवावीत ते सांगणार आहोत. (आज फक्त पाककृती देतो, हिचे प्रात्यक्षिक पुढल्या एखाद्या लेखात येईलच;-)

व्यक्तिचित्रे ही प्रतिसादांचे बाहुल्य वाढवण्याची सर्वात सोपी पाककृती. येथील सदस्य क्रमांक ८०० च्या खालच्या सर्वांना व्यक्तिचित्रलेखनातली ही गोम कळलेली आहेच. नव्हे, ज्यांना समजलेली आहे, त्यांनी आपल्या मोलकरणी, मावशा, आत्या, प्राध्यापक, विद्यार्थिनी, ह्या सर्वांची व्यक्तिचित्रे लिहून आपापली खर्जनशीलता दाखवलेली आहेच. आता उरले सदस्य क्रमांक ८०० च्या पुढचे (अडाणी) सदस्य. त्यांना सदर वैविध्य आपल्या लेखनात दाखवता यावे, ह्यासाठी हा लेखनप्रपंच.

तर, खमंग व्यक्तिचित्राची पाककृती अशी:

१. (पहिल्यांदा) एक व्यक्ती निवडावी. हे लिहायला सोपे जाते, पण व्यक्तिचित्राची खमंगता ५०% ह्या व्यक्तीच्या निवडीवरच अवलंबून असते. ही व्यक्ती तुमच्या-आमच्यासारखी सामान्य (किंवा क्षुद्र) नसावी. म्हणजे, ह्या व्यक्तीत काही गुण असावेत, जे हल्ली दिसत नाहीत, ते. आता समजा, तुम्हा-आम्हापैकी कुणाची निवड आपण केली, तर ह्या युगात जगणारे, म्हणजे सामान्यच, म्हणून ह्या व्यक्तीचित्राला फारसा प्रतिसाद लाभणार नाही. तुमची एखादी जुनी आत्या आहे का ? बालपणीचा काळ सुखाचा सारख्या भाजणीत तिचा एखादी डाळ म्हणून समावेश होऊ शकेल का ? नाही ? ते सोडा. तुम्ही एखाद्या चाळीत राहात होतात का ? असल्यास तिथे ह्या आत्या-मावश्यांसारखे स्पेसिमेन्स बरेच सापडतात. असे कुणी तुम्हाला माहिती आहे का ? लहानपणी जरी त्यांचा वाईट्ट राग येत असला, तरी ह्या वयात नक्कीच त्यांच्या काही तरी गुणांवर तुम्ही नक्कीच लिहू शकाल! आजकालच्या तरुण-तरुणींनी ह्या आत्या मावशा पाहिलेल्या नाहीत, हे छातीठोकपणे सांगतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली ह्या चित्रातून, तरी पुरेसे आहे. (आणि आईची आठवण म्हणजे, काय सांगू महाराजा ? प्रत्येकाकडून एक तरी प्रतिसाद नक्की! तुमचा लौकिक संवेदनशील लेखक म्हणून, किंवा पुलंनतर तुम्हीच म्हणून होणार ! जियो !)

पण तुम्ही चाळीत राहात नव्हता, कुठल्याही आत्या-मावशांशी परिचय नाही ? नो प्रॉब्लेम ! तुम्ही स्वत:ला कुठल्या कलांचे रसिक समजता ? संगीत ? मग कोपऱ्यावरचा कल्हईवाला आपल्या भसाढ्या आवाजात गातोय ना ? अहो, तोच तुमचा व्यक्तिचित्राचा क्याण्डिडेट ! (मात्र, त्याचे व्यक्तिचित्र लिहिताना, त्याला शापित यक्ष, गंधर्व, किंवा अप्सरा म्हणायला विसरू नका.) तुम्हाला चित्रांमध्ये गती आहे का ? नाही, गती असणे आवश्यक नाही. मधुबालाचे चित्र क्रेयॉन ने ट्रेस केले आहे ना तुम्ही ? मग आहेच की तुम्हाला गती ! आता, पहिले एक काम करा. इतर लोक जेव्हा त्यांची चित्रे प्रकाशित करतात, तेव्हा “भिवया जमल्या नाही”, “नाक थोडे तेढे आले आहे” असे प्रतिसाद देत चला. म्हणजे, तुम्हाला चित्रकलेत गती आहे, अशी लोकांची समजूत होईल, आणि मग तुम्ही बाजूच्या फुटपाथवर रांगोळीने चित्र काढणाऱ्या युसुफचे व्यक्तिचित्र चितारण्यास मोकळे !

तुम्हाला हेही जमत नाही ? अरेरे ! मग सर्वात सोपा उपाय ! तुम्ही शाळेत शिकला असालच ! तिथले छड्या मारणारे शिक्षक आताही आठवत असतीलच ! मग कामच संपले. त्यांच्या छड्यांची आठवण “आमचे साने गुरुजी” ह्या नावाने लिहा. सगळ्यांना जाणीव होईल त्यांच्या हरवलेल्या बालपणाची. बालपणीचा काळ, जसा तुमचा छड्या खाऊन सुखाचा गेला, तसाच आज आमच्या मुलांचा का जात नाही, असे अनेक प्रतिसाद येतील. तुमचे व्यक्तिचित्रक म्हणून काम संपले.

असो, तर सांगायचे एवढेच, की पुढे व्यक्तिचित्रणासाठी मदत होईल म्हणून, आजच आपल्या आत्या मावश्या, कोपऱ्यावरचे कल्हईवाले, रांगोळीचे चित्रकार, आणि जुने शिक्षक, ह्यांच्यावर लक्ष ठेवून असा. वेळ काय सांगून येते ?

२. (आपल्याच ग्यासवर) आपल्या व्यक्तिमत्वाशी त्या व्यक्तीची जुळवाजुळव करावी. हे महत्वाचे. कारण मी लिहितो मुक्तके, आणि आत्या करते ओव्या. तिचे नि माझे कसे जमणार ? मी जर अभिजात, तर तीही अभिजातच असायला हवी. मी जर चित्रकार, तर तिनेही किमान रांगोळी तरी काढलेली असायला हवी. मी जर मटण खातो, तर तिलाही मटणाची गोडी लावायला हवी. नाहीतर मग मटण खाताना छायाचित्रे कशी देणार?

३. (चिमूटभर) भाईकाका. हा एकच शब्द लक्षात ठेवा. ह्यांचे पाळण्यातले नाव पुलदेशपांडे. पण हल्ली, हे भाईकाका ह्या नावाने ओळखले जातात. नव्हे, “पुलं” म्हटले की म्हणणारा भोटम ठरतो. त्याचे काय आहे, ह्या लेखकाने अनेक व्यक्तिचित्रे लिहिली असे बऱ्याच लोकांना माहिती आहे. त्यामुळे, हा शब्द आला, की भलेभले नरम होतात. विशेषत:, एकदा तुमच्यामागे “भाईकाकांची शैली” असे कुणी लचांड लावले, की तुम्ही वरच्या पातळीवर पोहोचलात, असे समजा. हे सोपे नाही बरे का मंडळी. ह्यासाठी अनेक वर्षांची तपस्या लागते. काही डॉ. वगैरे लोकांचे प्रतिसाद आवश्यक असतात. परंतु, एकदा हे झाले, की मग मात्र तुम्हाला मरण नाही. हे एकदा झाले, की दुनिया फाट्यावर मारायला तुम्ही मोकळे.

४. (चवीप्रमाणे) छायाचित्रे. व्यक्तिचित्र लिहायचे म्हटले, की मग त्याला “जेन्युईन” बनवण्यासाठी आवश्यक अशी छायाचित्रे आपल्याला मिळवून ठेवणे आवश्यक आहे. हल्ली ही नवीन पीढी छायाचित्रांशिवाय कुठल्याही व्यक्तीचित्रावर विश्वास ठेवण्यास नकार देते. अगदी कुणाच्याही पाठीवर साबण चोळले, तरी ती उघडी पाठ छायाचित्रात दाखवली नाही, तर हे तरुण आजकाल विश्वासच ठेवत नाहीत. हल्लीच्या पीढीला विश्वास ही गोष्ट कशाशी खातात ते माहिती नाही. (असो, त्याविषयी नंतर कधी तरी.)

५. (भरघोस) नर्म विनोद. आपण व्यक्तिचित्रणात जे काही अगम्य अगोचर लिहिलेले आहे, त्यावरचा अविश्वास नाहिसा करणे, ह्यासाठी अधून मधून नर्म विनोद करणे आवश्यक आहे. अन्यथा, हे सर्व सत्यच आहे, आणि गीतेवर एक हात ठेवून आपण दुसऱ्या हातावे टंकन करीत आहोत, असे वाटेल. त्यामुळ अधेमधे नर्म विनोद आलेत, की नव्या लोकांना वाटते, की आपण विनोदी लिहितो आहे, आणि जुन्या लोकांना वाटते की ही भाईकाकांची शैली. दोन्हीकडून टाळ्या पडतात. हे खरे, की खोटे, ते बिंग आपण बिंगच ठेवावे, फोडू नये.

६. (थोडी) गुप्तता. जरी आपण एखाद्या व्यक्तीचे चित्रण करत असलो, तरी त्या व्यक्तीविषयी सर्वच काही उघड करू नये. नाही तर, ही व्यक्ती आपल्यासारखीच सामान्य आहे, असे इतर सामान्य वाचकांना वाटते. आणि मग त्या व्यक्तिचित्रणाचा काय उपयोग ? श्री. भीमराव मेश्राम, ही व्यक्ती दिवसा दगड फोडते, म्हणून त्या व्यक्तीच्या कपाळावरील घर्मबिंदू कळफलकबडव्यांना आवडतात. संध्याकाळी घरी गेल्यावर इंटरनेटवरून बिपाशाची चित्रे बघताना, ह्याच व्यक्तीच्या चेहऱ्यावर येणाऱ्या घर्मबिंदूंविषयी कुणाला सहानुभूती वाटणार ?

७. (उकळताना) आपली एकाग्रता. आपण उगाच कधी कविता, कधी गझला. कधी वैचारिक लेख. कधी तंत्रज्ञानाविषयी. असे लेखन केले, तर व्यक्तिचित्रलेखक म्हणून आपली ख्याती विरणार. व्यक्तिचित्रांव्यतिरीक्त फारतर एखादा दुसरा विषय आपण हाताळायला हवा. दुसरे काहीही नाही. विशेषत: आपण ज्या विभागातली व्यक्तिचित्रे जास्त करून लिहितो, तोच विभाग आपण सांभाळायला हवा. इतर विभागात लेखन करण्यास आपण इतर लेखकांना उद्युक्त करायला हवे. स्वत: मात्र इतर ठिकाणी चोच देखील मारू नये. कारण असे केल्यास आपली प्रतिमा, ही “वैविध्यपूर्ण लेखक” अशी होते. ही भूमिका आपल्या व्यक्तिचित्रकाराला मारक आहे, हे लक्षात ठेवावे. जगात वैविध्यपूर्ण लेखक बरेच आहेत, त्यांना आपण “एक ना धड भाराभार चिंध्या” असे दूषण देऊ शकतो, पण आपली व्यक्तिचित्रकार अशी प्रतिमा ढासळल्यास आपल्या मदतीला हे वैविध्यपूर्ण येड*वे येणार आहेत थोडेच ?

2 Responses to “आजची खमंग पाककृती: व्यक्तिचित्रे”

  1. सृष्टीलावण्या Says:

    व्यक्तिचित्रकार अशी प्रतिमा ढासळल्यास आपल्या मदतीला हे वैविध्यपूर्ण येड*वे येणार आहेत थोडेच ?

    मानलं बुवा तुम्हाला. मस्त ठोकलंय तुम्ही. अर्थात लाजच सोडलेल्यांना त्याचे काय म्हणा…

  2. Ajay Gallewale Says:

    झकास ! अगदी “भाईकाकांची” आठवण होते हो ! :) आणि तुम्ही स्वतःच विद्यावाचस्पती असल्यावर आणखी वेगळा डॉ. कशाला?
    >इतर लोक जेव्हा त्यांची चित्रे प्रकाशित करतात, तेव्हा “भिवया जमल्या नाही”, “नाक थोडे तेढे आले आहे” असे प्रतिसाद देत चला. म्हणजे, तुम्हाला चित्रकलेत गती आहे, अशी लोकांची समजूत होईल.
    हा तुमचा सल्ला वापरून आता ब्लॉगवर प्रतिक्रिया देऊ लागलोय. लेखनाबद्दल काहीतरी मला गम्य आहे अशी समजूत व्हावी म्हणून.

    (इतक्या उशीरा हे वाचण्यात आलंय म्हणून वाईट वाटतंय. पण वाचल्यावर एकदम वा ! निघून गेलं आणि सांगितल्याशिवाय राहवलं नाही )

Leave a Reply