शोधयंत्राचा शोध - भाग ९: पुन््हा इंकटुमी

या आधीच्या भागात आपण बघितले, की इंकटुमीच्या संस्थापकांनी समांतर प्रक्रियणाचा (पॅरेलल प्रोसेसिंगचा) उपयोग करून विश्वजालाच्या प्रसारावर आणि शोधयंत्राच्या वाढत्या सदस्यसंख्येवर विजय मिळवला. एकापेक्षा अधिक संगणक शोधयंत्राच्या कामासाठी वापरता यावे म्हणून त्यांनी शोधयंत्राचे पुनर्निर्माण केले.

१९९६च्या अखेरच्या महिन्यांत आपण पोहोचलो. आता शोधयंत्राचा उपयोग विश्वजालाच्या बहुसंख्य प्रवाशांना कळला होता. अफाट वेगाने वाढणाऱ्या ह्या माहितीस्त्रोतातून आपल्याला हवी असलेली माहिती मिळवणे फक्त एकाच सुविधेतून शक्य आहे, आणि ते म्हणजे शोधयंत्र, हे सर्वांना कळून चुकले होते. विश्वजालावर आपले संकेतस्थळ उभारले, की ह्या प्रवाशांना आपल्याकडे कसे आकृष्ट करून घेता येईल, याकडे सर्वांचा कल होता. आणि ह्या येणाऱ्या प्रवाशांमुळे आपल्या संकेतस्थळाला पैसा कसा मिळेल, हा विचारही चालूच होता.

पण हे प्रवासी आपल्या संकेतस्थळावर येतात, ते त्यांना ही फुकट सुविधा आपण उपलब्ध करून देतो म्हणून, ही जाणीवही होती. समजा आपण ही सुविधा सशुल्क उपलब्ध करून दिली, तर येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत खूपच घट होईल. मग प्रवाशांची संख्या कायम ठेवून आपल्याला ह्या संकेतस्थळासाठी अफाट पैसा कसा मिळवता येईल? ह्याचे उत्तर मिळते एका प्रश्नातून. आपल्या संकेतस्थळावर हे विश्वजालाचे प्रवासी का येतात? शोधयंत्राच्या बाबतीत म्हणायचे, तर विश्वजालातून आपल्याला हवी ती माहिती शोधण्यास ते येतात. ते कुठल्यातरी संकेतस्थळाचा शोध घ्यायला शोधयंत्राच्या संकेतस्थळावर येतात. मग आपण त्यांना जो शोध घ्यायचाय त्यासंबंधित माहिती उपलब्ध करून दिली, आणि ती माहिती देणाऱ्यांनी जर आपल्याला ती माहिती आपण उघड केल्याबद्दल पैसे दिले तर किती बहार येईल, नाही का? पण आपण जरा पुढे जातोय. हे सगळे तर आपण गूगलविषयीच्या लेखात बघायला हवे. १९९६ मध्ये संकेतस्थळांचे अर्थार्जनाचे मुख्य माध्यम होते: जाहिराती. इंकटूमीने विचार केला, आपल्या शोधयंत्राच्या संकेतस्थळावर आपण जाहिराती टाकल्या तर आपल्यालाही ह्या जाहिरातदारांकडून पैसे मिळतील. पण अशा जाहिराती कशा मिळतात? आपण जाहिरातदारांची विचारधारा त्यासाठी समजावून घ्यायला हवी.

एखाद्या नवीन गावात तुम्हाला जायचे असेल, तर त्या गावात आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी कुठे मिळतील ते कसे माहिती करून घ्यायचे ? त्या गावात वर्षानुवार्षे राहणाऱ्या लोकांकडून, होय ना ? पण नुकत्याच स्थापन झालेल्या गावात सगळेच नवीन. त्यामुळे, त्या गावाने आपला नकाशा आणि त्यातील महत्वाची (म्हणजे प्रवाशांना जी महत्वाची वाटतील ती) स्थळे नकाशात नमूद करायला हवी ना? पण हे विश्वजाळाचे गाव कुणी एकाने स्थापित केले नव्हते. त्यामुळे सर्व गावाचा नकाशा उपलब्ध नव्हता. ह्या गावातील रस्त्यांनी सगळ्यांना भटकायची परवानगी होती. आणि त्यातून त्या गावाचे आपल्याला वाटतील तसे नकाशे तयार करण्याची देखील. पण जर ते नकाशे विकून पैसा मिळणार नसेल, तर कशाला कोणी नकाशे बनवील?

पण ह्या व्यवसायाचे गणित बदलत होते. समजा एका वर्दळीच्या रस्त्यावर तुम्ही दुकान टाकले, पण त्या रस्त्यापेक्षाही मोठा रस्ता बाजूलाच तयार झाला, आणि त्या नवीन रस्त्याने सगळे लोक जायला लागले, तर ह्या रस्त्यावरचे तुमचे दुकान कुणाच्याही नजरेस पडणार नाही, आणि नवीन ग्राहक तुमच्या दुकानात येणार नाहीत. खरे ना? जिथे गिऱ्हाईकांची वाढ सर्वात जास्त, तिथेच दुकानदार दुकाने टाकणार, नाही का? व्यवसायाच्या तंत्रात ज्याला भविष्यातली वाढ लक्षात येऊन त्यानुसार तो कृती करतो, तोच व्यावसायिक श्रेष्ठ. आणि हे फक्त तंत्रज्ञानाच्याच क्षेत्रात खरे नाही, तर इतर क्षेत्रातही लक्षात येते. हे समजवून देण्यासाठी एक अनुभव येथे नमूद करावासा वाटतो. मी माझ्या बालपणातली सगळी वर्षे एका खेड्यात काढली. बारा हजार लोकवस्तीचे ते गाव. सगळी बाजारपेठ गावातल्या एका रस्त्यावर! काहीही घ्यायचे झाले, तरी त्याच रस्त्यावरच्या दुकानांत जावे लागणार. नवीन दुकाने उघडायची, नाही असे नाही. पण सगळे लोक त्याच रस्त्यावर खरेदीसाठी जातात, म्हणून तिथेच उघडणार. त्यातून इतकी हास्यास्पद परिस्थिती निर्माण झाली, की किराणा दुकान खालच्या मजल्यावर, आणि त्याच्यावर चढवलेल्या मजल्यावर एक फार्मसी. फार्मसीची गरज रोग्यांना भासते, त्यांना जिना चढून वर येता येणार नाही कदाचित, असाही विचार ह्या दुकानदाराने केला नाही. केवळ बाजाराच्या मुख्य भागात आपले दुकान असावे, म्हणून मिळेल त्या जागेत ही फार्मसी उभारली.

पण जवळच्याच एका गावातला कुणीतरी मारवाडी तेथे आला. त्याने बघितले, की ह्या गावाची वाढ कुठल्या बाजूला होते आहे ते. आणि त्या भागात आपले दुकान टाकले. त्याची सगळ्यांनी यथेच्छ निंदा केली. रूढ मताविरुद्ध जाणाऱ्यांची जशी निंदा होते, तशीच. सुरुवातीला सुमारे वर्षभर हा दुकानदार मला त्याच्या दुकानात बरेचदा एकटाच दिसायचा. कुणी गिऱ्हाईक त्याच्या दुकानात दिसायचेच नाही. पण त्याचा स्वत:च्या निर्णयावर एवढा विश्वास होता, की गिऱ्हाईक नसले तरी रोज सकाळी सात वाजता दुकान उघडून बसायचा, आणि संध्याकाळी सातलाच परत जायचा. त्या भागात जसजशी वस्ती वाढत गेली, तसतसे तिथे राहणाऱ्या लोकांनाही वाटू लागले, की खरेदीसाठी इतक्या दूर गावात कशाला जायचे ? इतक्या जवळ त्याच किमतीत सामान मिळतेय, मग उगाच वेळ का घालवायचा ? आणि त्या दुकानात गर्दी व्हायला लागली. आज वीस वर्षांनंतर तो गृहस्थ त्या गावातला सर्वात श्रीमंत माणूस आहे.

ह्या उदाहरणातून आपल्याला व्याप्ती (व्हॉल्यूम) आणि वाढ (ग्रोथ), ह्या दोन संकल्पनांतला फरक समजून येईल. समभागबाजारातल्या (शेअर मार्केट) ह्या सर्वात महत्वाच्या संकल्पना. ह्या समभाग बाजारातील घडामोडीकडे जर आपले लक्ष असेल, तर आपल्याला माहितीच असेल, की कुठल्या संस्थेचे समभाग जास्त दराने वाढतात? ज्यांची व्याप्ती जास्त आहे त्यांचे, की ज्यांची वाढ जास्त आहे त्यांचे? अर्थातच ज्यांची वाढ जास्त आहे त्यांचे, कारण वाढीच्या दरावरच ह्या समभागांतून आपल्याला म्हणजे समभाग धारकाला होणारा नफा अवलंबून असतो.

पण ही वाढ कुठल्या क्षेत्रात होणार हे ठरवणे अत्यंत अवघड असते. हे जर अचूकरीत्या कळू शकले, तर माणसाची केवढी आर्थिक प्रगती होईल?

जसजशी विश्वजालावरील सदस्यसंख्या वाढू लागली तसतशी ही वाढ उद्योजकांच्या नजरेत भरली. आपल्या उत्पादनाची जाहिरात ह्या वाढत्या प्रेक्षकवर्गापुढे व्हावी म्हणून त्यांनी आपल्या संस्थांची संकेतस्थळे उभारायला सुरुवात केली. पण चिश्वजालावरील लाखो संकेतस्थळांपैकी हे प्रवासी आपले संकेतस्थळ बघायला कसे येणार? हा प्रश्न सगळ्यांनाच एव्हाना भेडसावायला लागला होता. आजवर आपल्या उत्पादनाची जाहिरात करणे सोपे होते. ज्या रस्त्यांवरून सर्वात जास्त लोक जातात, त्या रस्त्यांवर आपल्या उत्पादनाची जाहिरात लावली की झाले काम. पण ह्या विश्वजालावर असे ठराविक रस्तेच नाहीत! पण ठिकाणे तर आहेत. चला, ज्या ठिकाणांवर सर्वाधिक लोक जातात, तेथे आपली जाहिरात टाकूया. अशी ठिकाणे कोणती ? विश्वजालातील प्रवासी कुठल्या ठिकाणांना सर्वात जास्त भेट देतात ? १९९६ मध्ये याहू!वर इतर संकेतस्थळांविषयी माहिती मिळवण्यासाठी आणि हॉटमेलवर फुकट मिळणाऱ्या विरोपाच्या सुविधेसाठी विश्वजालातील बहुसंख्य प्रवासी जातात. तिथे जर आपल्या संकेतस्थळाची जाहिरात टाकली, तर तिथले लोक आपल्याकडे आपल्याला आकृष्ट करून घेता येतील. म्हणून ह्या व्यावसायिकांनी तिथे जाहिरात टाकण्यास सुरुवात केली.

आपल्याला आजही रस्त्याच्या कडेला जाहिरातींचे मोठे फलक दिसतात. हे फलक लावण्यास ह्या लोकांना कोण परवानगी देतो? कुणाला ह्यातून आर्थिक लाभ होतो, ह्याचा विचार आपण केलाच असेल. गावातील रस्ते हे त्या गावाच्या प्रशासनाच्या मालकीचे असतात. पण ते प्रशासन ह्या रस्त्याच्या कडेला जाहिराती लावाव्या म्हणून उद्योजकांना विनंती करीत नाही. उलट काही उद्योजक त्यांना येथे जाहिराती लावू द्याव्या म्हणून प्रशासनाला विनंती करीत असते. नव्हे, त्यांनी तशी विनंती करावी अशी विनंतीच प्रशासन त्यांना करीत असते. हे उद्योजक स्वत:च्या जाहिराती लावाव्यात म्हणून प्रशासनाकडून रस्त्याच्या कडेची जागा मागत नसतात, तर ही जागा प्रशासनाकडून भाड्याने घेऊन इतरांनी तिथे आपल्या जाहिराती लावाव्यात, आणि त्या जाहिरातीच्या किमतीचा वाटा आपल्याला मिळावा म्हणून त्या जागेचा हक्क स्वत:कडे घेतात.

विश्वजालाच्या निर्मितीपूर्वीदेखील हे अस्तित्वात होते. विश्वजाल निर्माते हे त्या रस्त्यांचे प्रशासक समजा, आणि आपल्याला आंदण दिलेल्या रस्त्यांवर वर्दळ करवून घेणारे हे संकेतस्थळांचे चालक. एकदा आपल्या फुकट असणाऱ्या संकेतस्थळांत वर्दळ झाली, की त्याचा कसा आर्थिक फायदा मिळवून घ्यावा ही कल्पना गावागावांत असणाऱ्या ह्या रस्त्यांवरील जाहिरातींतून ह्या संकेतस्थळ चालकांना सुचली.

पण तुम्ही म्हणाल, की इंकटुमीच्या संस्थापकांनी आपल्याला धनलाभ कसा होणार, हे माहिती नसतानाच अशी संस्था का उभारली? हा १९९५-९६ चा काळ. विश्वजालाच्या जन्माचा काळ. उत्सर्जनशील तंत्रज्ञांना हे नवीन माध्यम मिळाले. यातून काय काय शक्य होऊ शकेल, हे धनत्तरांनाही त्यांनी समजावून दिले. आणि पैसा कुणाला नको असतो? चला, आपण ह्या काळात कंपन्यांची कशी उभारणी होत होती ते बघू. (आजही गूगलने य़ूट्यूब ही संस्था विकत का घेतली ह्याचाही थोडा खुलासा होईल त्यातून.)

Leave a Reply