शोधयंत्राचा शोध - भाग १०: प््रभावळी
आपण एखादी नवीन कंपनी काढावी हे कुणाला का वाटते? ह्याचे उत्तर आपल्याला आजवर स्थापन झालेल्या संस्थांतून सापडते. आपण काही उदाहरणांतून ह्याचा आढावा घेऊ.
पहिले उदाहरण देतो ते अॅपलचे. स्टीव्ह जॉब्ज तेव्हा कुठल्यातरी महाविद्यालयात विद्यार्थी होता. त्याचा वयाने मोठा मित्र स्टीव्ह वोझ्नियाक हा ह्यूलेट-पॅकार्ड (एच-पी) ह्या कंपनीत कॅल्क्यूलेटर बनवायचा. मोटरोलाने जेव्हा त्यांचा पहिला सूक्ष्मप्रक्रियक बाजारात आणला, तेव्हा वॉझ (वोझ्नियाक चे टोपणनाव) त्यामुळे पेटलाच. आपल्याला स्वत:ला त्यातून कॅलक्यूलेटरच्या पेक्षाही काहीतरी चांगले स्वत:चे करता येऊ शकेल, असे यंत्र ह्या सूक्ष्मप्रक्रियकातून बनवता येईल, असे त्याला वाटले. त्याने त्याच्या मित्राला (जॉब्जला) ते सांगितले. जॉब्जकडे त्याच्या आईने त्याला घेऊन दिलेली एक फोक्सवॅगन होती. ती त्याने विकली. त्यातून जे दहा हजार डॉलर्स मिळाले, त्यातून उपकरणे खरेदी करून आईच्याच घरातल्या गराजमध्ये अॅपलची स्थापना झाली. हे दोघे मित्र तेथे जमून मोटरोलाच्या सूक्ष्मप्रक्रियकावर आधारित स्वीय संगणक बनवायला लागले.
दुसरे उदाहरण आपण बघूया ते मायक्रोसॉफ्टचे. विलियम हेन्री गेट्स (तिसरा), हा बोस्टनजवळच्या हार्वर्ड विद्यापीठातला दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी. अमेरिकेच्या पश्चिमी किनाऱ्यावर, सीअॅटल नावाच्या शहरातला हा विद्यार्थी पूर्वेला पहिल्यांदाच दीर्घकाळासाठी रहायला गला. त्याचा मित्र पॉल अॅलन हा मात्र अजूनही सिअॅटललाच होता. पॉप्युलर मेकॅनिक्स ह्या मासिकात त्यांनी एका सूक्ष्मसंगणकाची जाहिरात वाचली. आणि संगणकसृष्टीचे हे भविष्य आहे, हे त्यांना कळले. ह्याचा खूप उपयोग पुढे होऊ शकेल, हे मनात आले. आणि त्यावर ज्या आज्ञावली वापरण्यात येतील त्या स्वत: तयार करण्याऐवजी कदाचित लोक तयार आज्ञावली विकत घेतील असे वाटले. आपण ह्या आज्ञावली विकू शकतो, हा विचार मनात ह्या दोघांच्या मनात आल्याने मायक्रोसॉफ्ट निर्माण झाली.
अशी अनेक उदाहरणे आहेत. पुढच्या काळात, मोठ्या कंपन्यात वर्षोनवर्षे काम करणारे एखाददोघे सहकारी, मित्र त्याचत्या कामांमुळे कंटाळतात. त्यांना नवनवीन कल्पना येतच असतात. पण त्या कल्पनांची दखल ही मोठी कंपनी घेत नाही. पण ह्या कल्पना भविष्यात खूप महत्वाच्या ठरतील, म्हणून हे दोघे बाहेर पडतात. आजवर आपण साचवलेल्या धनाचा उपयोग करून ती कल्पना साकार करण्यासाठी मनोभावे प्रयत्न करतात. पण यापुढे काय होते, ते मात्र अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीचे वैशिष्ट्य म्हणायला हवे. कारण इतर ठिकाणी हा उपक्रम व्यर्थ जाईल. दोन तरुण मुले, त्यांना काय कळणार व्यवसायातलं? असा विचार करून जग त्यांना खच्ची करेल. पण वयाकडे लक्ष न देता, उपक्रमाकडे जास्त लक्ष देणं हे अमेरिकेच्या पश्चिमी किनाऱ्यावरच्या ह्या छोट्याशा भागाचं मुख्य लक्षण म्हणावं लागेल.
दरवेळी कुठल्या मोठ्या व्यावसायिक संस्थेतूनच असे लोक बाहेर पडायला हवेत असे नाही. बरेचदा, शैक्षणिक संस्थांतूनदेखील ‘आपण इतरांना शिकवत असताना, आपल्याला ही कल्पना सुचलीय, त्यातून जग बदलता येतेय का हे बघावे’ म्हणून बाहेर पडलेले प्राध्यापक आणि त्यांचे विद्यार्थीदेखील अमेरिकेत अशा प्रभावळी (स्टार्ट-अप कंपन्या) स्थापन करताना आपल्याला दिसतात. इंकटूमी, ही त्याच विचारातून स्थापन झालेली संस्था. पण ह्या संस्थेतून काहीही पैसे मिळत नसताना, ही संस्था चालवायची म्हणजे संस्थापकांकडे भक्कम रक्कम जमा असायला हवी, नाही का?
असा विचार मनात येणे साहजीकच आहे. कारण सिलिकॉन व्हॅलीचे गणित आपल्याला पुरते कळलेले नाही. सिलिकॉन व्हॅलीतल्या एका छोट्या संस्थेशी माझा तिच्या जन्मापासून संबंध आलाय. तिचा संस्थापक माझा जीवश्चकंठश्च मित्रच म्हणा ना. त्या अनुभवावरून आणि आजवर येथील कंपन्यांबद्दल वाचलेल्या बातम्यांवरून यशस्वी कंपन्यांबद्दल थोडे लिहू इच्छितो.
तंत्रज्ञानावर आधारित कंपनी कशी सुरू होते? बहुतेक वेळा, मोठ्या कंपन्यात उच्च भूमिकेत काम करणारे दोघेजण आपल्याला इथे (म्हणजे सध्याच्या कंपनीत) आता वाढीला जागा (स्कोप) नाही, असे ठरवतात. त्या मोठ्या कंपनीत, कुठल्या तंत्रज्ञानाला जास्त वाव मिळत नाही, ते त्यांच्या लक्षात आलेले असते. त्या तंत्रज्ञानाची आणखी कुणाला गरजा आहे, हा विचार आधीच झालेला असतो. पण ह्या कंपनीच्या व्यवस्थापनाला ते तंत्रज्ञान महत्वाचे वाटत नाही, हा क्षोभही असतो.
त्यामुळे हे दोघे बाहेर पडतात. आपले आजवरचे अर्थसंचयन आपल्याला एक-दोन वर्षे उपयोगी पडेल, असा विचार करून. घरातल्या संगणकांवर हे तंत्रज्ञान अधिक विकसीत करतात. कुणाला दाखवायचे झाले, तर त्यांना त्याबाबतीत अचंबा वाटावा, एवढे. हे झाले प्रात्यक्षिक (डेमो). आता जगातल्या इतर लोकांना हे तंत्रज्ञान वापरता यावे, म्हणून त्यावर अधिक आज्ञावलीकार नियुक्त करणे आले. ह्यासाठी पैसे लागणार. पगाराशिवाय लोक काम करणार नाहीत. मग हे पैसे कुठून मिळवावेत? ह्यासाठी आपले जुने कॉन्टॅक्ट्स वापरावे लागतात. हे कॉन्टॅक्ट्स असे हवेत, की त्यांच्याकडे पैसे तर असायला हवेतच, पण त्यांना आपण विकसीत करीत असलेल्या तंत्रज्ञानाचे महत्वही कळायला हवे. आपल्या जुन्या कंपनीतले आपले वरिष्ठ आपल्यापेक्षाही जास्त कमवत असंत, नाही का? जरी त्या कंपनीत त्यांनी आपण मांडलेल्या भूमिकेला पाठींबा दिला नाही, तरी त्यांना ह्या तंत्रज्ञानाविषयी माहिती आणि त्याचे महत्व कळलेले आहेच. त्यांनाच मदत मागितली, तर काय बिघडले? पण त्या लोकांना ह्या आर्थिक मदतीबद्दल द्यायचे काय ? कारण आपल्या कंपनीचे उत्पन्न सध्यातरी एक मोठे शून्य आहे. मघ असे केले तर? ही कंपनी जेव्हा विकली जाईल, तेव्हा त्याचा २० टक्के भाग तुमचा. असे ष्ट्यांपपेपरवर लिहून दिले तर ?
म्हणजे, ह्या नवीन संस्थेचे, जिचे अजून नावही ठरायचे आहे, शंभर समभाग केलेत, आणि त्यातील वीस समभाग जे आर्थिक पुरवठा करतोय त्याला दिले, आणि उरलेले अंशी समभाग दोन संस्थापकांनी विभागून घेतले, चाळीस-चाळीस असे. हा असा पहिला पुरवठेदार जो असतो, त्याला म्हणतात ऍंजेल इन्वहेस्टर (आद्य गुंतवणुकदार). हा रग्गड श्रीमंत असणे आवश्यक आहे, कारण, छोटे गुंतवणुकदार छोट्या छोट्या कारणांनी आपले गुंतवलेले पैसे काढून घेऊ इच्छितात. आपल्या संस्थेला पूर्ण अर्थपुरवठा करणाऱ्या व्यक्तीने, स्वत:ला अडचण आली म्हणून, आपला वाटा दोन-तीन महिन्यात काढून घ्यायचे ठरवले, तर चालेल का? म्हणून गुंतवणूकीतल्या अतीव धोक्याला जी व्यक्ती स्थितप्रज्ञपणे सामोरी जावू शकते अशी व्यक्ती आपल्याला आद्य गुंतवणुकदार म्हणुन मिळवायला हवी.
चला तर मग. आपल्याला अशी एक स्थितप्रज्ञ व्यक्ती लाभलीय आपल्या संस्थेला वर्षभरासाठी अर्थसाह्य द्यायला. त्यांना आपण आपल्या भविष्यातल्या मायक्रोसॉफ्टचे २० टक्के दिले, पण त्याबद्दल त्यांनी दिलेले दोन लाख डॉलर्स वापरून आपण दोन आज्ञावलीकार कंपनीत आणले, आणि लोकांना वापरण्याजोगी आज्ञावली बनवली. आपल्या भविष्य वक्तव्याबद्दल इतर लोकही सहमत होतेच. त्यामुळे आपल्या ह्या आज्ञावलीचा वापर बऱ्याच लोकांनी सुरू केला. आपल्याला धन्य वाटले. पण ह्या सगळ्या लोकांच्या मागण्या पुऱ्या करण्यासाठी पुरेसे आज्ञावलीकार लागणार. नाही का? त्यासाठी आपल्याला आद्य गुंतवणुकदाराने दिलेले पैसे अपुरे पडायला लागले आहेत. ते पैसे जेमतेम आणखी सहा महिने पुरणार. मग आता काय करायचे ? ही आज्ञावली लोकप्रिय व्हावी म्हणून आपण ती सर्वांना फुकट उपलब्ध करून दिलेली आहे, त्या आज्ञावलीच्या वापरासाठी शुल्क निर्धारित केले, तर त्याचे वापर करणारे कमी होणार, नाही का?
ह्या अशा विभ्रमात पडल्याने आपण ही संस्था चालवण्यासाठी आणखी अर्थसहाय्य मिळवावे लागेल, हे निश्चित. पण आद्य गुंतवणुकदार आणखी अर्थसहाय्य देण्यास अनुत्सुक असतो. आणि उत्सुक जरी असला, तरी त्याला पुन्हा दोन लाख डॉलर्सची गंतवणूक करण्यासाठी आधीसारखाच अतिरीक्त २०% वाटा हवाय. ह्याचा अर्थ आपल्या कंपनीचा ४०% वाटा त्याच्याकडे जाणार, आणि दोन संस्थापकांना प्रत्येकी ३० टक्के वाट्यावर समाधान मानावे लागणार. हेदेखील एकवेळ चालेल, पण ज्यांना समभागबाजारातील खरेदीविक्रीविषयी माहिती आहे, त्यांना ह्या योजनेतील त्रुटी लगेच कळून येईल. ज्याच्याकडे कंपनीचे सर्वाधिक समभाग, त्याला कंपनीचे धोरण ठरवण्याचा अधिकार असतो. संस्थापकांनी एखादी संस्था स्वत:च्या विचारांतून आणि कष्टांनी निर्माण केलेली असते, तिचे धोरण ठरवण्याचे अधिकार संस्थापकांकडेच रहावेत. त्यातच त्या संस्थेचे भले आहे, हे कळण्याची बुद्धिमत्ता गुंतवणुकदारांकडे असावी लागते. संस्थेचे पैसे संपत आलेत, ह्या दबावामुळे काही संस्थापक आपली बुद्धी गहाण ठेवून अशा प्रकारच्या गुंतवणुकीला मान्यता देतात. परंतु त्यातून कुणाचेही भले झालेले माझ्या पाहण्यात आलेले नाही.
अशावेळी आधार मिळतो, तो नवोपक्रमकेंद्रित गुंतवणुकदारांचा (व्हेंचर कॅपिटलिस्ट). ह्यांची भूमिका मी थोडक्यात समजवून देण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच आपल्याला समजेल अशा उदाहरणातून. आपण पतपेढीत आपले संचयित पैसे जमा करतो. त्यावर आपल्याला थोडेफार व्याज मिळते. परंतु फक्त त्या पतपेढीत पैसे ठेवल्यामुळे आपल्याला एका विशिष्ट दराने आणखी पैसे मिळतात, हे असे का? आपल्याला, म्हणजे ग्राहकाला, फायदा करून देण्यासाठी ती पतपेढी बनवलेली आहे का? हे व्याज आपल्याला देण्यात त्यांचा काय फायदा ? आपण हा विचार कधी केला आहे का ? माझ्या ओळखीच्या अनेक ज्येष्ठ लोकांना मी हा प्रश्न विचारलाय. आणि ह्याची उत्तरे त्यांना अजीबात ठाऊक नाहीत, हा मला अनुभव आलाय. त्यापेक्षाही चिंतेची बाब म्हणजे, ही उत्तरे कळूनदेखील काय उपयोग? असे प्रश्न मला विचारण्यात आले. स्वत:च्या कष्टाने कमावलेल्या पैशांविषयी इतकी अनास्था असू शकते, हे मला अचंभित करणारे आहे. असो.
पतपेढीचे दुसरे कार्य म्हणजे ज्यांना पैशांची गरज आहे, त्यांना अर्थपुरवठा करणे. हा अर्थपुरवठा कर्जाच्या रूपाने केला जातो. आणि त्या कर्जावर (मुद्दलावर) व्याज म्हणून वसुली केली जाते. हा कर्जावरील व्याजाचा दर हा पतपेढीतील गुंतवणुकीच्या दरापेक्षा नेहमीच जास्त असतो. ह्या व्याजदराच्या फरकातूनच पतपेढीला फायदा होत असतो.
आता समजा, ही पतपेढी तुम्ही गुंतवलेले पैसे अशा उगवत्या कंपन्यांना पुरवत असेल, आणि त्यातून मिळालेला नफा तुम्हाला एका विशिष्ट दराने वितरीत न करता, ज्या दराने त्यांना नफा झालाय, त्यातून त्यांचा खर्च (आणि थोडा नफा देखिल) वजा करून तुम्हाला परत देत असेल, तर तुम्हाला आवडेल की नाही ? कारण समजा त्यांनी एखाद्या कंपनीला तुम्ही गुंतवणूक केलेले १ लाख रुपये पुरवले. आणि त्या अनुषंगाने सदर कंपनीचा १० टक्के वाटा घेतला. आता त्या कंपनीने एखाद्या वर्षात १ कोटी रुपये नफा कमावला, तर त्याचा दहा टक्के वाटा, म्हणजे १० लाख रुपयांचा नफा त्या पतपेढीला झाला. त्यातील २ लाख रुपये त्या पतपेढीने स्वत:च्या खर्चासाठी जरी ठेवून घेतले, तरी उरलेले आठ लाख रुपये तुम्हाला मिळावेत. खरे ना? उपक्रम गुंतवणुकदारांना जेव्हा नफा होतो, तेव्हा साधारणत: ह्या स्वरूपात होतो. परंतु नेहमी नफाच होतो असे नाही. नवीन संस्थांपैकी २० टक्क्यांपेक्षाही कमी संस्था यशस्वी होतात. तेव्हा असा नफा होण्याची संधी पाचातील एकाला येते. तुम्ही गुंतवलेले पैसे जसे पतपेढ्यांमध्ये सुरक्षित असतात (म्हणजे कधी कमी होत नाहीत), तसे ह्या गुंतवणुकदारांना दिलेल्या पैशांचे नसते. मिळाले, तर खूप मिळतात, आणि बुडले, तर खूप बुडतात. कुठल्याही गुंतवणुकदाराला त्यामुळे ह्या तोट्यासाठी तयार असावे लागते. (रिस्क विरुद्ध रिवार्ड, हे कुठल्याही गुंतवणुकीचे मूल आहे. फक्त संख्यांमध्ये फरक आहे.)
तुम्ही किती रिस्क सहन करू शकता ? म्हणजे, तुमच्या सर्व मालमत्तेची किंमत १ लाख असेल, तर त्यातील किती मालमत्ता उद्या नाहिशी झाली, तरी तुम्हाला त्याबद्दल काहीही खेद होणार नाही ? ह्या तत्वावर तुमची ह्या क्षेत्रातील गुंतवणूक आधारित असते. अर्थविषयक स्थितप्रज्ञता येथे कामी येते. तुम्हाला पैसा हा आला काय आणि गेला काय, त्यावर तुमचे सुख अवलंबून नसेल, तर अशा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी तुम्ही योग्य आहात. पण समजा एकेका पैशासाठी जर तुमचा जीव खालीवर होत असेल, तर तुम्ही हा बाजार सहन करू शकणार नाही, ह्यापासून दूरच राहावे.
मूळ मुद्दा असा, की नवीन आस्थापना चालल्या, तर तुमचे पैसे कित्येक पटीने वाडवू शकतात. बुडल्या तर तुम्हाला आर्थिक दृष्टीने नागडे करू शकतात. त्यामुळे साधारण पतपेढ्या नवीन कंपन्यांत आर्थिक गुंतवणूक करीत नाहीत. त्यासाठी व्हेंचर कॅपिटलिस्ट उपयोगाचे आहेत. हे लोक तुमचे आमचे पैसे घेतात, आणि त्यावर एक ठराविक व्याज दर न देता, त्यांनी मदत केलेल्या कंपन्यांच्या आर्थिक यशानुसार तुम्हाला उत्पन्न देतात.
December 4th, 2007 at 8:56 pm
वा ! माहितीचे ‘सोप्पीकरण’ छान केले आहे ! आता सावकाश सर्व लेख वाचेन ह्या लेखमालेतले (आणि ब्लॉगही !).
-अर्थातच माझ्या चिमूकल्या मेंदूला किती ज्ञानफांद्यांचा भार पेलतो हे बघूनच)
(ब-याच गोष्टींचा असा मूळापासून विचार करायची ‘खोड’ मलाही आहे