विश्वजाल २.० - दोन घटना
आजच्या दोन बातम्यांनी विश्वजाल २.० आणि त्यातील सदस्यांची आणि चालकांची भूमिका ह्यावर विचार करण्यास कुणीही प्रवृत्त होईल.
१. डिग नावाचे एक संकेतस्थळ आहे. ह्या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असे की ह्यावर सदस्य त्यांनी विश्वजालावर पाहिलेल्या इतर बातम्यांचे अथवा संकेतपृष्ठांचे दुवे देतात. इतर सदस्य ते वाचून त्यांना त्यांच्या आवडीनुसार अधिक किंवा उणे गुण देतात. ज्या दुव्यांना सर्वाधिक गुण मिळतात, ते मुखपृष्ठावर असतात. एका दृष्टीने पाहिल्यास हे एक वर्तमानपत्र आहे, ज्यावर कुठल्या बातम्या असाव्या आणि कुठल्या बातम्यांना किती महत्व द्यावे हे सदस्य ठरवतात. मराठीत ह्याच प्रकारचे एक हेलोमराठी.कॉम नावाचे स्थळ आहे.
तर दोन दिवसांपूर्वी डिग वर कुणीतरी एक दुवा टाकला. त्या दुव्यात नवीन डीव्हीडी चे कूटीयन (एन्क्रिप्शन) कसे मोडायचे, आणि त्यांच्या प्रती कशा काढायच्या, त्याबद्दल सूचना होत्या. चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेने डिग ला विनंती केली की हा दुवा तुमच्या संकेतस्थळावर टाकू नका. डिगला संपादक नसतात, पण तरी त्यांच्या चालकांना वाटले, की हा दुवा प्रकाशित करून आपण कायदेशीर खटल्याला आमंत्रण देतोय, म्हणून त्यांनी हा दुवा काढून टाकला. सदस्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यांचे म्हणणे: डिग हे संकेतस्थळ सदस्यांनी केलेल्या मतांनुसार दुव्यांची उपयुक्तता ठरवते, त्यामुळे संपादकांची काय गरज ? त्यामुळे हा दुवा काढल्यानंतर काही सेकंदांतच आणखी काही सदस्यांनी तोच दुवा पुन्हा डिग मध्ये टाकला, आणि भरघोस मते देऊन पुन्हा मुखपृष्ठावर आणला. पुन्हा एकदा संकेतस्थळचालकांनी तो काढला. पुन्हा काही सेकंदांतच तो दुवा डिगवर आला. असे दिवसभर चालले.
शेवटी डिगच्या संस्थापकांनी जाहीर पत्र लिहून सदस्यांच्या मताचा आम्ही आदर करत आहोत, आणि आता तो दुवा तेथेच राहील, अशी कबुली दिली. ज्या सदस्यांच्या योगदानामुळे आपले संकेतस्थळ चालू आहे, त्यांच्या मताला आदर द्यावा, ही जाणीवच त्या पत्रातून व्यक्त होते.
२. बराक ओबामा नावाचे डेमोक्रॅटिक खासदार २००८ च्या निवडणुकीसाठी उमेदवार आहेत. सुमारे अडीच वर्षांपूर्वी त्यांच्या एका चाहत्याने मायस्पेस नावाच्या संकेतस्थळावर त्यांच्याविषयी (चांगली) माहिती देणारे एक उपस्थळ निर्माण केले. गेली दोन वर्षे ओबामांचे सचिव देखील त्या स्थळावर ओबामांच्या मूल्यांविषयी आणि तत्वांविषयी माहिती देत होते. ह्या उपस्थळाचे निर्माते श्री अँथनी ह्यांना ओबामांच्या प्रचारसमितीवरील मुख्य लोकांनी ही माहिती अद्ययावत रहावी ह्यासाठी अगदी गेल्या महिन्यापर्यंत मदत केली. मायस्पेस वरचे हे उपस्थळ लोकप्रिय झाले, आणि ह्याचा दुवा इतर लोक आपल्या अनुदिनीतून द्यायला लागले. तेव्हा मात्र ओबामाच्या प्रचारसमितीच्या मुख्याचे धाबे दणाणले. आपल्या उमेदवाराविषयी इतकी माहिती देणारे लोकप्रिय संकेतस्थळ आपल्याव्यतिरीक्त इतर कुणाच्या ताब्यात असले, तर आपल्या प्रचारमोहीमेवर आपला ताबा राहणार नाही, हे नक्की. म्हणून मायस्पेसच्या चालकांशी संपर्क साधून त्यांनी ह्या उपस्थळाचे नियंत्रण स्वतःकडे घेतले. एका सदस्याने स्वतःचा बहुमूल्य वेळ खर्च करून बनवलेले संकेतस्थळ अशा रीतीने हडपण्यात आले. श्री. अँथनी म्हणतात, की ते आता ओबामांना मत देणार नाहीत.
ह्या दोन बातम्यांतून सदस्यांच्या योगदानावर आधारित संकेतस्थळांच्या चालकांची दोन परस्पर विरुद्ध रूपे आपल्याला बघायला मिळतात. विश्वजालाच्या दुसर्या आवृत्तीत समुदायाचे योगदान वाढवले, तर त्याच्या वर्गप्रमाणात संकेतस्थळाची वाढ होते, हे निदर्शनास आले आहे. त्या ध्येयप्राप्तीसाठी चालकांची भूमिका कशी असावी ?
September 3rd, 2007 at 11:07 pm
जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर
September 15th, 2007 at 5:44 am
tumhi gaayabach jhalat. ithe tari liha.
aamhi ahotach vachayla.