नवीन संकेतस्थळ उभारायचेय?

माझ्या अनेक मराठी संकेतस्थळांवर होणाऱ्या वावरात मला बरेचदा विचारला जाणारा हा प्रश्न: नवीन मराठी संकेतस्थळ कसे तयार करावे ?
त्यावर माझा लगेच प्रश्न असतो. कशासाठी ?
ह्या प्रश्नानंतर बरेचदा हे उत्तरार्थी लोक गप्प बसतात.

काही जण मात्र ह्या प्रश्नाचे उत्तर न देता, दुसरा प्रश्न विचारतात: मला एक मराठी संकेतस्थळ तयार करायचे आहे, ड्रुपॅल वापरावे का ?
माझे उत्तर: तुम्हाला काय करायचे आहे ?
ह्यानंतर मात्र १००% लोक गप्प बसतात.

माझा निष्कर्ष: ज्यांना काय करायचे आहे, हे माहिती आहे, त्यांना ते कसे करायचे, ते आपोआप कळते.

मला मध्यंतरी बऱ्याच विनंत्या आल्या की संकेतस्थळांवरून अर्थलाभ कसा करावा, ह्याविषयी लिहा. गूगल अॅडसेन्स मधून किती पैसे मिळू शकतील? मराठी संकेतस्थळांच्या सध्याच्या (नियमीतपणे असणाऱ्या, पन्नास) ग्राहकांकडून अर्थलाभाची शक्यता आहे काय?

लोकहो, तुम्हाला पन्नास सक्रिय ग्राहक तुमच्या मराठी संकेतस्थळासाठी मिळत असतील, तर ते तुम्ही तुमचे भाग्य समजा, आणि मराठीच्या विश्वजालावरील वर्धनातून आपण समाजसेवा करीत आहोत, असे गृहित धरून त्यासाठी जो खर्च होतो, तो करमुक्त आहे, ह्याबद्दल मायबाप सरकारचे आभार माना.

पण तुम्ही म्हणाल, गूगल आणि याहू! सारख्या कंपन्या भारतीय भाषांमध्ये अधिकाधिक संकेतस्थळे उघडत आहेत. त्यातून अर्थलाभाची शक्यता जर नसेल, अशा मोठ्या कंपन्या असे का करतील ? प्रश्न चांगला आहे. भविष्यात कधीतरी अर्थलाभ होईल, ह्याच आशेने कुठल्याही कंपन्या असे तोट्यात चालणारे धंदे करतात. पण त्यांच्याकडे इतके पैसे आहेत, की अशी तोट्यात चालणारी संकेतस्थळे ते वर्षानुवर्षे चालवू शकतील, आणि त्यांच्या अनेक चतुर्थकांच्या जमाखर्चात त्यांना हा खर्च ‘क्षुल्लक खर्च’ म्हणून दाखवता येईल.

त्यांनी चालवलेल्या संकेतस्थळांना तुम्ही नुकतेच सुरू केलेले संकेतस्थळ स्पर्धा ठरणार आहे का? मग त्यावर त्यांची प्रतिक्रिया दोन प्रकारची असेल. एक, तुमचे संकेतस्थळ ज्या वाचकांना आकृष्ट करते, त्याच वाचकांना आकृष्ट करण्यासाठी तुमच्या संकेतस्थळावर जो मजकूर आहे, तशाच प्रकारचा मजकूर त्यांच्या संकेतस्थळावर टाकणे (तुमचा यू एस् पी, युनिक सेलिंग पॉइंट, काय?). दुसरा पर्याय, तुमचे संकेतस्थळ विकत घेणे. दुसरा पर्याय तुम्हाला सहज मान्य होईल. पण त्यासाठी तुमच्या संकेतस्थळांची जास्तीत जास्त किंमत मिळावी, ह्यासाठी तुम्ही काय करताहात? ही किंमत कशी ठरवतात, ह्याविषयी तुम्हाला थोडीतरी कल्पना आहे का?

आपले संकेतस्थळ मोठ्या संस्थांनी विकत घ्यावे, किंवा त्या मोठ्या संस्थांनी चालवलेल्या इतर संकेतस्थळांचे स्पर्धक ठरावे, ह्याविषयी तुम्ही विचार केला नसेल, तर माझा एक सल्ला. तुमच्या संकेतस्थळाच्या विशेषतेवर (यू एस् पी) आणखी विचार करा. अशा विशिष्टतेसाठी मोठ्या संख्येत सदस्यवर्ग उपलब्ध आहे का? तो सदस्यवर्ग इतर कुठल्याही संकेतस्थळाचा सदस्य नाही, हे आधी ठरवावे लागेल. कारण तो सदस्यवर्ग दुसऱ्या संकेतस्थळाच्या सदस्यवर्गाचा उपसंच असेल, तर ह्या मोठ्या संस्था तुमच्याकडे लक्ष देण्याऐवजी, त्या दुसऱ्या संकेतस्थळाकडे आपले लक्ष केंद्रित करतील, नाही का?

ह्या लेखाचा उद्देश नवीन मराठी संकेतस्थळे सुरू होऊ नयेत, असा नाही. पण ह्या उत्साही संकेतस्थळचालकांनी आपल्या सदस्यवर्गाबद्दल संशोधन करावे, हा आहे. मराठी संकेतस्थळावर येणारा वाचकवर्ग एकाच (सुमारे) दहा हजाराच्या गटातून येतो, असे माझे निरीक्षण आहे. माझे मनोगत, मायबोली, उपक्रम, हेलो मराठी, मराठीवेब, ह्या मोजक्या संकेतस्थळांच्या चालकांना आवाहन आहे, की आपापले मतभेद विसरून, आपापले सदस्यांच्या माहितीचे विदागार एकमेकांशी ताडून बघावे. तुम्हाला एकमेकांशी बोलण्यात कमीपणा वाटत असेल (कुण्या एका संकेतस्थळाच्या चालकाने आपले स्थळ सुरू करताना, त्याच्या जुन्या स्थळावरून सदस्यांना भुलवले, अशा तक्रारी नेहमीच ऐकू येतात), तर मी एक तटस्थ निरीक्षक म्हणून यासाठी माझा वेळ द्यायला तयार आहे. (शेवटी मराठी के लिये कुछभी करेगा, काय? :-)

Leave a Reply