माझ्या साहित्यिक मैत्रांनो (आमच्या आगामी अध्यक्षीय भाषणातून साभार)
(अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे बे एरियात होणार ही बातमी मिळाल्यापासून आम्ही सदर संमेलनाच्या घडामोडींवर नजर ठेवून आहोत. मधु मंगेश कर्णिक आणि विंदा करंदीकर ह्यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांनी सदर संमेलनाला दाखवलेला विरोध आम्हाला अधिकच सुखकर वाटला, कारण त्यामुळे ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची आमची लहानपणापासूनची महत्वाकांक्षा आता पूर्ण होणार, हे नक्की. आमच्या ह्या महत्वाकांक्षेला आजवर एकमेव आव्हान होते, ते येथील, म्हणजे बे एरियातील स्वघोषित साहित्यिकांचे. पण “कला” ह्या मराठी साहित्यप्रेमीच्या जगातील एकमेव संस्थेने सदर साहित्य संमेलनाला दर्शवलेला विरोध लक्षात घेता, आमचा अध्यक्षपदाचा मार्ग खुला झाला, आणि आम्ही भाषण लिहायला घेतले. त्यातील काही अंश आगाऊपणे - म्हणजे ऍडव्हान्स ह्या अर्थाने - आम्ही येथे मांडतो आहोत.)
मैत्रहो,
बे एरियातील वादग्रस्त ठरलेल्या ह्या साहित्य संमेलनात आपले स्वागत आहे. आणि का नसावे ? संमेलनापूर्वीच्या चर्चांतून असे वाटले होते, की एकूण फक्त १५३ साहित्य प्रेमी ह्या संमेलनाला हजेरी लावतील. पण दोन साहित्यप्रेमींनी आपापल्या बायकांना पण सोबत आणले आहे, त्यामुळे १५५ रसिकांची उपस्थिती लाभून ह्या साहित्यसंमेलनाला घवीघवीत यशच प्राप्त झाले आहे. लॉस एन्जेलिस आणि सॅन डियेगो भागातून फक्त ८ जण येतील असे वाटले होते. पण नंदन आणि डांबीसकाका ह्यांनी नंदिनी आणि डांबिसकाकूंना (अनुक्रमे, उगाच घोळ नको) येथे आणले त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करू या, असा ठराव मी मंाडतो.
(ठाले पाटील अवतरेंच्या कानात: फुडच्या वर्षी ड्यांबीसला अद्यक्ष करनार, म्हनून तू म्येल पाटवली, त्ये येक ब्येस केलं.)
मैत्रहो, आपल्या लक्षात आलेच असेल, की मी आपल्याला मैत्र म्हणून संबोधतो आहे. नेहमीप्रमाणे “मित्र-मैत्रिणींनो” असे नाही. ह्याचे मूळ कारण की आपण बे एरियात आला आहात. इथे मित्र आणि मैत्रिणी हा भेदभाव आम्ही करत नाही. संत फ्रान्सेश्वराच्या ह्या नगरीत ह्या क्षुल्लक लिंगभेदाला स्थान नाही. बाया-बायांची आणि बाप्या-बाप्यांची यथासांग लग्ने लावून देण्यात ही नगरी प्रसिद्ध आहे. इथे आजकाल लग्नाच्या सरकारी अर्जावर नवरा आणि बायको अशी नोंद नसते, तर अशील क्र. १ आणि अशील क्र. २, असे लिहून जागा सोडलेली असते. (स्वत:चे शील न सांभाळणारे, ते अशील ही कोटी आपल्यातले काही गंभीर असे विनोदी साहित्यिक करतीलच. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही दुसरे काय ?)
मैत्रहो, आपले साहित्यक्षेत्र ही नवीन सामाजिक परंपरा कधी आणि कशी जवळ करणार, हा आम्हाला सध्या छळणारा मुख्य प्रश्न आहे. आजवर आपल्या मराठी ह्या प्रगल्भ भाषेत समलिंगी संबंधांना स्वीकारणारे एकही लिखाण झालेले नाही. दिवसाला एक, ह्या दराने प्रेमकविता पाडणाऱ्या आपला कविवर्ग (विशेषत: कवयित्रीवर्ग, ह्यांना अशा कविता पाडायला बराच वेळ मिळतो) ह्या दुसऱ्या नाजुक नात्याविषयी काहीच कसे लिहीत नाही ? मैत्रहो, आज ह्या वाटमोड्या (पाथब्रेकिंगला कुणी मराठी शब्द सुचवा हो) साहित्यसंमेलनात आपण प्रतिज्ञा करूया, की आजपासून आपले कुठलेही मराठी साहित्य लिंगभेद करणार नाही. जुने जाऊ द्या तिकडे (जिकडे सगळे जुने जाते, तिकडे.. त्या प्राण्याच्या पार्श्वभागातील त्या विशिष्ट अवयवाचा जाहीर उल्लेख करणे फक्त विद्रोही साहित्य संमेलनातच शक्य आहे.) आजपासून आपण माझ्या लिंगसमतेच्या चळवळीला हातभार लावावा, ही माझी आपणा सर्वांना विनंती आहे.
ह्यासाठी जुन्या साहित्याचे संशोधन करणे आवश्यक आहे. आता तांब्यांचीच कविता घेऊ या, आणि तिला लिंगसमतेच्या चळवळीत आणू या. म्हणा तर माझ्या मागून.
व्यक्ति व्यक्तिची सलज्ज कुजबुज
झाडाझुडपांचे हेच मधुर गुज…
(”वृक्षलता” हे भिन्नलिंगत्वाचा पुरस्कार करणारे असल्याने मुद्दाम बदललेले आहे. साहित्यिकांनी लिंगसमतेवर छुपेपणे केलेल्या अशा प्रहारांविषयी जागृत असावे.)
भटांच्या गझलांना लिंगसम करणे खूप सोपे आहे.
तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे
हे पुरुषाने म्हटले, की झाले. किंवा
पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची मिठी सैल झाली..
हेदेखील ह्या थोर नगरीतील एखाद्या पुरुषाने गायले, तरी पर्फेक्ट!
(विशेषत: ह्यातील “रेशमाची” हा उल्लेख आमच्या बे एरियातील निसर्गोत्पादित वस्तूंविषयीचे प्रेम व्यक्त करणारा आहे, त्यामुळे आमचे त्याला अनुमोदन आहे. पुढचा मुद्दा बघा.)
मैत्रहो, आमच्या बे एरियातील संवेदनशील मनामनाला भिडणारा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कृत्रिम वस्तूंविषयी असणारा द्वेष. येथे कुणी झाडे तोडणार, असे म्हटले, की आम्ही त्या झाडांवरच ठाण मांडून बसतो. “कला”च्या पत्रकामुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या बर्कली ह्या विद्यापीठात आम्ही असेच केलेले आहे. तेथील क्रीडावास्तूसाठी १०-१५ झाडे तोडणार असे ऐकल्याबरोबर आम्ही संवेदनशील मंडळी त्या झाडांनाच आमचे घर केले. निसर्गाशी सान्निध्य साधून वैश्विक तापवृद्धी टाळण्याचा ध्यास घेतलेले श्री. ऍलराव गोरे पाटील हे आडनावाने मराठी आहेत, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
आज आपण दुसरी एक प्रतिज्ञा करू या, की आपले सर्व लिखाण हे निसर्गाशी एकात्मता साधणारे हवे. आपण आजवर आपल्या लेखनातून नैसर्गिक एकात्मतेला फाटाच दिलेला आहे. नायिकेने घातलेला शिफॉनच्या सूटचे वर्णन करताना, त्यात नैसर्गिक कापसाचे प्रमाण किती आणि प्रयोगशाळेत घडवलेल्या रसायनांचे प्रमाण किती, हे आपण लिहायचे टाळतो. अगदी हेच बघा ना, एकेकाळी साहित्यिक म्हणून गणले जाणारे पुलंदेशपांडे ह्यांनी देखील (सुनीताबाईंचा धाक, आणि बाबा आमट्यांशी ओळख असूनही) कधीही ही नैसर्गिक एकात्मता त्यांच्या लिखाणात दाखवलेली नाही. मी फक्त एक उदाहरण देतो. त्यांनी स्वत: खाल्लेल्या विविध पदार्थांचे वर्णन करून (इतर लोकंाना जळवावे ह्या दृष्टिकोनातून) “माझे खाद्यजीवन” असा लेख िलहिला होता. पण त्यांनी खाल्लेल्या पदार्थांत नैसर्गिक घटक (ऑर्गॅनिक) किती, मेदजनक, कर्बजनक घटक किती, ह्याचा उल्लेख न करणे ही अक्षम्य हेळसांड केली. मैत्रहो, बे एरियातील ह्या नवीन युगात आपल्याला हे करून चालणार नाही. अगदी कुणा साहित्यिक मित्राकडे (तो पुणेरी नसल्यास) “चहा घेतला”, असे लिहिले, तरी लगेच त्यात दूध किती (२% मेद, की १%, ऑर्गॅनिक की नाही) साखर आणि कर्बघटक किती, हे लिहिणे आवश्यक ठरते.
मंडळी, मागे उल्लेख केल्याप्रमाणे ऍल गोरे पाटील हे आमच्या बे एरियाचे वाग्दत्त जावईच आहेत. त्यांनी आम्हाला दिलेली दुसरी शिकवण म्हणजे पेट्रोल वाचवणे. शक्य असल्यास पेट्रोलचा वापरच न करणे. मैत्रहो, आपल्या आदरणीय ज्येष्ठ मराठी साहित्यिकांनी वारंवार स्कूटर ह्या वाहनाचा उल्लेख आपल्या साहित्यात केलेला आहे. (कारचा उल्लेख मराठी साहित्यात केला की ते अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण ठरते.) सदर वाहन पेट्रोल पिते, ह्यामुळे भविष्यातील साहित्यात (म्हणजे आमच्या बे एरियातील तीन साहित्य रसिकांनी आपले साहित्य वाचावे असा आपला आग्रह असेल, तर) अशा पेट्रोल पिणाऱ्या वाहनांचा उल्लेख टाळावा. आपल्या नायक-नायिकांना (किंवा नायक-नायकांना, किंवा नायिका-नायिकांना) चालत किंवा दुचाकी सायकलवर प्रणयक्रीडा करण्यास पाठवावे. ह्या पात्रांतील कुणीही एक जर धूम्रपान करीत असेल, तर दुसऱ्या पात्राने ते हाणून पाडावे. ह्यातील कुणी जर कर्बवायू सोडत असेल (कदाचित दोघेही) तर त्यांना दिवसा झाडाखाली बसवावे, आणि रात्री मरणपंथी धाडावे (रात्री मानवजात प्राणवायू भक्षण करते, आणि त्यामुळे झाडांना पुरेसा प्राणवायू मिळत नाही, ह्या समस्येवर ऍल गोरे पाटील ह्यांनी सुचवलेला हा उपाय आम्ही आपणास सुचवीत आहोत.)
पुढच्या रांगेत बसलेल्या सर्व साहित्यिकांच्या चेहऱ्यावरची नाराजी येथे आम्हाला स्पष्ट दिसते आहे. मुळात पुस्तके छापली जातात, तीच झाडांची पृष्ठे करून, हे मतही मला येथे त्यंाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते आहे. परंतु माझ्या प्रिय साहित्यिकांनो, सारखी सारखी पुस्तके प्रकाशित करून तुम्ही झाडांची ही दुर्दशा करताहात, ती पापे किती दिवस स्वत: झेलणार ? काही प्रकाशकंावरही सोपवा की ! तुमची पुस्तके छापून छापून स्वत:च्या अर्थप्राप्तीसाठी अनेक झाडांची दुर्दशा करणारे हे प्रकाशक आज बे एरियातील साहित्यसंमेलनात, तिकीटाचे पैसे नसल्यामुळे हजर राहू शकलेले नाहीत. (तुम्हाला द्यावयाची रॉयल्टी इतके दिवस बुडवूनही त्यांच्याकडे अद्याप अमेरिकेच्या तिकिटासाठी पैसाही जमलेला नाही. पण हे प्रकरण तुम्ही आणि प्रकाशक एकमेकात निपटवा.) निसर्गाची अवकृपा त्यांच्यावर झाली आहे, हे त्याचे मूळ कारण.
येथे जमलेल्या १४८ साहित्यप्रेमी आणि ७ साहिित्यकांना आम्ही विनंती करतो, की मराठी साहित्याचा वटवृक्ष जर बे एरियातील मातीत रुजवायचा असेल, तर बे एरियातील मूळ तत्वांशी मराठी साहित्याची सांगड घालणे आवश्यक आहे. नुस्ते महाराष्ट्र मंडळाने साहित्याची गोडी बे एरियात रुजवायला हवी, अशा किती दिवस बोंबा मारणार ?
आज आपल्याला प्रोत्साहन आणि दिशादर्शन म्हणून आम्ही आमचे तरुणपणीचे आवडते लेखक श्री. ना. सी. फडके, ह्यांचा एक उतारा लिंगसमभाव-निसर्गेकरूपता-वैश्विक-तापवृद्धीविरोध ह्या बे एरियातील तीन तत्वांशी समरूप करून आपला निरोप घेतो.
“सुहास आणि किरण निसर्गविज्ञानाच्या महाविद्यालयातील प्रांगणात बसले होते. सुहासची सायकल जवळच्याच झाडाला टेकून ठेवली होती. त्या झाडाला सायकलची सीट (वाळलेल्या मक्याच्या पानांपासून बनवलेली) टोचू नये म्हणून सुहास काळजीत होतं. (कुठल्याही क्रियापद अथवा नामातून लिंग प्रकट व्हायला नको, बरं का साहित्यिकांनो?) किरण आज महाविद्यालयातील सर्व भाषणं ऐकून कंटाळलं होतं. ते सुहासला म्हणालं, “आज मला कुठेतरी छान सायकलने फिरायला जावंसं वाटतं. सुहासला दोन महिन्यापूर्वी घरातलं सर्व शिळं अन्न टाकून तेनं केलेलं काम्पोष्ट किती सडलं आहे, ते बघायला जायचंच होतं. ते किरणला म्हणालं, चल माझं काम्पोष्ट बघायला जायचं का ? किरणला तेच्या सर्व अंगावर टिंगल व्हायला लागलं. (हे इंग्रजीतलं टिंगल बरं का ? मराठीतलं नाही. हा खास बे एरियातील मराठी तरुण-तरुणींसाठी आपुलकीचा टच.) आपल्या प्रियासीकराचं (प्रियकर की प्रेयसी हे किती खुबीने टळलं आहे बघा. अशा नवीन शब्दांची आज मराठीला गरज आहे. अधिक माहितीसाठी गूगलवर शब्दभांडारचा शोध घ्या) काम्पोष्ट बघायला कुणाला आवडणार नाही? सुहास लगच किरणला तेच्या सायकलवर डबलशीट बसवून काम्पोष्टवर गेला. तिथला दुर्गंध किरणला अधिक टिंगल करू लागला. सुहासचाच हा गंध, असं किरणला वाटलं. किरणने सुहासकडे सहेतुक पाहिलं. सुहासने किरणकडे. किरण स्वत: काम्पोष्ट का नाही करत? सुहासचं मन थरारलं. किरणच्या टीशर्टावर हळू हळू सहेतुक हात फिरवत सुहासनं शेवटी तो प्रश्न टाकलाच. “छे, काहीतरीच तुझं, सुहास! काम्पोष्टात टाकायला शिळं अन्नंच नाही माझ्याकडे. होल फूड्स मधून एकदा अन्न आणलं की ते आठवडाभर पुरतं. कालंच सगळ्या ऑर्गॅनिक बटाट्यांत ओर्गॅनिक सैंधव मीठ टाकून जेवलंय मी. अजूनही त्या पादे-मिठाचा वास माझ्या टीशर्टला आहे.” सुहासला किरणविषयी धन्य वाटलं. दोघांची नजरानजर झाली. सुहासचे पुढे आलेले वाळलेले ओठ किरणला हवेहवेसे वाटले (कारण ते पूर्ण वाळलेले होते, उगाच इतरांसारखे रसायने लावून ओले केलेले नव्हते.) आणि दोघेही निघाले सॅन फ्रॅन्सिस्कोला. आज तिथला रजिस्ट्रार लग्ने लावायला ओव्हरटाईम करणार होता.”
July 7th, 2008 at 9:15 pm
हा हा. चालू द्या.
July 7th, 2008 at 9:56 pm
व्वा, भांडारकर! आपलं भाषण वाचुन फारच मजा “आलं” (लिंगभेद टाळल्याची नॊंद घ्यावी.)
अशीच साहित्याची सेवा चालु असु द्या!