संपन््न दशकाची डायरी : अमेरिकावारी
गेल्या दशकात मराठीत सर्वाधिक लिहिला गेलेला साहित्यप्रकार, म्हणजे अमेरिकावारी. हा प्रकार ढोबळमानाने प्रवासवर्णन ह्या प्रकारात मोडतो, पण प्रवासवर्णन हे बरेचदा रोचक असते, हा ह्या दोन प्रकारांतील मुख्य फरक.
प्रवासवर्णन हा साहित्यप्रकार गेल्या शतकापासून मराठी साहित्यात रूढ आहे. देशाटन केल्याने पंडितमैत्री होते, अशा काहीशा भाबड्या समजुतीने आजवर कागदाची अनेक रिमे आणि शाईचे अनेक ब्यारेल्स वाया गेलेले आहेत. पूर्वी प्रवासावरून (म्हणजे तीर्थयात्रेवरून) परत घरी आल्यावर गावजेवण द्यायची प्रथा होती. त्याला “मावंदे घालणे” असे नाव होते. हल्ली हे मावंदे आपले प्रवासवर्णन लिहून घालण्याची अनिष्ट पद्धत सुरू झाली आहे. त्यासाठी कारणीभूत असणाऱ्या राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक पार्श्वभूमीचा आपण ह्या लेखात आढावा घेणार आहोत.
१९८० च्या दशकात आय आय टी चे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी एक गठ्ठा अमेरिकेत जायचे. त्यावेळी “ब्रेन ड्रेन” म्हणून होणारी आरडाओरड, ९०च्या दशकात जेव्हा व्ही आय टी, पी आय सी टी चे विद्यार्थी एच-१ बी घेऊन अमेरिकेत जाऊ लागले, तेव्हा थांबली. कर्वेनगर, पुणे ५२ ह्या किंचित-साहित्यिकांच्या नगरीतल्या विठ्ठल मंदिराच्या आवारात, पासपोर्ट, व्हिसा, कॉन्सुलेट वगैरे शब्द “हारी विठ्ठल” च्या गजरातून ऐकू येतात. होंडा आणि टोयोटा ही नावे कानावर प्रथमच पडलेल्या बर्वे काकू, लेले काकूंना “तुमच्या मुलाने सिव्हिक घेतली का ? आमच्या मुलाकडे अकॉर्ड आहे” अशी बढाई मारतात. आणि लेले काकू “तुमचा मुलगा अजूनही सिंगल बेडरूम मित्रासोबत शेअर करून राहतो का हो?” असे मुद्दाम चारचौघांत विचारून बर्वेकाकूंचा पाडाव करतात. बर्वे आणि लेले काकू मग वर्षभरात “अनुरूप” मध्ये आपापल्या मुलांची नावे नोंदवतात. आणि एका फाईलवर मोठ्या अक्षरात “।।श्री गणेशाय नम:।।” लिहून, आत फोटो, पत्रिकांचा संचय सुरू होतो. मे महिन्यात मुलगा तीन आठवड्यांसाठी येणार, तेव्हा “उरकून टाकू” असा चहूकडून उद्घोष होतो. मुलगा तसा गुणी आहे, पण आजूबाजूला असे वातावरण, पाय घसरला तर ? म्हणून लवकरच त्याचे दोनाचे चार व्हायला हवेत, नाही का ?
आलेल्या चारशे अर्जांपैकी चाळीस अर्ज निवडले जातात. “मुलगी बी ई आहे, शिवाय सीडॅकचा कोर्स केलाय सहा महिन्यांचा, आणि पासपोर्ट तयार आहे” असे अर्ज अग्रस्थानी येतात. कार्यालयाचं बुकिंग होतं. वराचा पत्ता नाही, वधू कोण हेही ठरलेलं नाही, पण एंगेजमेण्टची तारीख ठरते (त्यासाठी सोसायटीचा प्रशस्त हॉल बुक होतो.) भावी सुनेचे वडील ह्या बुकिंगचे पैसे रिफण्ड करणार, म्हणून त्याच फायलीच्या शेवटी सगळ्या रिसीट्स काळजीपूर्वक ठेवण्यात येतात.
मुलगा येतो. बाबांसाठी रीबॉक किंवा रेबॅन, आईसाठी १४ क्यारटचे कानातले, बहिणीसाठी गॅपचा टी-शर्ट आणि जीन्स, शनेल नं ५, आणि इतर आत्या-मावश्यांसाठी केशर घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेटलॅग तात्पुरता आवरून अर्धवट झोपेतच, वधुपरीक्षेला सुरुवात करतो. सकाळी शॉर्टलिस्ट केलेल्या मुलींशी संध्याकाळी हॉटेलात भेटतो. तिसऱ्या दिवशी, “मुलगी पसंत आहे”चा निरोप जातो. चौथ्या दिवशी फाईलमधल्या रिसीटांची झेरॉक्स (मुलगा हल्ली त्याला फोटोकॉपी म्हणतो) वाग्दत्त सासऱ्यांच्या हवाली होतात. कॉन्सुलेटची अपॉइंटमेंट लगेच दुसऱ्याच आठवड्यात असते, म्हणून एका रजिस्ट्रारला गाठून कागदोपत्री लग्न लावतो. एच-४ व्हिसा मिळतो. कार्यालयात वैदिक पद्धतीने लग्न होते. मुलाला रजिस्टर्ड लग्नानंतरच हनीमून करायचा असतो, पण चारचौघात बरं दिसणार नाही, म्हणून देवाब्राह्मणांच्या प्रतीक्षेत तिष्ठणारा मुलगा लगेच दोन दिवस बंगलोर-मैसूर-उटी करून परत येतो. लगेच प्याकिंगला सुरुवात होते. चितळ्यांची बाकरवडी, आंबा बर्फी, बेडेकरांचे लोणचे, मेतकूट, चकलीची भाजणी, सर्व सर्व काही भरून मुलगा आणि नवी सून अमेरिकेला रवाना होतात.
आणि बर्वेकाका आणि काकू पुन्हा विठ्ठलमंदिराच्या पारावर दर शनिवारी फोनवर मिळणारे अपडेट्स आठवडाभर लेले काकाकाकूंना ऐकवतात. सुनेने महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवात बटाटेवड्यांचा स्टॉल टाकला होता, ही बातमी अंबानींनी रिलायन्स फ्रेश टाकले, ह्याच तोऱ्यात सांण्यात येते. मुलाच्या कंपनीने त्याला ग्रीन कार्डसाठी स्पॉन्सर केले ह्या बातमीसारखीच ती पुणे-५२ मध्ये वायुवेगाने पसरते.
आणि मग नोव्हेंबरात एका फोनमध्ये गुडन्यूज कळते. डॉक्टरांनी जूनमधली तारीख दिलेली असते. अमेरिकेत जूनमध्ये थंडी नसते, हे ऐकून बर्वेकाकूंना मुलाच्या “टायमिंग” चे चारचौघात मनसोक्त कौतुक करताना, आपण कुठल्या गोष्टीचे कौतुक करतोय, ह्याचे भानही उरलेले नसते. सूनबाई पुण्यात असती, तर तिला सातव्या महिन्यातच माहेरी धाडले असते, कारण पहिले बाळंतपण ही तिच्या माहेरची जबााबदारी! पण बाळंतपण अमेरिकेत असल्यााने आम्हीच जावे म्हणतो, इथून सुरुवात होते. आणि पासपोर्टचे अर्ज मागवण्यात येतात. मुलाकडून फॉर्मल इन्व्हिटेशन येते, कॉन्सुलेट मध्ये व्हिसाच्या अप्लिकेशनला जोडायला, आणि बर्वेकाकू बाजूच्या स्टेशनरीवाल्याकडून एक डायरी विकत आणतात. आणि “अमेरिकावारी” ह्या प्रवासवर्णनाचे गर्भाधान होते.
पासपोर्टची एनक्वायरी करायला आलेल्या पोलिसाला तीनशे रुपये दिले, ह्यापासून ते कॉन्सुलेटच्या रांगेत झालेल्या ओळखी, कुणाला कुठल्या कारणांनी व्हिसा नाकारण्यात आला, आम्हाला काय प्रश्न विचारले, प्रश्नकर्ता गोरा होता की निग्रो (अद्याप बर्वेकाकांना काळ्या लोकांना निग्रो म्हणायचे नाही, हे कळलेले नाही) इथपर्यंत सगळ्या नोंदी डायरीत होतात. ह्या प्रवासवर्णनाच्या पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये बर्वेकाकांनी “अपूर्वाई”तील “एक बेपत्ता देशाची” एकवीस पारायणे केली असतात. जायचा दिवस उजाडेपर्यंत पहिली डायरी भरलेली असते. त्यात काय काय सामान घेतले ह्या यादीपासून, ते याधी अमेरिकावारी घडलेल्या सर्व आप्तस्वकीयांच्या मुलाखतीपर्यंत सगळे असते. नवीन डायरी आणण्यात येते. तिची सुरुवात विमानतळापासून होते. विमानात मिळणारे जेवण, अगत्यशील हवाईसुंदऱ्या, हीथ्रो विमानतळावरचे भारतीय सफाई कर्मचारी, ह्या विषयावरच दहा पंधरा पाने लिहिली जातात.
जेएफके, किंवा एसएफओ ला विमान घिरट्या घालताना बर्वेकाकूंना कोलंबसाचे गर्वगीत आठवते. रिसीव्ह करायला आलेल्या मुलाची भेट, त्याच्या अकॉर्डच्या ड्याशबोर्डवरची गणपतीची मूर्ती, अमेरिकेतले गुळगुळीत रस्ते, शिस्तबद्ध वाहतूक ह्याविषयी लिहायला जेटलॅग उपयुक्त ठरतो. पुण्याहून आलेल्या बाकरवड्यांवर ताव मारायला आलेल्या मुलाच्या मित्रांशी बोलल्यावर “येथे अगदी पुण्यात असल्यासारखेच वाटते”, अशी नोंद करायला बर्वेकाकू विसरत नाहीत. मॉल्सचे वर्णन होते. सकाळी मुलगा ऑफिसला गेल्यावर फिरायला जाताना, कुणी अमेरिकन आजी त्यांना “गुड मॉर्निंग” म्हणतात. एवढ्या अनुभवावर, बर्वेकाकांच्या डोक्यात “अमेरिकेतील वृद्ध नागरीकांच्या समस्या” अशी लेखमाला तयार होते. दिवसभर टीव्ही बघून “अमेरिकेचा नैतिक ऱ्हास”, ह्याविषयी बर्वेकाकू डायरीत टिपणे करतात. महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला एकदा जाऊन “अमेरिकेतील मराठी माणसे” ह्याविषयी दोघेही ललित लेखाची जुळवाजुळव करतात.
मेमोरियल डेला मुलाला तीन दिवसाची सुट्टी असते, तेव्हा बर्वेकाकाकाकूंना नायगारा घडतो. तिथेच डेट्रॉयटवरून आलेले (मूळचे डहाणुकर कॉलनीतले, त्यांच्या सुनेला जुलैची तारीख दिली आहे) नेनेकुटुंब भेटते, आणि बर्वे आणि नेने ह्या दोघांच्याही डायरीत त्याची नोंद होते. महिना असाच जातो. नातवाची काळजी घेण्यात आणि उरलेल्या वेळात झी टीव्हीवरील सासबहू मालिका बघण्यात बर्वेकाकू गुंततात, आणि बर्वेकाकांच्या डायरीत आता “कंटाळा” हा शब्द खूपदा लिहिला जातो. सगळी सुबत्ता, सुखसोयींच्या गराड्यात असूनही आपली माणसे, आपले लोक वगैरेंच्या आठवणी अधनं मधनं लिहिल्या जातात. “गड्या आपुला देश बरा” वगैरे ओळींची गर्दी होते.
सप्टेंबर उजाडतो. लवकरच थंडी सुरू होणार, म्हणून बर्वेकाका काकू अमेरिकेतून काढता पाय घेतात. गौरी-गणपतीला पुण्यात घरी असायला हवे, असे सगळ्यांना सांगतात. दुसरी डायरी आता भरलेली असते.
परतल्यावर विठ्ठल मंदिराच्या पारावर “काय, कधी आली अमेरिका?” ह्या वाक्याने त्यांचे स्वागत होते. आणि विठ्ठल मंदिरात तोंडीस्वरूपात आणि घरी आल्यावर लेखीस्वरूपात “अमेरिकावारी: एक प्रवास वर्णन”चा जन्म होतो. इ-सकाळच्या “पैलतीर” मध्ये ते प्रकाशित होते, किंवा न झाल्यास मुलाने घेऊन दिलेल्या कॉम्प्युटरवरून कुठल्यातरी मराठी वेबसाईटवर ते १९ भागांत चढवण्यात येते.
गेल्या दशकात झालेल्या एकूण साहित्यनिर्मितीच्या ३४ टक्के लिखाण हे “अमेरिकावारी” ह्या साहित्यप्रकारात मोडते. गावांची नावे बदलतात, कधी न्यूयॉर्क, तर कधी सॅन होजे. मुलांची, सुनांची नावे बदलतात. आजूबाजूच्या रस्त्यांची नावे बदलतात. पण एकंदरीत स्वरूप हे असेच असते. पण सर्वच लोक काही बर्वेकाकाकाकूंसारखे सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहीत नाहीत. “विमानाने आकाशात झेप घेतली, मुंबईचे ते लुकलुकणारे दिवे पाहताना, मला माझे माणगावात घालवलेले लहानपण आठवले”, अशी सुरुवात करून पहिल्याच प्रकरणात आपले संक्षिप्त आत्मचरित्र लिहितात. काहीजण, अमेरिकेतील मॉलचे वर्णन करताना, गावच्या किराणा दुकानाची आठवण लिहून, पुढे संक्षिप्त आत्मचरित्र लिहितात. काही जण अमेरिकन आजीबाईंच्या “गुड मॉर्निंग”नंतर आपल्या आजीची आठवण लिहून मग पुढे संक्षिप्त आत्मचरित्र लिहितात. एकंदरीत अमेरिकावारी, ह्या साहित्यप्रकारात संक्षिप्त आत्मचरित्र लिहिण्यास खूप स्कोप असतो.
सध्या एवढेच. आमचा ह्या साहित्यप्रकाराचा सखोल अभ्यास असून ह्याविषयावर आमचा प्रबंध तयार होतो आहे. लवकरच प्रकाशित होईल. तारखेकडे लक्ष ठेवा.
November 20th, 2007 at 7:17 pm
dhamal! lavkar yeu dya…
November 20th, 2007 at 7:31 pm
सहीच!
November 21st, 2007 at 5:14 am
great, पुढचा भाग वाचण्यास उत्सुक आहे..!!!
November 21st, 2007 at 10:58 am
भन्नाट लिहीलंय.
मजा आली वाचून. बर्वे आणि लेले काकू अगदी डोळ्यांसमोर दिसल्या. प्रबंध लिहून झाला की इथेच प्रसिद्ध करा!
November 22nd, 2007 at 3:43 am
Too good.. !!!!!!!
Good to see you back by the way.. !
November 25th, 2007 at 7:53 pm
[…] अमेरिकेला जाऊन आल्यावर लिहिलेल्या प्रवासवर्णनांना वैतागलेले मिलिंद भांडारकर स्वत: या प्रवासवर्णनांवर लिहित आहेत. हहपु. […]
December 15th, 2007 at 7:45 pm
Mr Bhandarkar,
Aapan lihilele sagalyannach khup avadel karan aaple barech lok halli ya navin watavarnacha anubhav ghet ahet.Aapan pudhil article jarur lihaveEesha
September 7th, 2008 at 2:07 am
पुणे ५२ ही तुमची सासुरवाडी. तेव्हा सासुरवाडीची अशी टिंगल महागात पडेल. नागपुरकरांची अमेरीकावारी कशी असते ते पण लिहा बुवा कधीतरी…